नांदेडमध्ये १ हजार १२७ किलो गांजा जप्त, मुंबई एनसीबीची मोठी कारवाई

0
326

नांदेडः मुंबई एनसीबीने आज नांदेड जिल्ह्यात केलेल्या मोठ्या कारवाईत १ हजार १२७ किलो गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत ५ कोटी ६३ लाख रुपये आहे. ट्रकद्वारे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून हा गांजा महाराष्ट्रात आणण्यात आला होता. या प्रकरणी एनसीबीने दोघांना ताब्यात घेतले आहे.

आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गांजा आणण्यात येणार असल्याची गुप्त माहिती एनसीबीला मिळाली होती. त्या गुप्त माहितीच्या आधारे अमोल मोरे आणि सुधाकर शिंदे या दोन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील पथकाने सापळा रचून आज पहाटे नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मांजरम येथे नांदेड हैदराबाद मार्गावर १२ चाकी ट्रक ताब्यात घेतला. या ट्रकमधून १ हजार १२७ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एनसीबीने दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

 या बारा चाकी ट्रकमधील गांजा नांदेडमधून जळगावला जाणार होता. तेथे यातील काही गांजा देऊन ही ट्रक पुढे महाराष्ट्रभर गांजाचे वितरण करणार होती, अशी माहिती एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली.

या प्रकरणी एनसीबीने ९८/२०२१ या क्रमांकाने गुन्ह्याची नोंद केली आहे. ट्रकमधून आणलेला गांजा कोणाला पोहोचवला जाणार होता, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील इतर तस्करांना लवकरच अटक केली जाण्याची शक्यता आहे. या ट्रकमध्ये गांजाने भरलेली ४९ पोती होती. या पोत्यांचे प्रत्येकी वजन २४ ते ३० किलो आहे.

एनसीबीचे पथक तीन दिवसांपासून या ट्रकच्या मागावर होते. एनसीबीने आंध्र प्रदेशातून हा ट्रक महाराष्ट्रात दाखल होऊ दिला. आज सोमवारी पहाटे चार वाजता मांजरम येथे हा ट्रक अडवण्यात आला आणि या ट्रकमधून १ हजार १२७ किलो गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईसाठी एनसीबीने गावकऱ्यांचीही मदत घेतली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा