अंतरीचा ज्ञान ‘दिवा’ मालवू नको रे!

0
186
प्रतिकात्मक छायाचित्र.

अफवा पसरवणे ही एक वैचारिक खेळी आहे. एक प्रकारची युद्ध नितीच. त्यामुळे अफवा पसरवणारी व्यक्ती ही तैलबुद्धी पण निच प्रवृत्तीची असते. कोणती अफवा पसरवली की त्याचा काय परिणाम होईल आणि शेवटी त्याचा आपल्याला काय फायदा होईल याचा पूर्ण विचार त्याने केलेला असतो. अगदी बुद्धीबळच! अफवा पसरवणाऱ्याला लोकांचे मानसशास्त्र माहिती असते आणि त्याच्यावर त्याचा सर्व ‘फायद्या’चा खेळ अवलंबून असतो.

  • संदीप बंधुराज

‘विज्ञान-तंत्रज्ञान’ शाप की वरदान? या विषयावर आपण लहानपणी निबंध लिहिले असतील. आजच्या तुलनेत त्यावेळी आपल्यासमोर आलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान हे खूपच मागासलेले होते असे म्हणावे लागेल. सोशल मिडीया हे तंत्रज्ञानाचे सर्वांत भयानक स्वरुप आहे. भयानक यासाठी की त्याचा वापर कसा केला जातो हे आपण पाहत आहोत, भोगत आहोत. जेवढे फायदे त्याहून दुप्पट नुकसान! लहानपणी अशा विषयावर निबंध लिहिताना शेवटी मी लिहायचो की, ‘या विज्ञानाचा-तंत्रज्ञानाचा कसा वापर केला जातो त्यावर ते शाप की वरदान हे ठरते.’ खरे तर त्यावेळी खूप काही बोध नव्हता पण कधी तरी कुठे तरी अशा प्रकारचे निबंध वाचलेले होते व त्याचा शेवट अशाप्रकारे केलेला असायचा. तेच डोक्यात बसलेले. पुढे ते मनात एवढे पक्के झाले की आजही माझे तेच मत आहे आणि ते सत्यही होताना पाहतही आहे.

मुळात अफवा पसरवणे हेच काही नवीन नाही. सोशल मिडिया नव्हता त्यावेळीही अफवा पसरत होत्या. गणपती दूध प्यायला होता तेव्हा कुठे होते व्हॉटसअप आणि फेसबुक? अफवा पसरवणे ही एक वैचारिक खेळी आहे. एक प्रकारची युद्ध नितीच. त्यामुळे अफवा पसरवणारी व्यक्ती ही तैलबुद्धी पण निच प्रवृत्तीची असते. कोणती अफवा पसरवली की त्याचा काय परिणाम होईल आणि शेवटी त्याचा आपल्याला काय फायदा होईल याचा पूर्ण विचार त्याने केलेला असतो. अगदी बुद्धीबळच! अफवा पसरवणाऱ्याला लोकांचे मानसशास्त्र माहिती असते आणि त्याच्यावर त्याचा सर्व ‘फायद्या’चा खेळ अवलंबून असतो.

भारतात तर अगदी सुरुवातीपासूनच राजकारणासाठी किंवा समाजकारणासाठी अफवा हे शस्त्र वापरले जात आहे. अगदी फार दूरचा दाखला देण्यापेक्षा हिंदू कोड बिलाचाच दाखला घेता येईल. ज्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाचा मसुदा बनवला तेव्हा त्यांच्या विरोधात देशात आंदोलने केली गेली. लोकांना भडकवण्यात आले. हिंदू कोड बिलज्यांच्या मूळावर येणार होते त्यांनी अफवा पसरवली की या बिलात सख्ख्या भावा-बहिणीचे लग्न लावण्याची तरतूद आहे. एक साधू तर दिल्लीत प्राणंतिक उपोषणला बसला होता. त्याने तर अगदी डॉ. आंबेडकर हे महार असल्याने ते जाणून बुजून हिंदू धर्मात अनिष्ठ प्रथा आणू इच्छितात, अशी अफवा पसरवली. हिंदू कोड बिल हे महिलांसाठी वरदानच होते. (आज सर्वच जातींच्या महिलांना ज्या सुविधा मिळताहेत त्याची मुळे या बिलात आहेत) मात्र महिलांनाच या बिला विरोधात भडकवण्यात आले. महिलांनी डॉ.आंबडेकर यांच्या घरावर मोर्चा नेला. डॉ. आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या सर्व प्रती जनतेसाठी खुल्या केल्या. भारतातील प्रत्येक भाषेत बनवल्या. त्या साधुसाठी संस्कृतमध्ये बनवल्या. महिलांना विरोध करण्याचे कारण विचारताना ‘त्यांनी ते बील वाचले का?’ असा प्रश्न विचारला. पण त्या महिलांपैकी कुणीच वाचलेले नव्हते. तरीही केवळ अफवा पसरवणाऱ्यांच्या राजकारणाचा भाग बनून त्यांच्या नवऱ्यांनी त्यांना डॉ. आंबेडकरांविरोधात मोर्चा काढण्यास लावले होते. शेवटी त्या बिलाचे काय झाले वगैरे हा विषय स्वतंत्र आहे. बरे झाले त्यावेळी आजच्या सारखा व्हॉटस्अपचा भडीमार नव्हता. शिवाय समाजात अनेक चांगली लोक पुढेही येत होती. आजच्या सारखे नव्हते. या प्रमाणेच अनेक दंगलींची उगमस्थाने ही अफवाच आहेत आणि त्यात शिकली सवरलेली माणसेच भडकवण्यासाठी आणि सर्वसामान्य मरण्यासाठी पुढे असतात, हेही वारंवार सिद्ध झाले आहे. सांगायाचा मुद्दा हाच की अफवा पसरवणाऱ्याचा निश्चित असा एक उद्देश असतो. तो ओळखता आला पाहिजे.

कोरोनासारख्या गंभीर परिस्थितही मुस्लिम समुदायाबद्दल प्रचंड अफवा पसरवण्याची आपली खोड ठराविक लोकांनी सोडलेली नाही. अनेक जुन्या पुरान्या व्हिडीओंचे संदर्भ बदलून ते मुस्लिमांच्या कटाचे पुरावे म्हणून प्रचार केला जात आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या गोदीतील मिडीयाचाही वापर केला आहे. पण त्याचवेळी काही माध्यमांनी हे व्हिडीओ खोटे असल्याचे दाखवून दिले आहे. पण केवळ एकीकडूनच अफवा पसरत आहेत असे नाही. तर माझ्या बघण्यात रामनवमीचाही एक व्हिडीओ आला आहे. तो लॉकडाऊननंतरचा आहे, असे भासवण्यात आले आहे. तो  केरळचा असून तो निश्चितच यावर्षीचा नसावा कारण एकही व्यक्ती मास्क लावलेली दिसत नाही. शिवाय केरळ सरकारने असे करणाऱ्यांच्या मुसक्या त्वरीत आवळल्याच असत्या. हे होत आहे. कोरोनाविरुद्ध डॉक्टर्स लढत आहेत, माणसे मरत आहेत आणि त्याही परिस्थितीत ही मंडळी मेलेल्यांच्या टाळूवरील लोणी खायचे सोडत नाहीत. किती हा निचपणा! त्यामुळे सहाजिकच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

अशा या संभ्रमाच्या स्थितीत सरकारने पुढे आले पाहिजे. कायद्याची कडक अंमलबजाणी केली पाहिजे पण कोणाकडून अपेक्षा करणार?  मग आपण कसे ठरवायचे की काय खरे नि काय खोटे?  मला तर वाटते एकतर अशा गोष्टींकडे जास्त गांभीर्याने बघायला नको. पण मानवी स्वभाव असा आहे की जसे दिसते तसे नसते हे माहिती असूनही जे दिसते ते खरेच वाटू लागते. त्यामुळे गांभीर्याने घ्यायचे नाही ठरवले तरी ते डोळ्यांवाटे मनात जातेच. मग करायचे काय? त्यासाठी संत सोहिराबानाथ आंबिये या अठराव्या शतकातील विचारवंताने दिलेला गुरुमंत्र अंगिकारायचा. तो म्हणजे ‘अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे!’ आमच्या गावातील वाचनालयाचे हे ब्रिदवाक्य आहे. या अभंगात संत सोहिरोबानाथ सांगतात की, काहीही झाले तरी अंतरीचा ज्ञान दिवा तेवत ठेव. म्हणजेच काय तर स्वत:च्या सद्सदविवेक बुद्धीचा वापर करा!

दोरीच्या सापा भिवुनी भवा
भेटी नाही जिवाशिवा
अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे!
सुतळीला साप समजून बडवत बसणे अयोग्य आहे. आपण आपल्या सद्सदविवेक बुद्धीने ती सुतळ आहे हे ओळखायला शिकले पाहिजे. असेच त्यांना सांगायचे आहे. आजही आपल्याला हे मार्गदर्शन पथदर्शी आहे.

आपल्या मोबाइलवर येणारा प्रत्येक व्हिडीओ संदेश हा खोटा असू शकतो. तो कुणाच्या तरी प्रचाराचा भाग असू शकतो. तो एखाद्या दंगलीला जन्म देवू शकतो. तो आपल्यालाच घातक ठरु शकतो, हे आपण लक्षात घ्यायला हवे. आणि तो पुढे न पाठवता तेथेच डिलिट करुन टाकायला हवा. मात्र हे करताना असा व्हिडीओ कोणाकडून आपल्याकडे आला त्याच्याबद्दल पक्की खुनगाठ बांधली पाहिजे. तो कितीही जवळचा असला तरी तो अफवा पसरवण्याचा वाहक आहे हे मनात पक्के करुन ठेवले पाहिजे. माझ्याकडे अशांची यादीच आहे.

जेव्हा या यादीचा अभ्यास केला तेव्हा असे लक्षात आले की, ठराविक प्रकारचे संदेश, व्हिडीओ पाठवणारे ठराविक लोकच आहेत. जेव्हा आपण अशांवर लक्ष ठेवायला लागू आणि त्यांना त्याची जाणीव करुन देवू ना तेव्हा थोडा फरक निश्चितच पडेल.  कारण आपल्याला असा संदेश पाठवणारा आपल्या ओळखीचाच असतो. प्रत्येकाने अशा आपल्या ओळखीच्या प्रत्येकाला रोखले तर निश्चितच हे अफवा सत्र कमी होईल. शिवाय स्वत:च्या डोक्याने विचार करायला शिकू. अगदी शांतपणे! लोकांचे सद्सदविवेकबुद्धीने विचार न करणे हेच तर अफवा पसरवणाऱ्यांचे शक्तीस्थान आहे!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा