मरकज की हरकत!

0
158
संग्रहित छायाचित्र.

कोणत्याही नियोजनाशिवाय केलेल्या लॉकडाऊनचे अपयश उघडे पडू लागले होते.मजूर भूकेकंगाल होऊन पायपीट करत होते.सरकारवर प्रचंड टीका होत होती. या सर्वांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सुरुवातीला मरकजमधील हरकत दुर्लक्षित करण्यात आली असावी. आणि आता सरकारवर चौफेर टीका होताच आपल्या चिरपरिचीत स्टाईलने लोकांचे लक्ष मरकजकडे वळवण्याची कपटनिती अंमलात आणण्यात आली, असे म्हणायला खूप वाव आहे.

  • संदीप बंधुराज

अखेर जे व्हायला नको होते तेच झाले! कालपरवापर्यंत चीनाचा असलेला कोरोना विषाणू आता भारतात थेट ‘जिहादी’ बनलाय! गोदी मिडायाने व भक्तांनी कोरोनाचा धर्म शेवटी शोधून काढलाच. कालपरवापर्यंत घरी जाण्यासाठी पायपीट करणाऱ्या लोकांवर बोलणारे भारतीय आता अचानक निझामुद्दीनवर बोलू लागेल आहेत. ‘गरिबांच्या प्रश्नाकंडे सरकार लक्ष देत नाही’ या भूमिकेतले सत्य दिसत असतानाच गरिबांपेक्षाही ‘कोरोना जिहादचा’ विषय महत्वाचा केला गेलाय! अर्थात यात निझामुद्दीन येथील मरकजमध्ये कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांचा आणि तेथून आल्यानंतर स्वत:ची तपासणी करवून न घेणाऱ्यांचा दोष आहेच. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रमच रद्द केला असता तर या कार्यक्रमात सहभागी झाल्याने कोरोनाची बाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या दहा जणांना आपला जीव गमवावा लागला नसता. शिवाय या संकट प्रसंगीही भक्तांना आणि गोदी मिडियाला धार्मिक तेढ वाढवण्याचा अजेंडा राबविता आला नसता. या प्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना कडक शासन व्हायलाच हवे. परंतु जे दिल्ली पोलिस अमित शाह यांच्या गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करतात, ते आणि अमित शाह यांचे गृह मंत्रालय काय झोपा काढत होते का? हाही खरा प्रश्न आहे.

देशातील ठराविक माध्यमे, भक्त मंडळी गेल्या कित्येक वर्षांपासून धार्मिक तेढ वाढवण्याचा व ती टिकवून ठेवण्याचा कसोशीने राजकीय व पगारी प्रयत्न करीत आहेत. त्यांना मरकजसारख्या घटनांनी संधीच मिळते. देशभर मुस्लिमांच्या विरोधात वातावरण गरम केले जात आहे. गोदी मिडीयाने तर ‘भारताला इटली बनवण्याचे षडयंत्र’, ‘कोरोना जिहाद’ वगैरे वगैरे हॅशटॅग देवून आग पेटवायला सुरुवात केली आहे. हे मुसलमान पाकिस्तानातून कोरोना घेवून आले अशी धारणा सोशल मिडियामार्फत पक्की केली जात आहे. कोरोनाच्या संकटातून देश जात असतानाही अशी आग लावणाऱ्यांच्या मुसक्या सरकारने आवळायला हव्यात. हे काम अमित शाह यांच्या गृह मंत्रालयाचे आहे. पण सरकार तसे करताना दिसत नाहीय. सरकार याबद्दल काहीच बोलेनासे का झालंय? सरकारचे हे मौन अशा विखारी प्रचारासाठी मूकसंमतीच देणारे ठरते.

देशात केवळ मरकजमुळेच कोरोना पसरलाय, किंवा पसरणार आहे असेच वातावरण निर्माण केले जात असले तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. देशात परदेशातून कोरोना घेवून सर्वात प्रथम येणारे कोण होते? लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतरही कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा लग्नाला गेले. पार्श्वगायिका कनिका कपूर पार्टीला गेली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ समर्थकांच्या ताफ्यासह राम मंदिरात गेले.  मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान यांनी कमलनाथ सरकार पडल्याचा आनंद भली मोठी गर्दी जमवूनच साजरा केला. मुख्यमंत्रिपदाची शपथही गर्दीतच घेतली. घंटा, शंख व थाळ्या वाजवून भक्त व भरकटवली गेलेली माणसे गर्दीनेच रस्त्यावर उतरली.  लॉकडाऊन असतानाही बिनधास्त बाहेर पडणारे, गर्दी करणारे, लग्नांचे कार्यक्रम करणारे, प्रवचन करणारे वगैरे वगैरे सर्व लक्षात घ्यायला हवेत. या सर्वांकडे जसे आपण धर्माच्या नावाने पाहत नाहीत तसेच मरकजबाबतही पहायला नको. पण नेमके तेच होत नाही. खरे तर देश आजही कोरोनाच्या विळख्यात आहे, तो विळखा एकोप्याने सोडवायचा असेल तर सुज्ञांनी प्रयत्नपूर्वक हा हिंदू-मुसलमान अजेंडा हाणून पाडायला हवा.

बरं, मरकज घडले त्याला केवळ आयोजकच जबाबदार आहेत का? येथील धार्मिक कार्यक्रमाला देश विदेशातून लोक आलीत याची कल्पना गृहमंत्रालयाला नव्हती? मूळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा कार्यक्रम होऊ नये यासाठी का सूचना केल्या नाहीत? विदेशातून आलेल्या लोकांचे स्क्रिनिंग एअरपोर्टवर झाले नव्हते का? प्रधानमंत्री तर सार्कच्या बैठकीत आम्ही जानेवारीपासूनच स्क्रिनिंग सुरु केलंय असे सांगत होते. मग तरीही ही लोक कशी काय आली? त्यांच्या देशात कोरोनाचे थैमान असताना त्यांना येवूच का दिले? बरे आली ती आली ती परत गेलीत की नाहीत, याचा तपास घेण्याची जबाबदारी कुणाची होती? गृहमंत्रालयाच्या ताब्यात असलेल्या गुप्तचर यंत्रणेला याचा सुगावा का लागला नाही ? बरे मरकजमध्ये दररोज दोन एक हजार लोक असतात हे माहिती असतानाही लॉकडाऊन करताना अशी लोक तेथे असू शकतील याचा विचार का केला गेला नाही? मरकजच्या जवळच पोलीस स्टेशन आहे. लॉकडाऊनची घोषणा होताच त्यांनी डोळे का उघडले नाहीत? मरकज व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की आम्ही पोलिसांना फसलेल्या लोकांची कल्पना दिली होती व पासची मागणी केली होती. त्याबाबतची अधिकाऱ्यांनी रिसीव्ह केलेली पत्रही त्यांनी दाखवली. तरीही हे असे का झाले ? पोलीस अधिकारी धर्मगुरुंना तंबी देतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे पण तो २३ तारखेचा आहे. दिल्लीत १९ तारखेपासून लॉकडाऊन सुरु आहे. मग इतके दिवस का लागले? त्यातही समोरची मंडळी किती लोक आहेत ते सांगत आहेत.  मग तेव्हा ताबडतोब का नाही हालचाल केली गेली? त्यानंतर आठ दिवस का डोळे झाक केली? जेवढा दोष या कार्यक्रमाच्या आयोजकांचा आहे त्यापेक्षाही जास्त दिल्ली व केंद्र सरकारचा आणि विशेषतः अमित शाह यांच्या गृह मंत्रालयाचा आहे.

टायमिंग कशा प्रकारे साधले जाते याचा पूर्वानुभव लक्षात घेता मरकजचे प्रकरण बाहेर आले. त्याच्या टायमिंगचा विचार करता वरच्या अनेक ‘कां’ चा खुलासा होतो. एवढी लोक एका ठिकाणी आहेत. त्यात परदेशी पाहुणे आहेत आणि त्याची खबर गृहमंत्रालयाला नाही असे होऊच शकत नाही. ( तसे असेल तर तोही गृहमंत्रालयाचा दोष आणि अपयश आहे ) मग तरीही गृहमंत्रालय म्हणा किंवा सरकार म्हणा का गप्प होते ? की सरकारला हे असेच घडू द्यायचे होते? कोणत्याही नियोजनाशिवाय केलेल्या लॉकडाऊनचे अपयश उघडे पडू लागले होते. मजूर भूकेकंगाल होऊन पायपीट करत होते. सरकारवर प्रचंड टीका होत होती. या सर्वांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सुरुवातीला मरकजमधील हरकत दुर्लक्षित करण्यात आली असावी. आणि आता सरकारवर चौफेर टीका होताच आपल्या चिरपरिचीत स्टाईलने लोकांचे लक्ष मरकजकडे वळविण्यात आले असण्याची कपटनिती असावी असे म्हणायला खूप वाव आहे. कोरोनाच्या संकटापासून सोशल मिडीयावरुन गृहमंत्री दिसत नसल्याची चर्चा होत होती. ते काही तरी धमाका करतील का अशी शंका घेतली जात होती. एवढे सगळे होत असतानाही ते गायब होते. दिल्लीच्या दंगलीवेळीही ते असेच गायब होते. ते काही तरी खलबते करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत होता. मरकज प्रकरण हाताळण्यासाठी “टायमिंगच्या” शोधात तर गृहमंत्री नव्हते?

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा