कोरोनाच्या मुकाबल्यासाठी २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज द्याः अजित पवारांची केंद्राकडे मागणी

0
38
संग्रहित छायाचित्र.

मुंबई महाराष्ट्रावर आलेले कोरोनाचे संकट, टाळेबंदीमुळे ठप्प झालेली राज्याची अर्थव्यवस्था, राज्य उत्पन्नात सातत्याने होत आलेली घट या पार्श्वभूमीवर आगामी काळात कोरोना संसर्गाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकाने महाराष्ट्राला २५ हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज तातडीने द्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजममंत्री अजित पवार यांनी  केंद्र सरकारकडे केली हे. गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्राकडून राज्याला येणे असलेली १६ हजार ६५४ कोटींची थकबाकी अद्याप मिळालेली नाही, ती ३१ मार्चपर्यंत द्या, असेही त्यांनी पत्रात नमुद केले आहे.

केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने देशात तीन आठवड्यांची टाळेबंदी जाहीर केली आहे. या टाळेबंदीमुळे उद्योग, व्यापार, सेवाक्षेत्र ठप्प आहे. त्याचा राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात राज्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडत असते. परंतु कोरोना आणि टाळेबंदीमुळे राज्याचे उत्पन्न जवळपास थांबले आहे. त्यामुळे राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे,  असे अजित पवार यांनी या पत्रात नमूद केले आहे.

केंद्र सरकारकडून केंद्रीय करातील हिश्यापोटी राज्याला मिळणारे १६८७ कोटी तसेच मदतरुपी अनुदानापोटी मिळणारे १४ हजार ९६७ कोटी रुपये अशी एकूण १६  हजार ६५४  कोटींची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. ही थकबाकी 31 मार्चपर्यंत राज्याला मिळावी तसेच कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी  २५  हजार कोटींचे विशेष पॅकेज महाराष्ट्राला मंजूर करण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राकडे केली आहे. अजित पवार यांनी केंद्र सरकारमधील राज्याचे प्रभारी मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना हे पत्र लिहिले असून राज्याची आर्थिक स्थिती व राज्यासमोरील आव्हानांची माहिती त्या पत्रात दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा