नाशिकलाच होणार ९४ वे मराठी साहित्य संमेलन!

0
212
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथेच होणार असल्याची घोषणा अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी आज औरंगाबादेत केली. हे संमेलन मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा नागरिकांशी चर्चा करून निश्चित केल्या जातील, असेही ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

९४ व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचे एक आणि अंमळनेरवरून एक अशी निमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने दुसऱ्यांदा निमंत्रण पाठवले होते. त्यात मे महिन्यात दिल्लीत साहित्य संमेलन घेण्याचा प्रस्ताव होता. मात्र महामंडळाच्या स्थळनिवड समितीने नाशिक येथील एकाच संस्थेला निमंत्रण पाहणीसाठी निवडले आणि भेट देऊन आवश्यक ती पाहणी केली आणि आपला अहवाल महामंडळाला दिला, असे ठाले पाटील म्हणाले.

साहित्य महामंडळाने स्थळनिवडीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंतिमतः नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून ९४ व्या साहित्य संमेलनासाठी त्याची निवड केली. अवधी कमी असल्यामुळे साहित्य महामंडळाने बैठकीसाठी वेळ जाईल म्हणून निवड समितीच्या शिफारशीची प्रत सर्व सदस्यांना पाठवावी आणि त्याचवेळी स्थळनिवड समितीचे व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी संमेलन स्थळाची घोषणा करावी असे अधिकार स्थळनिवड समिती व अध्यक्षांना ३ जानेवारी रोजी झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत दिले होते. त्यानुसार नाशिकची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सरहदने हुकवली दिल्लीकरांची विशेष साहित्य संमेलनाची संधीः दिल्लीच्या मराठी संस्थांनी त्यांना एकदा दिलेले व त्यांनी स्वतःहून नाकारलेले साहित्य संमेलन पुन्हा दिल्लीला व्हावे अशी मागणी पुण्याच्या सरहद संस्थेने दिलेल्या निमंत्रणाच्या आधारे दिल्लीतील मराठी माणसे करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीकरांसाठी विशेष साहित्य संमेलन देण्याचा विचार साहित्य महामंडळ करेल, असे सरहदचे निमंत्रक संजय नहार यांना सूचवले होते. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनीही तसा प्रस्ताव सरहद संस्थेला दिला होता. पण संजय नहार यांनी हा प्रस्ताव नाकारला आणि दिल्लीकरांची विशेष साहित्य संमेलनाची संधी हुकली, असेही ठाले पाटील म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा