दिल्ली हिंसाचारः चार दिवसांत पोलिसांना आले १३२०० फोन कॉल्स, कारवाईचा रकाना रिकामाच !

0
70
दिल्लीतील दंगलीचे संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः राजधानी दिल्लीत घडलेल्या दंगलीच्या काळात २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान दिल्ली पोलिसांना दंगलग्रस्त लोकांनी १३२०० फोन कॉल्स केले. पोलिसांनी ते नोंदवूनही घेतले. परंतु तरीही दंगलग्रस्तांना मदत मिळाली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे दंगलीतील पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दिल्लीचे पोलिस खाते केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित आहे. दिल्ली सरकारचे तेथील पोलिसांवर कुठलेही नियंत्रण नाही.

 देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील पोलिसांकडे अत्याधुनिक संसाधने आहेत. तत्काळ कारवाईसाठी लागणारी आवश्यक ती यंत्रणा आणि साधनसामुग्रीही आहे. दिल्लीचा बहुतांश भाग सीसीटीव्हीच्या निगरानीत आहे. देशातील अन्य पोलिसांच्या तुलनेत दिल्ली पोलिसांचे प्रशिक्षणही उत्कृष्ट आहे. तरीही दिल्लीमध्ये सलग चार दिवस दंगल पेटत राहिली आणि दिल्ली पोलिसांनी ती नियंत्रणात आणण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न केले नसल्यामुळेच दिल्ली उच्च न्यायालयानेही दिल्ली पोलिसांना चांगलेच धारेवर धरले होते.

हेही वाचाः दिल्लीतील दंगलखोरांना सुरक्षा दलातील जवानांप्रमाणे देण्यात आले होते प्रशिक्षण!

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दंगलीचे चार दिवस म्हणजेच २३ ते २६ फेब्रुवारी या काळात पोलिस नियंत्रण कक्षाला येणाऱ्या फोन कॉल्समध्ये प्रचंड वाढ झाली. २३ फेब्रुवारीला नियंत्रण कक्षाला ७०० कॉल्स आले, २४ फेब्रुवारीला ३५००, २५ फेब्रुवारीला ७५०० आणि २५ फेब्रुवारीला १५०० फोन कॉल्स आले. भजनपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील यमुना विहारमध्ये हिंसाचार झाला होता. या भागातून २४ते २५ फेब्रुवारी दरम्यान फोन कॉलवर ३०००-३५०० तक्रारी करण्यात आल्या. फोनवर आलेल्या तक्रारींची नोंद रजिस्टरमध्ये घेण्यातही आली. या रजिस्टरमध्ये तक्रारीचे स्वरूप, तक्रारीची वेळ आणि काय कारवाई केली, असे रकाने असतात. मात्र बहुतांश प्रकरणात ‘काय कारवाई केली’ हा रकानाच रिकामा असल्याचे आढळून आले आहे. अशाच प्रकारच्या तक्रारी करावलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शिव विहारमधूनही आल्या आहेत. यमुना विहारचे भाजप नगरसेवक प्रमोद गुप्ता यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, त्यांनीही पोलिसांना वारंवार फोन केले, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पोलिस परिस्थिती नियंत्रणात आणू शकले नाहीत. जर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असती तर अशी परिस्थितीच उद्भवली नसती, असा दावाही गुप्ता यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा