औरंगाबादच्या ‘साई’तील २० खेळाडू करणार ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व

0
33

औरंगाबाद: मराठवाड्यातील खेळाडूंमध्ये अधिक क्षमता आहे. ही क्षमता अधिक वृद्धींगत करण्यासाठी औरंगाबादच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून येथील खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देत आगामी ऑलंपिक स्पर्धेत प्राधिकरणातील जवळपास २० खेळाडू भारताचे प्रतिनिधीत्व करतील, असा आशावाद केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केला.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र येथे जलतरण तलाव, सिंथेटिक हॉकी टर्फचे उद्घाटन आणि तलवारबाजी सभागृहाच्या कोनशिला अनवारणाप्रसंगी रिजिजू बोलत होते. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, खासदार इम्त‍ियाज जलील, आमदार अंबादास दानवे, आमदार अतुल सावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्राधिकरणाचे संचालक व्ही.पी. भांडारकर आदींची उपस्थिती होती.

रिजिजू म्हणाले, औरंगाबाद मराठवाड्याची राजधानी आहे. अजिंठा, वेरूळसारखे जागतिक वारसा स्थळे येथे आहेत. येथील लोक संस्कृतीप्रिय, क्रीडा प्रेमी व मेहनती आहेत. या ठिकाणी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्यामाध्यमातून धनुर्विद्या, मुष्ठीयुद्ध, भारोत्तोलन, जिम्नॅस्टिक, हॉकी आदी शाखांतून खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. देशात एका राज्यात एक खेळ या धर्तीवर विचार केला जात असताना, औरंगाबादेत मात्र सात क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन दिले जात आहे. येथील जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकार बंद करण्यात आला होता. परंतु खासदार डॉ.कराड, खासदार जलील यांनी पाठपुरावा केल्याने या क्रीडा प्रकारास पुर्नमान्यता देण्यात आली, रिजिजू म्हणाले.

 इतर देशांच्या तुलनेत आपली लोकसंख्या अधिक असूनही आपल्या देशाला ऑलंपिक खेळात पदके मिळत नाहीत. ती अधिकाधिक मिळावीत यासाठी शासनस्तरावरून मोठ्याप्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र तयार करण्यात आलेली आहेत. तसेच ‘खेलो इंडिया, फीट इंडिया’च्या माध्यमातून देश अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असेही रिजिजू म्हणाले.

साईतील साहित्यासाठी कोटींची मंजुरीः साई येथील विविध कामांचे उद्घाटन आणि कोनशिला कार्यक्रमास येण्यापूर्वीच साईतील विविध क्रीडा प्रकाराच्या साहित्यासाठी पाच कोटी रूपयांची मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर याठिकाणी ३०० खाटांचे वसतिगृह सुरू करण्यात येईल. शिवाय लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीचा सकारात्मकपणे विचार करताना याठिकाणी पदविका,पदवी अभ्यासक्रमाचा विचार करणार असल्याचेही रिजिजू म्हणाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने क्रीडा मंत्रालयाला दिलेल्या मागण्यांबाबतही सकारात्मक असून विद्यापीठास ‘खेलो इंडिया’तून निधी देणर असल्याचेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा