कलासक्त श्रीमंती!

0
430

कमी कष्टात जास्त पगाराची श्रीमंती म्हणजे प्राध्यापकी पेशा हा समाजमानत रूढ झालेला प्रघात. काहींच्या बाबतीत ते खरेही असेल कदाचित. परंतु हीच प्राध्यापकी समाजोपयोगी ‘श्रीमंती कशी ’ठरू शकते, याचे उत्तम उदाहरण प्रा. संभाजीराव भोसले यांनी घालून दिले आहे. एका कलासक्त श्रीमंताविषयी…

संजय शिंदे (लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आहेत.)

कौटिल्याच्या अर्थशास्त्रात ‘श्रीमंत’ अन् ‘गरीब’ असे दोनच वर्ग असतात, अशी मांडणी केलेली आहे. नंतरच्या काळात मात्र जाणीवपूर्वक मध्यमवर्ग निर्माण केला गेला आणि बघता बघता याच वर्गाचा सर्व क्षेत्रात दबदबा वाढला. मध्यमवर्ग आणि मध्यममार्ग असा जणू आपला स्थायीभावच बनला आहे. याला काही माणसं अपवाद असतात. आर्थिक समृद्धीपेक्षाही त्यांच्या मनाची श्रीमंती अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते. असाच आमचा दिलदार मित्र अर्थातच प्रा संभाजी भोसले.

संभाजीरावांची पहिली भेट झाली ती पंधरा वर्षापूर्वी. मराठवाड्याच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाचा ध्यास घेतलेल्या वसंतराव काळे यांच्या सोबत विद्यापीठातच भेट झाली. या भेटीतनंतर मित्रत्त्वाचे ऋणानुबंध वाढत गेले. विशेषतः जनसंपर्क अधिकारी म्हणून रुजू झाल्यावर मैत्रीचा धागा अधिकच घट्ट विणला गेला. अधिसभा सदस्य या नात्याने ज्या ज्या वेळी ते औरंगाबादेत आले, त्यावेळी ज्यांना हमखास भेटल्याशिवाय तुळजापूरला जात नसत त्यापैकीच मी एक. खरतर व्यक्तिगत मैत्रीचं पुराण सांगत बसण्यापेक्षा या राजबिंड्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोललं पाहिजे. तुळजापूरला यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राज्यशास्त्राचे अध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. पण त्याहीपेक्षा लोककलावंत, दर्दी रसिक, तळमळीचा कार्यकर्ता अन् जीवाला जीवाला जीव देणारा मित्र ही ओळख मला महत्त्वाची वाटते. आई तुळजाभवानीच्या दरबारात आलेल्या कोणत्याही पाहुणा, मित्राला संभाजीरावांकडून पाहुणचार भेटला नाही असं सहसा कधीच होत नाही. देवीच्या दर्शनानंतर खास उस्मानाबादी काळ्या मसाल्यातील रस्सा ठरलेला असतो. मग ते औरंगाबाद, पुण्याला असोत की अन्य कुठेही आलेल्या माणसाची व्यवस्था करणार. काही कामानिमित्ताने बाहेरगावी निघायचं ठरलं तरी गाडीत हमखास एक दोन मित्र सोबत असणारच. असा हा मित्रपरिवाराच्या गोतावळ्यात रमणारा राजा मनाचा माणूस. महाराष्ट्रातील असं एकही विद्यापीठ नाही की तेथील युवक महोत्सव संभाजीरावांनी जवळून पाहिला नसेल. हलगी वाजली की पैलवानाला कुस्तीची खुमखुमी येते, तद्वतच युवक महोत्सव जवळ आला की त्यांच्यातला कलावंत शांत बसू शकत नाही. तुळजापूरचा नवरात्रोत्सव आणि युवक महोत्सव हे त्यांच्या जीवनात नेहमीच आनंदाचे क्षण ठरलेले आहेत. अनेक विद्यापीठांचे विद्यार्थी कल्याण संचालक, प्राध्यापक, कलावंत, परीक्षक व विविध अधिकार मंडळाचे सदस्य यांची जणू यादीत संभाजी राजांच्या डोक्यात ‘सेव’ केलेली असते.

केवळ एवढ्यापुरताच त्यांचे काम मर्यादित असे नाही तर तुळजापूर नगरपालिका, पंचरंगी प्रतिष्ठान यासह मित्रमंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यही मोठे आहे. पाच वर्षापूर्वी तुळजापुरात घेतलेल्या युवक महोत्सवाचे स्वागताध्यक्ष म्हणून आम्ही सर्वांनी त्यांचे काम जवळून पाहिले. यावेळी त्यांच्या तगड्या नेटवर्कचा परिचय अनुभवायला मिळाला. सामाजिक कामासोबतच मधल्या काळात काही नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतले आहेत. यामध्ये तुळजामाता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळेची स्थापना, देवस्थानच्या निवासस्थानांचे व्यवस्थापन हे काम जोमाने सुरु आहे. आपल्या कौटुंबीक कामातून व आर्थिक उत्पन्नाच्या साधनापेक्षाही संभाजीराव असंख्य गोष्टी करीत असतात. एकदा मित्राला शब्द दिला की त्या शब्दाला जागणे हे त्यांच्या रक्तातच आहे. म्हणूनच कोणत्याही पदापेक्षा संभाजीराव माणूस म्हणून मला मोठे वाटतात. त्यांच्या या मैत्रीच्या श्रीमंतीचा अनुभव माझ्यासारखाच महाराष्ट्रातल्या शेकडो मित्रांनी घेतला आहे.

संभाजीरावांकडे बघितल्यावर वयाच्या पन्नाशीत ते पोहोचल्याची जाणीव होत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि तेज पाहिलं की अभिनेता देवानंद यांची आठवण होते. संभाजीराजांच्या या यशात पत्नी, मुलगा व मुलीचाही तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे. संभाजीरावांना लवकरच जावई येणार आहे. प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांचे ते व्याही असणार आहेत. मनासारखे सगळ्या गोष्टी लाभणं आणि जिवाभावाची माणसे मिळणं, यालाही एक प्रकारचं नशीबच लागतं. त्याअर्थाने संभाजीराव ‘नशीबवान’ आहेत

त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा व्यास उत्तरोत्तर वाढत जावा. आकाशाला गवसणी घालणार कर्तृत्व त्यांच्या हातून घडावं. आणि तरी देखील आजच्या प्रमाणेच पाय मात्र जमिनीवरच टेकलेले असावेत एवढीच आजच्या यानिमित्ताने अपेक्षा. यापेक्षा आणखी जास्त काय लिहिणार ?

अशा या अष्टपैलू अन दिलदार मित्राला दिर्घायुष्य लाभो, ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. ‘अतः दीप भव:’ या तत्त्वाप्रमाणे आपले जीवन समृद्ध आणि प्रकाशमान करणाऱ्या संभाजीरावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे हे फक्त निमित्त झालं, कारण..
ये तो इक रस्म-ए-जहाँ है
जो अदा होती है।
वर्ना सूरज की कहाँ
सालगिरह होती है।।

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा