एनआरसीमध्ये 6700 हिंदू जाती एकही दाखला देऊ शकणार नाहीत: जितेंद्र आव्हाडांचा दावा

0
125
सीएए, एनआरसीविरोधी कृती समितीचा औरंगाबादेत प्रचंड मोर्चा.

औरंगाबादः सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही( एनआरसी)विरुद्धची ही लढाई फक्त मुस्लिमांची नाही. पण तसे सांगून हिंदूंना गाफील ठेवले जात आहे. हे लोक पाहून मला स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरु झाल्यासारखे वाटते. देशातील हिंदूंमध्ये 6700 जाती अशा आहेत की या जातीतील एकही नागरिक एकही दाखला देऊ शकणार नाही. या देशात आंबेडकरी विचारसरणी जिवंत राहील ही गोळवर जिवंत राहील, हे ठरवणारी ही लढाई आहे. मनुस्मृतीला जिवंत ठेवणार्‍या गोलवळकरांचे सुवर्ण दिवस आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.

औरंगाबादेत सीएए आणि एनआरसीविरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.दुपारच्या नमाज नंतर आमखास मैदानाहून सुरु झालेला मोर्चा दिल्लीगेटवर आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. त्यावेळी ते बोलत होते. या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक  उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

देशात 20 कोटी मुस्लिम आहेत. त्यातील 10 टक्के जरी बेकायदेशीर निघाले तर दोन कोटी होतात. परंतु देशात 100 कोटी हिंदू आहेत. त्यातील 10 टक्के हिंदू जरी बेकायदेशीर निघाले तर 10 कोटी होतात. त्यामुळे एनआरसीचा सगळ्यात जास्त फटका हिंदूंनाच बसणार आहे, असेही आव्हाड म्हणाले. 1935 साली हिटलर ने ही असाच नागरिकत्व कायदा आणला होता त्यानंतर कोट्यवधी ज्यू मारले गेले होते आणि मोदींनी आता तोच कायदा आणला आहे. मोदी हा थेट हिटलरचा अवतार आहे. या पुढे मोदी आपले सगळेच पहायला लागतील. मुलगी आपल्या बापाला आपला मोबाइल दाखवत नाही तर आमच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप कऱण्याचा अधिकार मोदींना कुणी दिला, असा सवाल करत सीएए व एनआरसीच्या रुपाने मोदींनी स्वतःचीच कबर खोदून घेतली, असे आ. आव्हाड म्हणाले.

कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा ठेवू नकाः प्रकाश आंबेडकर: या देशातील न्यायालयही आता धर्मनिरपेक्ष राहिलेले नाही. त्यामुळे सुधारित नागरिकत्व कायदा( सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदीच्या( एनआरसी) विरोधात न्यायालयात जाऊन काहीही उपयोग होणार नाही. तेथे आपणाला न्याय मिळणार नाही. न्यायालयही सरकारच्या तावडीत अडकले आहे.  या दोन्हीच्या विरोधात न्यायालयात जाणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखेच आहे. त्यामुळे ही लढाई आपणाला रस्त्यावरच लढावी लागणार आहे. महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात आम्ही हिंदू धर्मनिरपेक्ष शक्तींची ताकद दाखवून देऊ, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आंदोलन हिंसक होऊ देऊ नकाः खा. झा: ही लढाई फक्त मुस्लिमांची नाही, ही सगळ्यांची लढाई आहे. ती लढाई आपण जिंकत आलोय कपड्यावरून कुणालाही ओळखता येत नाही, असे खासदार मनोज झा म्हणाले. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीचे हे वर्ष आहे. त्यामुळे गांधींना तुमच्या चष्म्यातून पाहू नका. गांधींना गांधीच्याच चष्म्यातून पहा. तुमचे आंदोलन हिंसक व्हावे म्हणून ते लोक खूप प्रयत्न करत आहेत. पण तसे होऊ देऊ नका. शेवटपर्यंत लढून हा कायदा मागे घ्यायला भाग पाडू, असेही खा. झा म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा