भिलवाडा पॅटर्नः हो, याच त्या टीना दाबी!

0
165

यूपीएससी परीक्षेत २०१६ मध्ये टॉपर ठरलेल्या टीना दाबी आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. कोरोना विषाणूने ग्रासलेल्या भिलवाड्यात त्यांनी आपली गुणवत्ता आणि कार्यकुशलता दाखवली आणि तोच भिलवाडा आता ‘भिलवाडा पॅटर्न’ म्हणून जगभर चर्चेत आला आहे. आरक्षणामुळे टीना दाबी यूपीएससी टॉपर झाल्याच्या शेंड्या उडवणाऱ्यांना ही सनसनीत चपराक आहे.

  • संदीप बंधुराज

यूपीएससी परीक्षेत २०१६ मध्ये टॉपर ठरलेल्या टीना दाबी आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. कोरोना विषाणूने ग्रासलेल्या भिलवाड्यात त्यांनी आपली गुणवत्ता आणि कार्यकुशलता दाखवली आणि तोच भिलवाडा आता ‘भिलवाडा पॅटर्न’ म्हणून जगभर चर्चेत आला आहे. आरक्षणामुळे टीना दाबी यूपीएससी टॉपर झाल्याच्या शेंड्या उडवणाऱ्यांना ही सनसनीत चपराक आहे.

२०१६ च्या यूपीएससी परीक्षेत देशात पहिली आल्यानंतर टीना दाबी हे नाव सर्वांच्या नजरेत आले. त्यावेळी त्यांचे वय हे केवळ २२ वर्षे होते. त्यानंतर त्यांनी आयएएसचे प्रशिक्षण पूर्ण केले तेही टॉपर म्हणूनच. त्यांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया गोल्ड मेडल मिळाले. त्यानंतर त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली भिलवाडा उपविभागीय अधिकारी म्हणून. या सर्व काळात त्या सतत चर्चेत राहिल्या. त्यांनी यूपीएसीत टॉप केल्यानंतर त्वरीत त्यांच्यावर आरक्षणामुळे त्या टॉपर ठरल्या अशी ‘पारंपरिक’ टिका करण्यात आली. त्यासाठी आरक्षणाची प्रचंड ॲलर्जी असलेल्या आयटीसेलने मोहिमच राबविली. त्यानंतर टीना यांनी एका काश्मिरी मुसलमानाशी लग्न केले. ( तेही आयएएस आहेत) आणि पुन्हा आयटीसेल सक्रीय झाला. त्यानंतर जेव्हा संधी मिळेल तेव्हा सतत आयटीसेलच्या मार्फत टीना दाबी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरुच राहिला. आता टीना दाबी या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.  पण आता त्यांची होणारी चर्चा ही त्यांच्या गुणवत्तेची होत आहे.

भिलवाडा पॅर्टन म्हणून संपूर्ण जगाने ज्यांची नोंद घेतली, त्या भिलवाड्याच्या प्रशासकीय प्रमुख म्हणजे उपविभागीय अधिकारी टीना दाबी आहेत. भिलवाड्यातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर कोरोना बाधीत झाला. त्या दवाखान्यात तीन दिवसांत सुमारे ६००० लोकांना तपासण्यात आले होते. त्यामुळे सर्वांचीच झोप उडाली. भिलवाडा हे कोरोनाचे भारतातील केंद्र बनणार, असेच चित्र निर्माण झाले. बीबीसीने तर भिलवाडा हे ‘भारतातील इटली’ असल्याचा उल्लेख केला.

प्रशाकीय यंत्रणाही खडबडून जागी झाली आणि कामाला लागली. टीना दाबी यांच्यावर जबाबदारी आली. त्यांनी त्वरीत हॉस्पिटलचा परिसर एक किलो मीटरपर्यंत सिल केला. १९ मार्चलाच कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली. देशात प्रधानमंत्र्यांनी २४ मार्चला लॉकडाऊन लावले. त्यापूर्वीच असा निर्णय भिलवाड्यात घेण्यात आला. स्वत: टीना दाबी या संपूर्ण शहरात फिरल्या. जेथे विनंती चालली तेथे विनंती केली, जेथे कायद्याचा बडगा दाखवण्याची गरज पडली तेथे दाखवला. तीस लाख लोकसंख्येचे भिलवाडा शहर हे कापड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. तेथे बाहेरच्या राज्यातील मजूरही होते. त्यांचीच नव्हे कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी आधीच नियोजन केले होते. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. (त्यासाठी माध्यमांतून टीका होण्याची वाट नाही पाहिली), डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या ६००० लोकांची तपासणी तर केलीच पण भिलवाड्यातील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात आली. २२ मार्च ते २७ मार्च या काळात ४ लाख ३५ हजार घरांना भेटी देवून २२ लाख लोकांची माहिती घेण्यात आली. यात जे बाधित व संभाव्य बाधित वाटले त्‍यांचे त्वरित विलगीकरण करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्याचा परिणाम असा झाला की ३० मार्चपर्यंत भिलवाडा कोरोनामुक्त झाला. टीना दाबी यांनी आपली बुद्धीमत्ता आणि कौशल्याचा वापर करुन सर्व नियोजन केले. त्याला राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभले हे नाकारता येणार नाही. आज जो तो ‘भिलवाडा पॅटर्नची’ चर्चा करत आहे, बारामतीकरही याच पॅटर्नची अंमलबजावणी करण्याचे म्हणत आहेत.

टीना दाबी यांनी त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे केले. एका आयएएस अधिकाऱ्यांने कशाप्रकारे डोके लावले पाहिजे ते त्यांनी दाखवून दिले. पण त्याचबरोबर त्यांनी टिकाकारांनाही चपराक दिली. त्या एक महिला आहेत शिवाय मागास ( मानल्या जाणाऱ्या ) समाजातील आहेत आणि या दोन्ही वर्गांची बुद्धीमत्ता आणि कार्यक्षमतेच्याबाबतीत खिल्ली उडविली जाते. पण टीना दाबी यांनी हे दाखवून दिले की गुणवत्ता कुणाची मक्तेदारी नाही. भिलवाड्यातील कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाच्या मदतीला जे सरकारी डॉक्टर धावले तेही आरक्षणातून आलेले होते, त्यांनीही आपली गुणवत्ता दाखवून दिली, याचीही नोंद घ्यायला हवी!

कालच महामानव जोतिबा फुले यांची जयंती झाली. दोन दिवसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या दोन्ही महामानवांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. आरक्षणाचाही पुरस्कार केला. शाहू महाराज तर आरक्षणाचे जनकच. टीना दाबी आणि भिलवाड्यातील डॉक्टर्सनी या महामानवांच्या दूरदृष्टीची प्रासंगिकताच दाखवून दिली आहे.

(खरे तर सर्वांनी आपले कर्तव्यच केले आहे. पण भारतातील डॉक्टर्स आरक्षणातून भरले असल्याने इथे आरोग्य सुविधेत दर्जा नाही, असा प्रचार आयटी सेलने सुरु केला होता म्हणून याची अशी नोंद घ्यावी लागली, एवढेच!)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा