वैद्यकीय प्रवेशासाठीचा ७०:३० चा कोटा रद्द: मराठवाडा, विदर्भावरील अन्याय संपला!

0
222
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचा ७०:३० ची कोटा पद्धत रद्द करण्यात आल्याचा महत्वाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने आज जाहीर केला. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी ही घोषणा केली. या निर्णयामुळे गुणवत्ता असूनही विदर्भ- मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर वर्षानुवर्षे होत असलेला अन्याय संपुष्टात आला आहे.  भाजप- शिवसेना युती सरकारने ही अन्यायकारक कोटा पद्धत लागू केली होती.

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये आणि दंत वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रादेशिक वर्गीकरण करून स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के जागा राखीव ठेवण्यात येत होत्या. मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र असे वर्गीकरण करून ज्या प्रदेशात ही महाविद्यालये आहेत त्या प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के आणि या प्रदेशाबाहेरील विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्याची ही कोटा पद्धत रद्द करावी, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ती आज पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मराठवाड्यात केवळ ६ आणि विदर्भात ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत आणि प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. परंतु ७०:३० कोटा पद्धतीमुळे मराठवाडा- विदर्भातील विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता असूनही ते वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहत होते.

 वैद्यकीय प्रवेशासाठी जातनिहाय आरक्षण असताना भाजप सरकारने लागू केलेले प्रादेशिक आरक्षण रद्द करावे, यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित या मराठवाड्यातील नेत्यांनी सातत्याने आवाज उठवला होता. याच मागणीसाठी काल मराठवाड्यातील आमदारांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलनही केले होते. त्या पार्श्वभूमीवर ही कोटा पद्धत रद्द करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातील आमदारांना कालच दिले होते.

 वैद्यकीय प्रवेशासाठीची प्रादेशिक आरक्षणाची कोटा पद्धत रद्द केल्यामुळे आता राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुणवत्तेच्या निकषात बसणाऱ्या कोणत्याही प्रदेशातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रदेशातील वैद्यकीय महाविद्यालयात यामुळे प्रवेश घेण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा