मुंबईः सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी संघटनांनी वेतनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेला तीन दिवसांचा देशव्यापी संप स्थगित केला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यामुळे हा संप स्थगित करण्यात आल्याची घोषणा ऑल इंडिया बँक कर्मचारी असोसिएशनने शनिवारी केली आहे. 11 ते 13 मार्च असे तीन दिवस हा संप पुकारण्यात आला होता.
सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांचे प्रतिनिधी आणि इंडियन बँक असोसिएशनचे प्रमुख राजकिरण रॉय यांच्या शनिवारी मुंबईत चर्चा झाली. इंडियन बँक असोसिएशनने बँक कर्मचार्यांच्या काही प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे 11 मार्चपासून पुकारण्यात आलेला तीन दिवसांचा प्रस्तावित संप स्थगित करण्यात आल्याचे इंडियन बँक असोसिएशनचे महासचिव सी. व्यंकटचेलम यांनी सांगितले.
बँक कर्मचाऱ्यांचा हा नियोजित संप झाला असता तर तब्बल सहा दिवस बँका बंद राहणार होत्या. 10 मार्च रोजी होळीची सुटी आहे. आठवडा अखेरीस दुसरा शनिवार आणि रविवार असे दिवस येतात. यामुळे ऐन सणासुदीत ग्राहकांची चांगलीच तारांबळ झाली असती. आता हा संप स्थगित करण्यात आल्यामुळे ग्राहकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.