औरंगाबादेतील २१ वर्षीय महिलेला ओमीक्रॉनची बाधा, आरोग्य यंत्रणा सतर्क

0
784
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई/औरंगाबादः सर्वांच्याच मनात धडकी भरवणाऱ्या कोरोनाच्या नव्या ओमीक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेले सहा नवीन रूग्ण महाराष्ट्रात रविवारी आढळून आले. त्यापैकी एक रूग्ण औरंगाबादचा रहिवासी असून तो ब्रिटनमधून प्रवास करून आलेला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील चाचणीत हा रूग्ण ओमीक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आला असून त्याच्यावर मुंबईच्या सेव्हन हिल्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात सहा नवीन ओमीक्रॉन बाधित रूग्ण आढळून आले. त्यापैकी चार रूग्ण मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील चाचण्यात पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी एक रूग्ण औरंगाबादचा रहिवासी असून तो ब्रिटनमधून प्रवास करून आलेला आहे. उर्वरित तीन रूग्णांपैकी दोन रूग्ण कर्नाटकचे तर एक रूग्ण मुंबईचा आहे. कर्नाटकचे रहिवासी असलेले दोन्ही रूग्ण टांझानियामधून प्रवास करून आलेले आहेत.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

ओमीक्रॉनची बाधा झालेला औरंगाबादचा रहिवासी रूग्ण २१ वर्षीय महिला असून ही महिला इंग्लंडमधून प्रवास करून आलेली आहे. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर ही महिला औरंगाबादेत येणार होती. परंतु विमानतळावरील सर्वेक्षणातच ती ओमीक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आली आहे. या महिला रूग्णावर मुंबईच्या सेव्हन हिल्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  विशेष म्हणजे या महिला रूग्णामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नव्हती.

औरंगाबादेतील रहिवासी असलेला हा महिला रूग्ण ओमीक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर औरंगाबादेतील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या महिला रूग्णावर मुंबईतच उपचार सुरू असल्यामुळे औरंगाबादकरांना सध्या तरी चिंता करण्याचे कारण नाही. परंतु कोविड अनुरूप वर्तन करत आपले व्यवहार सुरळित ठेवणे आणि प्राधान्याने लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.

ओमीक्रॉन विषाणूचा प्रसार वाढू लागल्यानंतर १ नोव्हेंबरपासून मुंबई विमानतळावर परदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाश्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. १ नोव्हेंबरपासून मुंबई विमानतळावर अतिजोखमीच्या देशातून ९ हजार ४७७ प्रवासी आले आहेत. त्यापैकी २८ जण विमानतळावरील चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

 महाराष्ट्रात आतापर्यंत ५४ ओमीक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २२ रूग्ण मुंबईत, ११ रूग्ण पिंपरी चिंचवडमध्ये, पुणे ग्रामीणमध्ये ७, पुणे महानगरपालिका क्षेत्रात ३, साताऱ्यात ३, कल्याण डोंबिवलीमध्ये २, उस्मानाबादेत २ तर बुलढाणा, नागपूर, लातूर आणि वसई विरारमध्ये प्रत्येकी एक रूग्ण ओमीक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यापैकी २८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा