नवी दिल्लीः नवीन पॅनकार्ड काढण्यासाठी आता तुम्हाला दोन पानी अर्ज भरण्याची आणि पॅनकार्ड मिळण्यासाठी काही दिवस वाट पाहण्याची अजिबात गरज नाही. प्राप्तिकर विभागाने करदात्यांसाठी एक नवी योजना सुरू केली असून त्यानुसार आधारकार्ड असलेल्या व्यक्तीला तत्काळ ऑनलाइन मोफत पॅनकार्ड मिळणार आहे. तत्काळ ई-पॅनकार्ड अर्जात तुम्हाला फक्त तुमचा आधारकार्ड क्रमांक भरायचा आहे. त्यानंतर केवायसी पूर्णकरण्यासाठी तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल. एकदा केवायसी पूर्ण झाली की तुम्हाला तुमचे ई-पॅनकार्ड १० मिनिटांत मिळेल.
अर्जदाराला पीडीएफ फॉर्मेटमध्ये कायम खाते क्रमांक (पॅन) १० मिनिटांत मिळणार आहे. हे ई-पॅनकार्ड हार्डकॉपी पॅनकार्ड इतकेच चांगले आहे. जर तुम्हाला लॅमिनेटेड पॅनकार्ड हवे असल्यास ५० रुपये शुल्क भरून तुम्ही या ई-पॅनकार्डच्या रिप्रिंटची ऑर्डर देऊ शकता.
तत्काळ ई-पॅनकार्डसाठी असा करा ऑनलाइन अर्जः
- प्राप्तिकर विभागाच्या ई-फिलिंग पोर्टलला भेट द्या. डाव्या बाजूला क्विक लिंक्समध्ये ‘इन्स्टंट पॅन थ्रू आधार’ सेक्शनवर क्लिक करा.
- नवीन वेबपृष्ठावर ‘गेट न्यू पॅन’वर क्लिक करा.
- नवीन पॅनकार्डसाठी आधारशी लिंक असलेल्या तुमच्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी मिळवण्यासाठी तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ठ करा.
- ओटीपी व्हॅलिडेट करा.
- आधारचा तपशील व्हॅलिडेट करा.
- पॅनकार्ड अर्जासाठी तुम्हाला तुमचा इ-मेल आयडीही व्हॅलिडेट करता येईल.
- तुमच्या आधार क्रमांकाशी संबंधित तुमचा ई-केवायसी डाटा यूआयडीएआयकडे पाठवला जाईल. त्यानंतर तुम्हाला ई-पॅनकार्ड जारी केले जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १० मिनिटेही लागत नाहीत.
- चेक स्टेटस/ डाऊनलोड पॅन या भागात तुम्हाला तुमचे पॅन पीडीएफ फॉर्मेटमध्ये डाऊनलोड करता येईल. तुमचा ई-मेल आयडी तुमच्या आधार डेटाबेसशी नोंदणीकृत असेल तर हे पॅनकार्ड तुम्हाला तुमच्या ई-मेल आयडीवरही मिळेल.
नवीन पॅनकार्ड मिळवण्याची एकूणच प्रक्रिया मोफत, सोपी आणि कादगविरहित करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर तुम्हाला कोणतेही डाक्यूमेंट अपलोड करण्याची आवश्यकता नाही. ज्यांना यापूर्वी पॅनकार्ड मिळालेले नाही, ज्यांचा मोबाइल क्रमांक आधारशी लिंक आहे आणि ज्यांच्या आधारकार्डवर दिनांक/ महिना/ वर्ष अशा पूर्ण स्वरूपात जन्म तारीख नोंदवलेली आहे, अशाच व्यक्तिंसाठी ही सुविधा आहे. अज्ञान व्यक्तींसाठी ही सुविधा उपलब्ध नाही.