केंद्र सरकारकडे महाराष्ट्राच्या प्रलंबित प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी खासदारांची समिती

0
34

मुंबई: महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न पक्षीय चौकट ओलांडून खासदारांनी एकत्रितपणे केंद्र सरकारकडे मांडावेत. राज्याच्या विकासाशी निगडीत सर्वच मुद्यांवर महाराष्ट्राची एकजूट दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय खासदारांना केले. दरम्यान, केंद्र सरकारच्या विविध विभागांकडे राज्याच्या प्रलंबित प्रश्नांचा एकत्रित पाठपुरावा करण्यासाठी खासदारांची समिती गठित करून तिच्या समन्वयकपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये समितीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस खासदार शरद पवार यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्य सर्वश्री  जयंत पाटील, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, दादाजी भुसे, नवाब मलिक, अस्लम शेख, आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते. महाराष्ट्राचे कुटुंब म्हणून खासदारांनी दिल्लीत काम करावं आणि राज्यातील जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून द्यावा. एकजुटीने आवाज उठविला तर प्रश्न सोडविले जातील, असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले, जनतेने ज्या कामांसाठी निवडून दिले आहे ते पूर्ण झालेच पाहिजे.

विषयानुरूप खासदारांची टीम तयार करा: महाराष्ट्राचे प्रश्न संसदेत मांडताना विषयानुरूप टीम तयार करा. त्यात पक्षीय भेदाभेदाला थारा देऊ नका. ज्यावेळी महाराष्ट्रातील विषयांवर खासदार संसदेत विचार मांडणार असतील त्यावेळी सर्व खासदारांनी आवर्जून उपस्थित राहिले पाहिजे, असे सांगतानाच पुढील महिन्यात दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये खासदारांची बैठक घेऊन प्रश्न सुटले की नाहीत याचा आढावा घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सीमा प्रश्नाबाबत सर्वपक्षीय खासदारांनी एकजूट दाखवावी: केंद्र सरकारकडे महाराष्ट्राशी संबंधित विविध विषयांचा पाठपुरावा केला जात आहे. पीक विमा योजनेत सुधारणा करणे आवश्यक असून पूर व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी सुमारे 15 हजार कोटी रुपयांपैकी 990 कोटी रुपये मंजूर झाले आहे. उर्वरित निधी मिळण्यासाठी खासदारांनी पाठपुरावा करावा. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत तिथल्या बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा आहे हे दाखवून देण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी एकजूट दाखवावी. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं पत्र केंद्र शासनाकडे पाठविलं आहे त्याचा एकत्रित पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सांगितले.

सर्वपक्षीय समिती असावी: राज्याच्या प्रश्नांचा एकत्रित पाठपुरावा होण्यासाठी सर्वपक्षीय समिती असावी अशी सूचना खासदार शरद पवार यांनी यावेळी मांडली. प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी केंद्र शासनाकडे प्रलंबित असून राज्याला हा निधी प्राधान्याने मिळावा यासाठी खासदारांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी सर्वच खासदारांनी आपल्या भागातील विविध प्रलंबित मुद्यांबाबत माहिती देताना राज्याच्या हिताच्या प्रश्नांवर एकत्रित पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा