देशात एकाच दिवशी १ लाख ५९ हजार नवे कोरोना रूग्ण, संसदेच्या ४०० कर्मचाऱ्यांनाही लागण

0
40

नवी दिल्लीः भारतातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत चालला आहे. आरोग्य मंत्रालयाने आज, रविवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत देशात १ लाख ५९ हजार ६३२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी देशात एकाच दिवशी १ लाख ४१ हजार ९८६ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले होते. आजची ही आकडेवारी धडकी भरवणारी आहे. देशात आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता ३ कोटी ५५ लाखांवर पोहोचली आहे. त्यात ओमीक्रॉन विषाणूची बाधा झालेले ३ हजार ६२३ रुग्ण आहेत.

विशेष म्हणजे संसदेचे ४०० कर्मचारीही कोरोनाबाधित आढळले आहेत. ६ आणि ७ जानेवारी रोजी संसदेत कार्यरत कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी ४०० हून अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. देशात गेल्या २४ तासांत कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्ही दर १०.२१ टक्के आढळून आला आहे. गेल्या आठवडाभरातील देशातील सरासरी पॉझिटिव्ही दर ६.७७ टक्के आहे. सध्या देशात एकूण ५ लाख ९० हजार ६११ सक्रीय कोरोना रूग्ण आहेत.

हेही वाचाः राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणाः सोमवारपासून नवे निर्बंध; वाचा काय सुरू, काय बंद राहणार?

हेही वाचाः नवे निर्बंधः लेखी परवानगी असेल तरच शासकीय कार्यालयांत प्रवेश, खासगी कार्यालयांनाही हे नियम

देशातील ओमीक्रॉन विषाणूबाधित रूग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत चालली आहे. गेल्या २४ तासांत संपूर्ण देशात ओमीक्रॉनचे ६१६ रुग्ण आढळून आले आहेत. याबरोबरच देशातील एकूण ओमीक्रॉनबाधित रूग्णांची संख्या ३ हजार ६२३ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १ हजार ९ ओमीक्रॉनबाधित रूग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रानंतर दिल्लीत सर्वाधिक म्हणजे ५१३ ओमीक्रॉनबाधित रूग्ण आढळले आहेत. देशातील २७ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात ओमीक्रॉन विषाणूने शिरकाव केला आहे.

वाचा डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील घोटाळाः  अर्थशास्त्रात ‘कृतिका’र्थताः पात्रता नसताना खंदारेंची आज मुलाखत, उद्या नियुक्ती आणि तत्काळ रूजूवात

महाराष्ट्राची स्थितीः महाराष्ट्रात शनिवारी एकाच दिवशी ४१ हजार ४३४ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्याआधी राज्यात एकाच दिवशी ४० हजार ९२५ रूग्ण आढळून आले होते. मुंबईत आढळून येणाऱ्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या २० हजारांच्या वरच आहे. शनिवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत एकट्या मुंबईत २० हजार ३१८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा