संस्कृतीच्या ठेकेदारांना धारूरकरांचे बक्षीस, पण ज्ञान व चारित्र्याच्या चिंधड्या…!

1
628

धारूरकरांचा केवळ भ्रष्टाचारच समोर आलेला नाही, तर त्यांची बीभत्स व रोगट प्रवृत्तीही प्रकट झालेली आहे. आज त्यांची चोरी उघड झाल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात आला. पण त्याने मूळ प्रश्न सुटला का? ‘सांस्कृतिक राष्ट्रवादाचे रक्षण व प्रचार करण्याच्या मिशनमध्ये’ नियुक्त केलेले असे अनेक कुलगुरू असतील त्यांचे काय?

  • डॉ.बाळासाहेब सराटे

प्रा. डॉ.विजय लक्ष्मीकांत धारूरकर यांची संपूर्ण हयात उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाने त्यांना चांगलीच ओळख मिळवून दिली. सन १९७५ च्या दरम्यान हेच धारूरकर अत्यंत कठोर तत्वनिष्ठ व सत्यवादी राष्ट्रभक्तीचा ज्वलंत आदर्श असलेल्या जनसंघाचे सक्रिय नेते होते. पण त्यांचा जनसंघच राजकीय सत्तेसाठी “पूर्वाश्रमीचे काँग्रेसी व समाजवादी” यांच्या जनता पक्षात विलीन झाला. म्हणून ते प्राध्यापक झाले आणि पवित्र शिक्षण क्षेत्रात शिरले. 
अलीकडच्या २५ वर्षात विशिष्ट रेटने रक्कम घेऊन सामाजिकशास्त्रे विषयातील शेकडो विद्यार्थ्यांना एम. फील. व पीएचडीचे सिनॉप्सीस, डिझर्टेशन, संशोधनपर निबंध, अंतिम अहवाल लिहून देण्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे.  या जन्मी एकदा तरी कुलगुरूपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी असा त्यांचा “पण” होता. ते जर कुलगुरू झाले नसते, तर त्यासाठी मृत्यूनंतरही त्यांचा आत्मा भटकत राहिला असता, इतके त्यांना कुलगुरूपदाने पछाडलेले होते. इतक्या तीव्रतेने त्यांनी सुमारे दोन दशके कुलगुरू होण्यासाठी प्रयत्न केले. परंतु दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सिनेटवर जाण्यापालीकडे त्यांच्या पदरी फारसे काही पडले नव्हते. 
मात्र निवृत्त झाल्यानंतर “सांस्कृतिक राष्ट्रवादाचे रक्षक व प्रचारक” म्हणून त्यांची दूरवरच्या त्रिपुरा राज्यातील केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी थेट नियुक्ती करण्यात आली. त्रिपुरा राज्यात यापूर्वी साम्यवाद्यांचा प्रभाव असल्याने त्यात परिवर्तन घडवून ‘शिक्षण क्षेत्रात कट्टर सांस्कृतिक राष्ट्रवादाचे जंगल वाढविण्याची विशेष जबाबदारी’ या धारूरकरांवर सोपविण्यात आली.
पण दुर्दैव आपल्या संस्कृतीचे, आपल्या शिक्षण क्षेत्राचे आणि आपल्या देशाचे – ज्यात या धारूरकरासारख्या आपमतलबी आणि विकृत व्यक्तींची थेट कुलगुरू म्हणून नियुक्ती केली जाते. धारूरकरांचा केवळ भ्रष्टाचारच समोर आलेला नाही, तर त्यांची बीभत्स व रोगट प्रवृत्तीही प्रकट झालेली आहे. आज त्यांची चोरी उघड झाल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात आला. पण त्याने मूळ प्रश्न सुटला का? ‘सांस्कृतिक राष्ट्रवादाचे रक्षण व प्रचार करण्याच्या मिशनमध्ये’ नियुक्त केलेले असे अनेक कुलगुरू असतील त्यांचे काय?
शिक्षणक्षेत्राच्या भल्याचा विचार न करता केवळ ‘आपल्या विचारांचा ठेका घेऊन संस्कृती रक्षणाचे व प्रचाराचे काम हाती घेतलेल्या लोकांना’ धारूरकर यांच्या रूपाने बक्षीस मिळाले पण ज्ञान व चारित्र्याच्या चिंधड्या उडालेल्या आहेत, असेच म्हणावे लागेल!

(डॉ. बाळासाहेब सराटे हे ज्येष्ठ अभ्यासक आहेत.शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचे संशोधन आहे.)

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा