बेंगळुरूः भारताचे महत्वाकांक्षी चांद्रयान-2 हे अंतराळ यान चंद्राच्या आणखी एका खालच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी झाले.चांद्रयान-2 ने बुधवारी पहाटे 3.42 वाजता ही मोहीम फत्ते केली.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) दुसरी डी-ऑर्बिटल मोहीम बुधवारी यशस्वी झाल्यामुळे भारताचा चंद्रावर स्वारी करणारा पहिला लँडर विक्रम 7 सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरण्यास सज्ज झाला आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, विक्रमची दुसरी डी-ऑर्बिटल मोहीम बुधवारी भल्या पहाटे 3.42 वाजता ऑनबोर्ड संचालन तंत्राच्या साह्याने सुरू करण्यात आली आणि अवघ्या 9 सेकंदात ही मोहीम फत्ते झाली. विक्रम लँडरची कक्षा 35 किलोमीटर X 101 किलोमीटरची आहे.

या मोहीमेबरोबरच लँडर विक्रमची चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी आवश्यक असलेल्या कक्षा प्राप्त करण्यात आली आहे. विक्रम हा लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 7 सप्टेंबर रोजी पहाटे 1.30 ते 2.30 वाजेच्या दरम्यान उतरेल. विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच रोव्हर प्रज्ञान त्यातून बाहेर पडेल आणि संशोधनाचे काम सुरू करेल, असे इस्रोने सांगितले. चंद्रावर संशोधन करणे हेच रोव्हर प्रज्ञानचे मुख्य उद्दिष्ट आहे.
चांद्रयान-2 आपल्या 96 किलोमीटर x 125 किलोमीटरच्या विद्यमान कक्षेत चंद्राच्या चारही दिशांनी फिरत आहे आणि ऑर्बिटर आणि लँडर दोघेही व्यवस्थित काम करत आहेत. सोमवारी दुपारी विक्रम चांद्रयान-2 पासून यशस्वीपणे वेगळे झाले होते. इस्रोने 22 जुलै रोजी जीएसएलव्ही-एमके III द्वारे चांद्रयान-2 अंतराळात पाठवले होते. चंद्रावर स्वारी करण्याची ही भारताची 978 कोटी रुपयांची महत्वाकांक्षी योजना आहे.