कानफाट्या !

0
132
प्रतिकात्मक छायाचित्र.

”मला व ज्या जनतेने याच्या हातात ‘केवळ दगड पाहिला आणि त्याला आपल्यासमोर हजर केलं. त्यांना जे वाटतं ते बादशहांनी बरोबर ओळखलं…तसं याच्या परिवारातील हा एक साथीदार ‘हा दगड ठराविक लोकांच्या डोक्यावर घालणार असल्याचं’ एकदा बरळला होता…हा साथीदारही पिसाळलेला आहे. तो तर नरबळीशिवाय पुढेच जात नाही…त्यालाही हजर करण्यात आलं आहे…”

  • संदीप बंधुराज

(स्थळ : बादशहा अबकरचा दरबार )

बिरबल: बादशहा, आज आपल्यासमोर एक विचित्र खटला आला आहे, आणि आपल्याला त्यात योग्य न्याय द्यायचा आहे.

अकबर: बोलो बिरबल, असा काय विचत्रि खटला आहे…थोडं स्पष्ट सांग.

बिरबल: बादशहा, सैनिकांनी एका माणसाला आपल्या दरबारात हजर केलं आहे.

अकबर: अच्छा, काय केलाय गुन्हा त्याने?

बिरबल: हेच तर विचित्र आहे बादशहा, की या माणसाने काहीच गुन्हा केलेला नाही, तरीही त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं आहे…

अकबर: ???

बिरबल: हो बादशहा, याने काहीच केलेलं नाही पण हा केवळ हातात दगड घेवून फिरत होता.

अकबर: कोणास मारला का?

बिरबल: नाही, कोणास मारला नाही…

अकबर: मग? जर त्याने दगड कोणाला मारला नाही, तो केवळ हातात घेतला तर एवढं घाबरायला काय झालं? दगड हातात घेवून फिरणं हा काय गुन्हा होऊ शकतो का? मग तसे असेल तर…

बिरबल: नाही बादशहा, दगड कुणाच्या हातात आहे हे महत्वाचं असतं!

अकबर: थोडं स्पष्ट सांग बिरबल हे दगड काय? कुणाच्या हातात असणं काय? अरे दगड हा दगडच असतो आणि तो मारल्याशिवाय गुन्हा घडला असेही म्हणता येत नाही….

बिरबल: सांगतो बादशहा, एखादा शिल्पकार हातात दगड घेवून फिरु लागला तर लोक काही हरकत घेणार नाहीत, ते समजून जातील की या दगडापासून काही तरी सुंदर मूर्तीच घडणार आहे…

अकबर: बराबर है!

बिरबल:…तर बादशहा, हा माणूस शिल्पकार नाही तर तो कानफाट्या आहे?

अकबर: कानफाट्या?

बिरबल: म्हणजे एकदा ज्याचा कान फाटलेला असेल तो आयुष्यभर कानफाट्या याच नावाने ओळखला जातो…

अकबर: समजलं, म्हणजे याने पूर्वी काही तरी घोळ केलेला दिसतोय, त्यामुळे त्याच्या हातात दगड दिसल्यावर लोकांना भीती वाटत आहे असंच ना?

बिरबल: बादशहा, आपण हुशार आहात तसेच मनकवडेही आहात. आपल्याला जनतेच्या मनातली भीती कळली…

अकबर: असू दे असू दे, पुढे बोल.

बिरबल: तर या माणसाच्या वकीलांचं म्हणणं आहे की याने कुणाला दगड मारलेलाच नाही तर उगाच आराडा ओरडा कशाला?  हा दगड मारेल हे गृहित धरुन आधीच ओरड मारणं हे एखाद्या माणसाची विनाकारण बदनामी करणारं वर्तन आहे…केवळ या माणसाला बदनाम करण्यासाठीचं हे कारस्थान आहे…

अकबर: बिरबल, असं कोड्यात बोलू नकोस, स्पष्ट सांग. हा माणूस कोण आहे. याचा पूर्वेइतिहास काय आहे?

बिरबल: बादशहा, बरोबर आहे. अशा प्रसंगी माणसाचा पूर्व इतिहास पाहिलाच पाहिजे…या माणसाने मागच्यावेळी आपल्या दरबारातील चलनी नोटांची एैसी तैसी करुन टाकली…लोकांच्या कुरापती काढण्याचा जणू त्याला छंदच आहे…याने लोकांमध्ये लावालाव्या करुन आपल्या राज्यात अराजकता माजवली…या माणसाला माणसाच्याच रक्ताची चटक लागली आहे…खूप वर्षांपूर्वी याने खूप माणसांचे बळी घेतले आहेत. पण हा खटला आपल्यापुढे येण्या अगोदरच याच्या परिवारातील लोकांनी दडपून टाकलाय… शिवाय सध्या हा हातात सतत दगड घेवून फिरत असतो. त्यामुळे तो कधी कुणाच्या डोक्यात घालेल याचीही शाश्वती राहिलेली नाही…आपल्या दरबरातील लोकं सतत दहशतीत असतात…विशेष म्हणजे ज्यांनी याला अटकाव केला त्यांचा थेट कपाळमोक्षच करण्याची भाषा करतो…स्वत:ला मोठा राष्ट्रभक्त माणतो. पण बादशहा, हा माणूस खरंच आपल्या नियमावलीच्या विरोधात वागून राष्ट्रद्रोहच करतो आहे…

अकबर: अरे मग स्पष्ट सांगना की तो वेडा आहे…सर्व लक्षणं तर वेड्याचीच आहेत…आणि वेडा स्वत:ला कधी वेडा मानतच नाही…!  हो, याचे चलनांबद्दलचे किस्से आले होते आमच्या कानावर. चोरांचे चलन संपवलं असं काही तरी हा बरळत होता ना त्यावेळी. पण नंतर सत्य बाहेर आलं…आणि आज हा असा वागतोय… याला काय झटके येतात काय?

बिरबल: बादशहाचा विजय असो. मला व ज्या जनतेने याच्या हातात ‘केवळ दगड पाहिला आणि त्याला आपल्यासमोर हजर केलं. त्यांना जे वाटतं ते बादशहांनी बरोबर ओळखलं…तसं याच्या परिवारातील हा एक साथीदार ‘हा दगड ठराविक लोकांच्या डोक्यावर घालणार असल्याचं’ एकदा बरळला होता…हा साथीदारही पिसाळलेला आहे. तो तर नरबळीशिवाय पुढेच जात नाही…त्यालाही हजर करण्यात आलं आहे…

अकबर: कळलं मला…एखाद्या चांगल्या माणसाच्या हातात दगड काय तलवार असली तरी ती चांगल्या कामासाठी वापरली जाईल याची खात्री बाळगता येते. पण वेड्याच्या हाती दगडच काय तर फुल  असलं तरी ते धोकादायकच… माकडाच्या हातात कोलीत दिल्यास ते आगच लावत फिरणार…कानफाट्या तो कानफाट्याच…या कानफाट्याकडून म्हणजेच या वेड्याकडून काही घात होण्याची वाट पाहणं हा त्याहूनही वेडेपणाच ठरेल. म्हणून त्याअगोदरच त्याच्या मुस्क्या आवळणे हे पुढचा धोका टाळण्यासाठी आवश्यकच आहे….या विचित्र खटल्याचा खलनायक हा ठार वेडा असल्याने त्याच्या हातून दगड काढून घेणे व त्याचा इलाज करणे हेच राष्ट्रहिताचे आहे…!

बिरबल: बादशहा न्यायप्रिय आहेत. त्यांचा विजय असो…बादशहा काही लोक या वेड्याच्या बहकाव्यात आले आहेत. त्यांचे काय करायचे?

बादशहा: याचा इलाज झाला की तेही आपोआप ताळ्यावर येतील…तोपर्यंत त्यांवर लक्ष ठेवून रहावे…कारण तेही धोकादायकच आहेत …वेडे आणि किडे राष्ट्राला कधीच परवडणारे नाहीत लक्षात ठेवा सर्वांनी…

( सल्तनतमध्ये वेड्यांची संख्या वाढलेली पाहून बादशहा चिंतेत पडला व त्यांने दरबार आटोपता घेतला व दूर जावून विचार करु लागला…’काय करावं या वेड्यांचं….जनतेला काय चूक काय बरोबर हे विचार करायला शिकवलं तर जनताच त्यांचा बंदोबस्त करेल…असा विचार करुन बादशहा शून्य नजरेनं आपल्या राज्याच्या दिशेने पाहत बसला…!’) (काल्पनिक)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा