निझामुद्दीनच्या तबलिगीसाठी पुणे विभागातून गेलेले १०६ जण सापडले, ७६ जणांचा शोध सुरू

0
12
संग्रहित छायाचित्र.

पुणे : दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी जमातच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या व त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील १८२ जणांची यादी प्राप्त झाली असून त्यापैकी १०६ जण आढळून आले आहेत. उर्वरित ७६ लोकांचा शोध गतीने सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

निजामुद्दीन येथील तबलिगी मेळाव्यात पुणे विभागातील १८२ जण गेले होते. त्यांची यादी प्राप्त झाली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील १३६ , सातारा जिल्ह्यातील ५, सांगली जिल्ह्यातील ३, सोलापूर जिल्ह्यातील १७ व कोल्हापूर जिल्ह्यातील २१ जणांचा समावेश आहे. या माहितीची छानणी करताना त्यातील नावे दुबार आढळून आली आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी ७ व्यक्ती आहेत. १८२ पैकी १०६ जण आढळून आले आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील ७०, सातारा जिल्ह्यातील ५, कोल्हापूर जिल्ह्यातील १० व सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातील १०६ जणांना ट्रेसिंग करुन त्यातील ९४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचे स्त्रावनमुने घेण्यात येणार आहेत.

यादीतील ५१ व्यक्तीच्या कॉल रेकार्डनुसार ते बाहेरच्या राज्यात असण्याची प्राथमिक शक्यता आहे. तर उर्वरित तपास गतीने सुरु आहे. काही प्रकरणात काहींनी भ्रमणध्वनी सिमकार्ड बदलले असल्याची माहिती पोलीस तपासात आढळून आली आहे. काही राज्यांच्या किंवा इतर जिल्ह्यात ज्यांचे संपर्क आढळून आले ती माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

पुण्यातील ५१  जण इतर राज्यातील असल्याची माहिती मिळाली असून यासंदर्भात खात्री केली जात आहे. पुणे विभागातील १८२  जणांचा  तपास सुरु असून ते विभागात असतील तर त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल व त्यांचे स्त्राव नमुने घेतले जातील. स्त्राव नमुन्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे म्हैसेकर म्हणाले

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा