भारतीय संविधानाचा मसुदा ब्राह्मण व्यक्तीने तयार केलाः गुजरात विधानसभा अध्यक्षांचा जावई शोध

0
862
संग्रहित छायाचित्र.

अहमदाबादः आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांचे प्रतिमा हनन करण्याची एकही संधी न सोडणार्‍या भाजपने आता आपला मोर्चा भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे वळवला आहे. गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र तिवारी यांच्या वक्तव्यामुळे त्याला पुष्टी मिळाली आहे. भारतीय संविधानाचा मसुदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नव्हे तर बी.एन. राव या ब्राह्मण व्यक्तीने तयार केला होता, असा दावा राजेंद्र तिवारी यांनी केला आहे.

अहमदाबादेत आयोजित ब्राह्मण संमेलनात बोलताना राजेंद्र तिवारी यांनी हा जावईशोध लावला. विशेष म्हणजे यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीही मंचावर हजर होते. जगातील 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास केल्यानंतर भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचा कोणी दिला याची तुम्हाला माहिती आहे का? असा सवाल करत राजेंद्र तिवारी म्हणाले की, जेव्हा जेव्हा भारतीय संविधानाचे नाव येते, तेव्हा आपण सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सन्मानाने घेतो. पण त्यांच्या शब्दात भारतीय संविधानाचा मसुदा बंगाल नरसिंह राव यांनी तयार करून दिला होता. ते ब्राह्मण होते. ब्राह्मण नेहमीच दुसर्‍यांना पुढे करत असतो, असे इतिहास सांगतो. त्याचप्रमाणे बी.एन. राव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुढे केले, अशी शेखी मिरवत राजेंद्र तिवारी यांनी भारतीय संविधानाच्या मसुदा निर्मितीचे श्रेय ब्राह्मण समाजाला देण्याचा प्रयत्न केला. राजेंद्र तिवारी यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

नोबेल विजेतेही ब्राह्मणचः भारतातील आठ नोबेल विजेत्यांपैकी सात विजेते ब्राह्मण होते. नवव्या नोबेल विजेत्याचे नाव कोणाला माहीत आहे का? अभिजीत बॅनर्जी! अभिजीत बॅनर्जीचा अर्थच ब्राह्मण आहे, असेही राजेंद्र तिवारी म्हणाले. त्यानंतर या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सीएए आणि एनआरसीच्या समर्थन घोषणाबाजी केली. गुजरातमध्ये चिमणभाई शुक्ला, सूर्यकांत आचार्य आणि अशोक भट्ट या तीन ब्राह्मणांनी भाजपची मुहूर्तमेढ रोवली होती. ब्राह्मणांनी नेहमीच राष्ट्रहिताचा विचार केला आहे. त्यामुळेच हा समाज भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत( आरएसएस) जोडला गेला आहे, असा दावा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा