राज्यात 43 लाख बोगस मतदार, विधानसभा निवडणुका पुढे ढकला : आंबेडकरांची मागणी

0
143
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यातील सत्ताधारी पक्ष पुन्हा निवडून येण्यासाठी ईव्हीएमबरोबरच आता सर्व पर्याय शोधत असून त्याचाच एक भाग म्हणून राज्यात 43 लाख बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. म्हणजेच एका मतदारसंघात साधारणतः 20 हजार बोगस मतदार आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया थांबवावी आणि मतदार याद्यांत दुरूस्ती करूनच निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच शिल्लक राहिले असताना आंबेडकर भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. निवडूण येण्यासाठी सत्ताधारी पक्ष सर्व पर्यायांचा अवलंब करत आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांचे बारकाईकाने निरीक्षण केले तर 40 लाख बोगस मतदारांची नोंदणी केल्याचे लक्षात येते. एकाच इपिक क्रमांकावर दोन दोन मतदार दाखवण्यात आले आहेत. ही सर्व माहिती आम्ही निवडणूक आयोगाला देणार आहोत. मोठ्या प्रमाणावर झालेली बोगस मतदारांची नोंदणी लक्षात घेता ही निवडणूक प्रक्रिया थांबवावी. मतदार याद्यांत दुरूस्त्या कराव्यात आणि मगच निवडणूक घ्यावी. कोणत्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही बोगस मतदार नोंदणी केली याचीही चौकशी करावी,असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. जोपर्यंत बोगस मतदारांचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत निवडणूक नको, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेण्याचे आवाहनही प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा