देशातील 66 टक्के लोकांना दैनंदिन खर्च भागवणेही कठीण; आर्थिक मंदी, महागाईने कंबरडे मोडले!

0
97
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः महागाई आणि समग्र आर्थिक मंदीच्या प्रचंड झळा सर्वसामान्य माणसालाही सोसाव्या लागत आहेत. देशातील 65.8 टक्के लोकांना त्यांचा दैनंदिन खर्च भागवणेही अवघड होऊन बसले आहे. आयएएनएस- सीव्होटरने केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. एकीकडे जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती मागील काही महिन्यांत प्रचंड वाढल्या असताना पगार किंवा दैनंदिन मिळकतीमध्ये तसूभरही वाढ झालेली नाही. वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे घरचे बजेट पूर्णतः कोलमडून पडले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी जारी झालेला बेरोजगारीचा दर गेल्या 45 वर्षांतील सर्वाधिक आहे.

 आयएएनएस- सीव्होटरने केलेल्या या सर्वेक्षणामुळे देशातील लोकांची सध्याची आर्थिक स्थिती आणि रोजच्या खर्चाचा ताळमेळ बसवताना होणारी तारांबळ स्पष्ट झाली आहे. 2015 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात जवळपास 46.1 टक्के लोकांनी त्यांना त्यांचा दैनंदिन खर्च चालवताना नाकी नऊ येत असल्याचे सांगितले होते. गेल्या सहा वर्षांच्या काळात अशा लोकांमध्ये 19.7 टक्के वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात लोकांच्या नकारात्मक दृष्टिकोनात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. अर्थव्यवस्था सुधारण्याची शक्यता आणि परिस्थिती बदलण्याची आशा याबाबत लोक निराशावादी आहेत. त्यामुळे 2020 मध्ये जीवनाच्या गुणवत्तेत कोणताही सुधारणा होण्याची शक्यता दिसत नाही. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या केवळ 30 टक्के लोकांनीच आपण घरखर्च चालवू शकत आहोत, असे मान्य केले आहे. 2019 मध्ये ही संख्या 45 टक्के होती.

 खाद्य पदार्थांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळे डिसेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर गेल्या 65 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर 7.35 टक्के होता.

 सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 4292 लोकांपैकी 43.7 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांचे उत्पन्न होते तेवढेच आहे, मात्र खर्चात वाढ झाली आहे. तर अन्य 28.7 टक्के लोकांनी सांगितले की, आमच्या खर्चात वाढ झाली मात्र उत्पन्नात घट झाली आहे. हे सर्वेक्षण जानेवारी महिन्याच्या तिसर्‍या आणि चौथ्या आठवड्यात देशातील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांत करण्यात आले आहे. एकूण 11 राष्ट्रीय भाषांत हे सर्वेक्षण करून लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा