घाबरू नका, किराणा दुकाने आणि अत्यावश्यक सेवा नेहमीच सुरू राहतीलः पोलिस महासंचालक

0
85

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केल्यानंतर धास्तावलेल्या नागरिकांनी राज्यातील किराणा दुकाने, भाजी मंडई आणि जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. लॉकडाऊनचा कोणत्याही आपत्कालीन सेवा किंवा जीवनावश्यक वस्तुंच्या उपलब्धता किंवा पुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मोदी यांनी आज रात्री आठ वाजता राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशात संपूर्ण देशभरात १५ एप्रिलपर्यंत म्हणजे तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. प्रत्येक जिल्हा, प्रत्येक शहर, प्रत्येक गाव, प्रत्येक गल्ली-मोहल्ला बंद करण्यात येत आहे. ही एक प्रकारची संचारबंदीच आहे, असे मोदी म्हणाले. मोदींच्या या घोषणेमुळे नागरिक चांगलेच धास्तावले. त्यामुळे मोदींचा हा संदेश संपतो न संपतो तोच राज्यभरातील नागरिकांनी किराणा दुकाने, औषधी, भाजीमंडईसह जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी केल्याचे पहायला मिळाले. अनेक ठिकाणी एटीएमसमोरही रांगा लागल्याचे दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

महाराष्ट्रातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. कुठल्याही आपत्कालीन सेवा किंवा जीवनावश्यक वस्तूंवर बंदीचा परिणाम होणार नाही. या सेवासंबंधित दुकाने व किराणा दुकाने नेहमीच सुरू राहतील, असे स्पष्टीकरण देतानाच या दुकानांमध्ये असताना इतरांपासून सुरक्षित अंतर राखा, असे आवाहनही जयस्वाल यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा