‘कास्ट मॅटर्स’: जात नाही ती ‘जात’…!

0
179

नांदेडच्या सूरज येंगडेचे ‘कास्ट मॅटर्स’ हे पुस्तक सध्या चर्चेत आहे. सूरज सध्या हॉर्वर्ड विद्यापीठात पोस्ट डॉक्टोरल रिसर्च करतो. दलितांमध्ये तयार झालेल्या दलित मध्यमवर्गाची इतर दलितांच्या मुक्ती लढ्यात काहीच मदत होत नाही, उलट तो या कनिष्ठ समूहावर ओझे झाला आहे, असे लेखक सांगतो….

  • मुकुल निकाळजे

सूरज येंगडे यांनी लिहिलेलं ‘कास्ट मॅटर्स’ सध्या चर्चेत आहे. सुरज येंगडे मूळचे मराठवाड्यातील नांदेडचे असून ते सध्या अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात पोस्ट डॉक्टरेट रिसर्चर आहेत. आफ्रिकी विद्यापीठातून त्यांनी पी.एच.डी. केलेली आहे. त्यांनी जिन्हीवा, लंडन, न्यूयॉर्क इत्यादी ठिकाणच्या नामांकित संस्थासोबत काम केलेले आहे. ‘अ ग्लोबल जर्नल ऑफ सोशल एक्सक्लुशन’मध्ये ते सहसंपादक आहेत. जगभरातील नामांकित प्रकाशन संस्था आणि मीडिया हाऊसेसने त्यांचे लेखन प्रकाशित केलेले आहे.

‘कास्ट मॅटर्स’ अर्थात जात महत्त्वाची ठरते या पुस्तकात त्यांनी मुख्यतः जात कुठे कुठे आणि कशाप्रकारे प्रभाव पाडते यावर आजच्या परिस्थितीनुसार सखोल भाष्य केले आहे. यातील ‘बिइंग अ दलित’ पहिल्या प्रकरणात परस्पर मानवीसंबंध: उपरेपणा, अस्तित्व, मानवी जिव्हाळा आणि द्वेष जे जातीच्या विवादाभोवती गुरफटलेले आहेत यावर चिंतन केले आहे. लेखक म्हणतो, ‘ मला या जगात दुय्यम दर्जाचा म्हणून राहण्यास भाग पाडले आहे, तर ब्राम्हण आणि त्यांचे सार्वभौमत्व प्रथम दर्जाचे आहे. ‘लेखक आपल्या घरापासून, देशापासून खूप लांब ब्रिटनमध्ये शिकत असताना ज्या भारतीय सहविद्यार्थ्यांसोबत वेळ घालवायचा, रहायचा, जेवायचा ते सहकारी मित्र लेखक फेसबुकवर दलित अत्याचारांच्या विरोधात लिहत असल्याचे कळाल्यानंतर कसे वैरी झाले. त्यांच्यातल्या अनेकांनी त्याला ब्लॉक केले. हे भांडण लेखकावर त्यांच्याकडून झुंडीने हल्ला करेपर्यंत पोहोचले. ते विद्यार्थी मुख्यतः हिंदू-बनिया, सिंधी-शीख, ब्राम्हण आणि जैन समुदायातील होते. या बाबत लेखक म्हणतो ‘माझे, एका दलिताचे असे ठाम मतप्रदर्शन ते सहन करु शकले नाहीत.’ हे अनुभव सांगताना लेखकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आत्मकथा ‘वेटिंग फॉर व्हिसा’ आठवते. “निओ दलित राईसिंग’ या प्रकरणात वर्तमान दलित चळवळीचा आढावा घेतला गेला आहे. तर ‘द मेनी शेड्स ऑफ दलित्स’ या प्रकरणात दलितांमधील विविध प्रकारचे घटक त्यांच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिस्थितीच्या आधारे समजवण्याचा प्रयत्न केला आहे.

मध्यमवर्गीय दलितः

 ‘द दलित मिडल क्लास’ हे या पुस्तकातील महत्त्वाचे प्रकरण आहे. असा अनेकांचा आणि विशेषतः कम्युनिस्टांचा समज असतो की मध्यमवर्गीय झाल्यावर किंवा आर्थिक प्रगती झाल्यावर जात संपते. लेखक विविध प्रमाण देऊन या समजाला खोटे सिद्ध करतो. मुळात दलितांत अजून मध्यमवर्ग म्हणावा तसा तयारच झालेलाच नाही असे एनएसएसओ.च्या सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून लेखक म्हणतो. अनेक दलित बॉस आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत कनिष्ठांनी भेदभाव बाळगल्याचे व्यक्त केलेले आहे, असे लेखक म्हणतो. तो याबाबत उदाहरण देतो की, एका वरिष्ठ पत्रकाराने मुंबईतील एका दलित उद्योजकाविषयी स्टोरी केली आहे की, त्याचा एक कर्मचारी एकाच जगमधून पाणी पिण्याचे नाकारतो, आपली स्वतंत्र बॉटल आणतो. मालकाने कारण विचारल्यास नि:संकोच सांगतो की, मला माझ्या जातीचे नियम पाळायचे आहेत आणि तू जे पाणी पितोस तेच पाणी मी पिऊ शकत नाही. शेवटी तो उद्योजक आपल्यामुळे इतर कोणाला गैरसोय होऊ नये म्हणून स्वतःच आपली वेगळी बॉटल बाळगतो. त्या कर्मचाऱ्याच्या व त्याच्या परिवाराच्या आर्थिक स्त्रोतास तो जबाबदार असूनही! त्याला जातिव्यवस्थेच्या नियमाप्रमाणे वागण्यास भाग पाडले जाते. सफाईकाम करणाऱ्या मनुष्याचे, वितभट्टीवरील कामगांराचे, भूमिहीन शेतमजुरांचे जातिविषयीचे अनुभव आणि ड्रायव्हर, शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी, सरकारी आधिकारी, इत्यादींपेक्षा भिन्न असू शकतात. पण या भिन्न अनुभवांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे जाती व्यवस्थेचा अंमल ही आपल्या सारख्याच दुसऱ्या मनुष्याला कमी ठरवण्याची सर्वोच्च पद्धती आहे. जातिव्यवस्थेची जबरदस्त पकड मध्यमवर्गात थोडी शिथील होते हे खरे आहे, त्याचे कारण स्थलांतर आहे. आपले जात निर्देशित करणारी नावे लपवून किंवा बदलवून ब्रम्हणासारखी नावे ठेवणाऱ्यांच्या बाबतीत लेखक म्हणतो, नावे काही काळापुरती दुष्ट जातीवादापासून वाचवू शकतात. समाजात चांगली वागणूक, हिंदू सणांमध्ये सहभाग, मंदिरांमध्ये प्रवेश मिळवून देआ शकतात. पण परत आपल्यागावी आल्यानंतर गावातील गावगाडा त्यांना मंदिरात, खाजगी कार्यक्षेत्रात समान स्थान देण्याचे नाकारतो.

या भागात लेखकाने दलितांमध्ये सरकारी नोकऱ्या व इतर माध्यमातून जो काही 2-5% मध्यमवर्ग तयार झाला आहे त्याचा सखोल अभ्यास केला आहे. मध्यमवर्गीय नेतृत्व करत असलेल्या चळवळीचाही यात अभ्यास केला आहे. याचा एकंदरीत असा निष्कर्ष काढला आहे की, दलितांमध्ये तयार झालेल्या मध्यमवर्गाची इतर दलितांच्या मुक्तिलढ्यांसाठी काहीच मदत होत नाही, उलट ते या कनिष्ठ समूहावर ओझे असल्यासारखाच आहे.

भारतीय समाज, शासन, प्रशासन इत्यादींची दलितविरोधी वृत्ती कशी आहे हे लेखकाने विविध समाजशास्त्रीय, आर्थिक सर्वेक्षणाचे आकडे देऊन दर्शवली आहे.विविध बजेटच्या तरतुदी घोषित करताना कश्याप्रकारे दलित आणि आदिवासींच्या विरोधी वृत्ती दिसते हे लेखकाने विविध उदाहरणे, प्रमाण देऊन सांगितले आहे. 2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेच्या आयोजनात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले. या स्पर्धेसाठी दिल्ली सरकारच्या बजेटमधील अनुसूचित जातीच्या (SCSP) विकासासाठी असलेला निधी वर्ग करण्यात आला असल्याचे उदाहरण लेखक देतो.

‘दलितांचे सरसकटीकरण’ हा मुद्दा लेखक पुढे उपस्थित करतो. तो म्हणतो, जर एक दलित अपयशी ठरला तर त्याच्या सगळ्या समाजाला लाजवले जाते. परंतु एखाद्या ब्राम्हणाने एखादा गुन्हा केला तर त्याबाबत त्याची जातमध्ये न आणता त्याला एकट्यालाच दोषी म्हटल्या जाते. जर ब्राम्हण अनुत्तीर्ण राहिला तर त्याला सन्मानजनक कामाच्या बाजारात सामावून घेण्यासाठी जुळवाजुळव केली जाते, त्यासाठी प्रसंगी भ्रष्टाचाराचा अवलंब केला जातो. ब्राम्हणी समाजात सोईस्करपणे वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळे मापदंड लावले जातात.

‘दलित मध्यमवर्गाची सत्तेविषयी वृत्ती’ यात लेखक उदाहरण देतो की, कांशीराम यांनी दलित स्वाभिमानाचे पर्यायी राजकारण उभे केले होते ते संपताना दिसत आहे. मायावती आपला भाऊ आनंद कुमार यास प्रमोट करत आहे आणि इतर परिवारवादी पक्षांप्रमाणे बसपा ही होताना दिसत आहे. तसेच दलितांमधील स्वतःला उच्च व इतरांना कमी समजतो तो नव्याने कशाप्रकारे भेदभावाची बीजे रोवत आहे. तो याची दक्षता घेत आहे की समाजाच्या खालच्या स्तरावर कशी सत्ता गाजवता येईल. हा वर्ग कसा दलित चळवळीला मारक आहे, हे लेखकाने मांडल आहे.

दलित भांडवलवाद

‘दलित कॅपिटलिझम’ या प्रकरणात डिक्की व इतर संस्था व उद्योजकांचा सुरू असलेल्या दलित भांडवलवादाचा आढावा घेतला आहे. लेखक सुरुवातीला म्हणतो 1990 च्या नवउदारवादी धोरणानंतर पारंपरिक जातभांडवलशाहीला काहीसा ब्रेक मिळाला आणि डिक्कीला दलित उद्योजकांच्या निर्मितीसाठी जागा मिळाली. पुढे लेखक डिक्कीची तुलना अमेरिकेतील गोऱ्यांनी घोषित केलेल्या आणि मदत केलेल्या बुकर टी वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वातील आफ्रिकन अमेरिकन भांडवलवादाशी करतो. भारतातील दलितांचा देशातील संपत्तीवर आणि उत्पादनांच्या साधनांवर ताबा नाही म्हणून जोपर्यंत तो ताबा मिळत नाही तोपर्यंत दलित भांडवलवाद उभा राहू शकत नाही. म्हणून प्रस्थापित भांडवली व्यवस्थेविरोधात दलिताने बंड पुकारू नये म्हणून दलित भांडवलवाद हे या प्रस्थापितांनी दलितांना भांडवलवादाचे स्वप्न दाखवलेले प्रलोभन आहे. दलित ही संकल्पना शोषणाच्या विरूद्ध आहे आणि भांडवलवाद शोषण सुरू ठेवणे निवडतो. म्हणून भांडवलवाद समता प्रस्थापित करण्यास पर्याप्त नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानसभेला आपल्या श्येड्यूल कास्ट फेडरेशनद्वारे सादर केलेला संविधानाचा मसुदा ‘स्टेटस अँड मायनॉरिटिज’मध्ये सांगितलेल्या राज्य समाजवादाचा विचार करण्याची गरज असल्याचे मत लेखक व्यक्त करतो. या प्रकरणात जात सरंजामशाहीतील भांडवलवाद, बनिया भांडवलशाही इत्यादी विषयांवर सविस्तर प्रकाश टाकला आहे. या प्रकरणाच्या शेवटी लेखक म्हणतो, भांडवलशाही ही औद्योगिक व्यवस्था भारतात, जातीव्यवस्था मूळात भिनलेल्या देशात सततच्या दुःखाकडे नेणारा मार्ग आहे.

ब्राम्हणवादाच्या विरोधातील ब्राम्हण

‘ब्राम्हण अगेन्स्ट ब्राम्हणीजम’ या शेवटच्या प्रकरणात जन्माने ब्राम्हण असलेल्या ब्राम्हणवादी व्यवस्थेच्या विरोधात असलेल्यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी असलेल्या ब्राम्हणांचे वर्णन केलेले आहे. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळण्यासाठी पुढाकार घेतला, ती त्यांनी त्यांचे ब्राम्हण सहकारी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते जाळली हे उदाहरण लेखक देतो. जातीचे सर्वोच्च लाभार्थी असलेले ब्राम्हण आणि सर्वाधिक शोषित असलेले दलित यांनी एकत्र येऊन जात सोडावी असा लेखकाचा प्रयत्न दिसतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा