सिद्धहस्त संजय!

0
386
संग्रहित छायाचित्र.

उद्धवची शक्तिस्थळे आणि उद्धवची कमजोरी, पवारसाहेबांची शक्तिस्थळे आणि पवार साहेबांची युक्ती या सगळ्यांची समीकरणं जुळवली आणि भाजपच्या विरूद्धच्या या युद्धात ती पणाला लावली. त्याचे परिणाम म्हणून  शिवसेनेतर्फे एकाकी लढत देऊन त्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचवून दाखवलं. ज्या दिवशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्याच दिवशी त्यांनी सामनाच्या संपादकपदाचा राजीनामा दिला आणि संजय राऊत सामनाचे पूर्ण संपादक झाले.

राजू परूळेकर,स्तंभ लेखक, राजकीय विश्लेषक

संजय राऊतांवर मी अगोदरही लिहिलेलं आहे. पण ते पुरेसं नव्हतं आणि ते बऱ्याच प्रमाणात तत्कालिक होतं. खरं तर संजय राऊत यांच्यासारख्या माणसावर माझा लेख वाचल्यावर तो माणूस डोळ्यासमोर उभा राहील असं लेखन माझ्याकडून मलाच अपेक्षित होतं. मी ज्या काळात ‘सामना’त वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांवर ‘क्लोज शॉट’ नावाचा स्तंभ लिहायचो (त्याचीही एक गोष्ट आहे.पण ती नंतर) तेव्हा संजय मला अनेकदा गंमतीत विचारायचा की, “तू माझ्यावर लिहिलसं तर काय लिहिशील?”  त्याचं उत्तर तेव्हा माझ्याकडे नव्हतं. याचं कारण संजयच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. काही गंभीर आहेत तर काही गंमतीशीर आहेत. संजय कधीच गंभीरपणाचा आव आणत नाही, पण तो मूलत: अतिशय गंभीर माणूस आहे.  तो कष्टकरी जनतेचा खराखुरा प्रतिनिधी आहे. तो सातत्याने कष्ट केल्याशिवाय शांतपणे बसून जगू शकत नाही. अर्थात त्याला लहानपणापासून कष्टाचं आयुष्य प्राप्त आहे. एकेकाळी तो ‘सामना’मध्ये इतकं लिहित असे की, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत संजयचा लेख, स्तंभ, अग्रलेख यात असे. कित्येकदा बातमी स्वतः लिहून तो उपसंपादकाकडे देत असे. कोऱ्या कागदांचा ताव घेऊन आपल्या मोठ्या टपोऱ्या अक्षरांमध्ये लिहिल्याशिवाय त्याला आपण कार्यकारी संपादक आहोत, याचं फिलिंगच कधी आलेलं नाही. आत्ता ह़ॉस्पिटलमध्ये त्याची एअँजिओप्लास्टी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी तो गादीवर बसून लिहितो आहे, असे वर्तमानपत्रात फोटो आले.  अनेकांना  ती फोटोसाठी दिलेली पोझ वाटली. तर तसं अजिबात नाही. संजयसाठी अशा प्रकारे बसून हातने लिहिणं हे औषध आहे. कुठच्याही प्रकारच्या ताणतणावावरचा त्याचा तो कॅथार्सिस आहे. ‘सामना’ मध्ये तो रोखठोक, सच्चाई हे कॉलम त्याचबरोबर अग्रलेख तो रोजच्या रोज लिहित असे तेसुद्धा पेनाने.  ( सच्चाई आता बंद झाला, अग्रलेख आणि रोखठोक अजून चालू आहे.)  आपल्या कारकिर्दीमध्ये एकेकाळी तर त्याने राशी भविष्यसुद्धा लिहिल्याचं मला आठवतय.

तशी त्याच्या कुठच्याही लिखाणात राशी-भविष्यात असते तशी नाट्यमयता असतेच. त्याच्या पत्रकारितेच्या सुरूवातीच्या काळात त्याच्यावर माधव गडकरींचा खूप परिणाम होता. माधव गडकरींच्या लेखनशैलीमध्ये एक नाट्यमयता होती. ती नाट्यमयता त्यांच्या लेखाच्या शेवटाला जाऊन टिपेला पोहोचत असे आणि त्या क्लायमॅक्स पॉईंटला ते लेखनाला एक ट्विस्ट देत असत. ती शैली संजयने अजून विकसित केली. माधव गडकरींच्या सोबत संजयवर आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांचाही खूप प्रभाव आहे. तो पोटतिडकीने लिहितो, वागतो. त्याला अत्र्यांप्रमाणेच परस्परविरोधी भूमिका काही कालांतराने तितक्याच पोटतिडकीने मांडायला सहज जमतं. याचं कारण अत्रे आणि ठाकरे या दोघांचा त्याच्यावरचा प्रभाव हेही आहे. आमच्या मैत्रीमध्ये, आमच्या दोघांमध्ये हा समान बिंदूसुद्धा आहे. एखाद्या माणसावर किंवा मुद्द्यावर पराकोटीची टीका, निंदा आणि नंतर काळ बदलल्यावर त्याच व्यक्तीची पराकोटीची प्रशंसा मनापासून करता येऊ शकणे हे निर्मळ मनाचं प्रतिक आहे. ते संजयमध्ये पुरेपूर आहे. संजय हाडाचा लेखक आणि पत्रकार आहे. लोकप्रभामध्ये उपसंपादक असताना तो आपल्या लेखनाने धुमाकूळ घालत असे. त्याचे संपादक अर्थातच माधव गडकरी होते. लेख शिर्डीच्या साईबाबांवर असो किंवा गँगस्टर अरूण गवळीवर असो, संजय एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे लिहित असे. संजय मौखिक लिहितो. म्हणजे, तो जे लिहितो ते तो मनात स्वतःशी बोलत असतो. त्यामुळे एखाद्या चित्रपटाच्या पटकथा आणि संवादाप्रमाणे त्याचं लेखन होत जातं. सुरूवातीच्या काळात क्राईम रिपोर्टर म्हणून खूप काळ काम केल्याने संजयने गुन्हेगारांचे आणि माफियांचे अधोविश्व जवळून बघितलेले आहे. संजय ज्या काळात क्राईम रिपोर्टर होता त्या काळात दाऊद, अश्विन नाईक, रमा नाईक, छोटा राजन, पुढे अरूण गवळी आणि इतर सर्व गँग्स मुंबईत जोरात होत्या. त्या सर्वांच्या अधोविश्वाचं संजयने एखाद्या चित्रपटाच्या थरार कथेप्रमाणे अनेकदा  लोकप्रभामध्ये वर्णन केलेलं आहे. वर उल्लेखलेल्या सगळ्या बाबींमुळे संजयची मूस वेगळी घडत गेली. संजय जे लिहितो ते तो मनातल्या मनात स्वतःशी बोलत असतो. त्यामुळे तो जेव्हा बोलतो ते एखाद्या चित्रपटातील डायलॉग डिलिवरीप्रमाणे वाटतं. अनेकांना संजयची बोलण्याची पद्धत नाट्यमय वाटते. पण संजय तसं ठरवून करत नाही तर त्याच्या लेखन शैलीचा त्याच्या बोलण्यावर झालेला नैसर्गिक परिणाम आहे. लोकप्रभात संजय जेव्हा लिहित असे तेव्हा अनेकदा त्याच्या लेखांची जाहिरात झाल्यावर लोकप्रभा हातोहात खपून बाजारात मिळत नसे. असं यश उपसंपादकपदी असलेल्या पत्रकाराला फार क्वचित लाभलेलं आहे. संपूर्ण आयुष्यात संजयचा रस्ता सोपा सरळ आणि कधीच सुरळीत नव्हता. कोणतीही गोष्ट त्याला सहज सोपी आणि सुरळीतपणे लवकर मिळालेली नाही. लोकप्रभात जेव्हा तो लिहित असे तेव्हा लोकसत्ता-एक्सप्रेसमध्ये राज ठाकरे कार्टून काढत असत. ठाकरे घराण्याचे आणि संजयचे संबंध खरे तिथून सुरू झाले. पण हेही तितकंसं खरं नाही. कारण संजय लहान असताना शिवसेनेच्या आंदोलनामध्ये त्याच्या घरातल्या वडिलधाऱ्या पुरूषांना रक्तबंबाळ होईपर्यंत पोलीस मारत घेऊन गेलेले आहेत. एवढं शिवसेनेचं वेड त्याच्या घरात होतं. संजयमध्ये पण ते वेड आलंय. लोकप्रभाचे आणि लोकसत्ताचे तेव्हाचे संपादक आणि संजयचे त्या अर्थाने तेव्हाचे शिक्षक माधव गडकरी यांना ही एक बाब फार खुपायची. माधव गडकरींचा त्या काळात इतका दबदबा होता की, माधव गडकरींच्या केबिनबाहेर मंत्री बसलेले असायचे. लोकसत्तेचा अग्रलेख हा महाराष्ट्राला त्या काळात दिशादर्शक असायचा. अंतुलेसारख्या मुख्यमंत्र्यांना पण माधव गडकरींनी पदावरून जायला लावले होते. माधव गडकरी हे समाजवादी विचारांचे होते. त्यांना संजयची शिवसेनेविषयीची भक्ती आवडत नसे. त्यामुळे त्यांच्या मनात संजयबद्दल एक दूषित पूर्वग्रह निर्माण झालेला होता. स्वाभाविक त्याचे परिणाम म्हणून गडकरी संजयवर काही अंशी अन्याय करू लागले किंवा असं म्हणू की गडकरी आपल्यावर अन्याय करतायत असं संजयला वाटलं… असा अन्याय सहन करेल तो संजय राऊत कसला? त्याने बरेच दिवस सहन केलं आणि वाट पाहून एक दिवशी माधव गडकरींना मुतारीत  गाठलं. तिथे त्यांना शिवसेनेच्या पद्धतीने त्या भाषेत हग्यादम दिला. तो दम इतका जालीम होता की गडकरी स्वत:च्याच बुटावर मुतले. 

शरद पवार हे संजयचे अजून एक श्रद्धास्थान होतं. पवारांचं आणि संजयचं नातं नेमकं कधी जुळलं त्याच्याबद्दल मला आता नेमकं आठवत नाही. त्या काळातही संजय नेहमी एक गोष्ट सांगत असे, ‘महाराष्ट्रात कोणताही मोठा बदल घडवायचा असेल तर एक तर बाळासाहेब ठाकरे लागतील किंवा शरद पवार लागतील.’अनेकांना संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात राजकीय कारणांमुळे संबंध असल्याचं वाटतं, ते तितकसं खरं नाही. कारण कारणं राजकीय नव्हती तेव्हासुद्धा संजय शरद पवारांना वडिलांसारखा मान देत असे आणि प्रेम करत असे आणि शरद पवार संजयला मुलाप्रमाणे वागवत असत हे मी डोळ्यांनी बघितलं आहे. नंतर संजय खासदार होऊन दिल्लीला आला तेव्हा संजयने बाळासाहेब आणि शरद पवार यांच्यामध्ये सेतू म्हणून काम केलेलं आहे.पण ते नंतरचं.

तर अशी संजयची लोकप्रभामधली कारकीर्द जी बाह्यजगात आणि अंतर्गतही दबदबा निर्माण करणारी होत असतानाच अशोक पडबिद्री हे ‘सामना’चे कार्यकारी संपादक सामनाचं समाजवादीकरण करत होते! संपादक बाळसाहेब ठाकरेंना ते रूचत नव्हतं. जालीम आणि रोखठोक लिहिणारा माणूस कोण असावा? या शोधात बाळासाहेब होते. संजयने एकदा लोकप्रभामध्ये बाळासाहेबांच्यावर जबरदस्त टिका केली आणि त्यांची बाजू मांडण्याकरिता किंवा त्यामिशाने त्यांची जोरदार, रोखठोक मुलाखतही मिळवली. मला वाटतं संजयने बाळासाहेबांच्या त्यानंतर अनेक मुलाखती ‘सामना’साठी घेतल्या पण ‘लोकप्रभा’ मधली त्याने घेतलेली बाळासाहेबांची ही पहिली मुलाखत. संजयबाबत मतभेद आणि टिका यांच्या पलीकडे पाहण्याचं शहाणपण बाळासाहेब ठाकऱेंमध्ये होतं. पण याचा अर्थ बाळासाहेब ठाकरेंच्या ‘सामना’मध्ये संजयला थेट प्रवेश मिळाला असं नव्हे. राज ठाकरे यांची संजयशी असलेली मैत्री आणि त्याकाळात राज ठाकरेंच शिवसेनेत असलेलं नेते म्हणून वजन या दोन्हींच्या माध्यमातून संजय ‘सामना’त पोहोचला. अर्थात ‘सामना’चं कार्यकारी संपादकपद पण त्याला इतक्या सुखासुखी मिळालं नाही. मला आठवतं त्याप्रमाणे संजयने त्यावेळेला बाळासाहेबांना कार्यकारी संपादकपद देणार असाल तर लोकप्रभा सोडून सामनात येतो’- असं सांगितलं तेव्हा संजय राऊतचं वय होतं फक्त २८ वर्षे. बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्या वयात प्रचंड अंतर. पण त्या दिवशीपासून बाळासाहेबांचं निधन होईपर्यंत संजय बाळासाहेबांच्या बूटात पाय घालून लिहित राहिला. अर्थात बाळासाहेबांचं संजयवरचं प्रेम आणि मनाचा मोठेपणा हा की, बाळासाहेबांनी पुढे त्यांच्यासाठी संजयने लिहिलेल्या अग्रलेखांची पुस्तकं संजयला त्याच्या स्वतःच्या नावाने प्रसिद्ध करायला लावली. बाळासाहेब ठाकरे आणि संजय एकात्म होते. संजय ‘सामना’मध्ये कार्यकारी संपादक म्हणून रुजू झाला त्यादिवशीपासून बाळासाहेबांच्या निधनापर्यंत सामनाने – संजयने – शिवसेनेने आणि बाळासाहेबांनी अनेक चढउतार पाहिले. पण संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांचं एकात्म असणं हे कधीच बदललं नाही. अर्थात मतभेदाचे प्रसंग कमी आले, असं अजिबात नाही. त्यातला एकच मतभेदाचा प्रसंग खूप मोठा आणि तणावपूर्ण होता. तो प्रसंग होता दुसऱ्या संजयचा. म्हणजे संजय दत्तचा. संजय दत्तवर संजय राऊत यांनी तुफान टिका केली होती. अचानक बाळासाहेब ठाकरेंनी आपली भूमिका बदलून त्याला जाहिरपणे ‘उगवता सूर्य’ वगैरे म्हटलं. संजय राऊत याच रक्त उकळलं आणि त्यांनी चक्क पेपरमध्येच मूळ भूमिकेच्या विरोधात काहीतरी लिहिलं. बाळासाहेब संजय राऊतवर प्रचंड संतापले. संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरेंमध्ये एक छोटसं कोल्डवॉर झालं. अर्थात या युद्धाचा शेवट माँसाहेबांच्या मध्यस्थीने झाला. माँसाहेबांनी दोघांना एकत्र जेवायला बसवून त्यांच्यात समेट करून दिला. संजयच्या बाबतीत बाळासाहेब खूप उदारमतवादी होते. बाळासाहेबांनाही संजय गुरू मानत असल्यामुळे त्यांचा राग आणि त्यांची बोलणी तो त्यांच्यासमोर बसून सहन करीत असे. बाळासाहेब मनस्वी माणूस होते.चिडले की कोथळा काढतील. शांत झाले की त्यालाच पेढा भरवतील, असा त्यांचा स्वभाव होता. तो संजयलाही अचूक माहीत होता. अनेकदा संजयच्या लेखनामुळे कोर्टकज्जे होत असत. केवळ संजयच्या लिखाणामध्येच नव्हे तर सामनामध्ये कोणत्याही प्रकारच्या लेखनामुळे अशा प्रकारच्या गोष्टी घडत असत. संजय सामनामध्ये झालेल्या कोणत्याही प्रकाराची पूर्ण जबाबदारी घेऊन बाळासाहेबांना सामोरा जात असे आणि जर बाळासाहेबांना त्या घटनेचा राग आला असेल तर ते संजयची चंपी करत असत. मी स्वतः असे अनेक प्रसंग संजयच्या बाजूने पाहिले आहेत. त्यातला एक प्रसंग तर माझ्यामुळेच ओढवला होता.

‘सामना’मध्ये मी माझ्या खऱ्या नावाने एक सदर चालवत असे. ज्याचं पुढे पुस्तक झालं. पण दुसरं एक सदर मी टोपणनावाने चालवत असे. ते सटायर होतं. ते रोज ‘सामना’च्या पहिल्या पानावर संजय छापत असे. त्यात एकेदिवशी मी आसाराम बापूची मजबूत टवाळी करणारं काहीतरी लिहिलं. आसाराम बापूच्या शिष्यांनी खूपच उछलकूद केली आणि  ते सरळ बाळासाहेबांकडे गेले. बाळासाहेबांना त्यांची बाजू पटली असावी आणि त्यांना माझा रागही आला असावा. मला धार्मिक विचार आवडत नाहीत याची त्यांना कल्पना होती. ‘सामना’मध्ये लिहिलेल्या लेखनाची जबाबदारी कार्यकारी संपादक म्हणून संजयची होती आणि संजयने ती घेतली पण. संजयने बाळासाहेबांना सांगितलं की राजूने माझ्या सांगण्यावरून हे लिहिलेलं आहे आणि त्यावरून बाळासाहेब संजयवर खूप रागावले. सामनामध्ये लिहिणाऱ्या प्रत्येक लेखकाला संजय राऊत या कार्यकारी संपादकाचं संरक्षण असतं. संजय कधीही कोणत्याही लेखकाला ‘हे’ लिही किंवा ‘हे’ लिहू नको’ असं कधीच सांगत नाही. मी अनेक भांषांतील अनेक नियतकालिकांमध्ये लिहिलेलं आहे. परंतु ‘सामना’मध्ये लिहिणं हा एक खास अनुभव होता. याचं कारण माझ्या लिखाणातली एकही ओळ कापली जायची नाही किंवा हे लिहू नका किंवा हेच लिहा असा कोणाचाही फोन यायचा नाही.

खरं तर ‘सामना’मध्ये लिहायची सुरूवात यामुळे झाली की मी अनेक नियतकालिकांसोबत ‘सकाळ’मध्येही त्याकाळात एक सदर लिहित असे. ‘सकाळ’च्या सदराची दर आठवड्यात काहीतरी कापाकापी झाल्यामुळे माझं ब्लडप्रेशर वाढत असे. संजयने हे बघून ठेवलं होतं. एकदा संजयकडे ‘सामना’च्या त्याच्या केबिनमध्ये बसलो असताना त्याच्या कंम्प्यूटवरून मी मेल बघायला घेतला. संजय म्हणाला, “काय बघतोस?” तर मी म्हणालो, “लिहिलेल्या सदराला वाचकांच्या काय प्रतिक्रिया आल्या आहेत त्या बघतोय’. तर तो म्हणाला, “ तू ‘सामना’त लिही म्हणजे तुझ्या कोणी ओळी कापणार नाही. आम्ही ‘सामना’त कोणी लिहिलेल्या ओळी कापत नाही. आमचे वाचक प्रतिक्रिया द्यायला मेलवर जाणार नाही. सरळ फोन करतील आणि अक्षरशः तसंच झालं. ‘सामना’त मी तसं लिहिल्यावर खरच दिवसभर वाचक फोन करत असत. शिवाय ‘सामना’तल्या लेखाची माझी एकही ओळ कधीच कापली गेली नाही. ना संजयने कापली ना बाळासाहेब ठाकरेंनी कापली. बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम करत असतानासुद्धा संजयला शरद पवारांविषयी फार ममत्व वाटे. बाळासाहेब असो किंवा शरद पवार असो तात्विकदृष्ट्या मला पटायचे नाहीत. पण माणसांबद्दल तात्विकदृष्ट्या सगळंच पटलं पाहिजे असं नाही, हे समजावण्यासाठी  संजयचा बराच काळ माझ्यावर खर्च होत असे. शरद पवारांच्या प्रशासकीय कौशल्यचा संजय जबर चाहता होता. शरद पवारही संजयला खूप प्रेमाने वागवत असत. अर्थात यात कोणत्याही प्रकारच्या लाभाचा होतू दोन्ही बाजूने नव्हता. कारण संजय जेव्हा ‘सामना’चा कार्यकारी संपादक होता. तेव्हाही त्याचं भांडूपचं घर त्याला एका टप्प्यात उभं करता आलं नाही. ते टप्प्याटप्प्याने त्याने वाढवलेलं आहे. एवढंच काय तर संजय खासदार झाला तेव्हाही त्याला पाच पन्नास लोकांना जेवायला बोलवायचं तर आर्थिक ताण सतावत असे. आज अनेक मराठी पत्रकारांना संजय आपला रोलमॉडेल वाटतो किंवा संजयमध्ये अनेक पत्रकारांना आपली स्वप्न दिसतात, तेव्हा त्यांनी हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की, संजयने आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर पत्रकार, लेखक आणि सरस्वतीचा पूजक म्हणून ज्या आर्थिक टंचाईला सामोरे जावं लागते त्या आर्थिक टंचाईला तोंड देतच हा मार्ग पुढे नेलेला आहे.

माधव गडकरी हे समाजवादी विचारांचे होते. त्यांना संजयची शिवसेनेविषयीची भक्ती आवडत नसे. त्यामुळे त्यांच्या मनात संजयबद्दल एक दूषित पूर्वग्रह निर्माण झालेला होता. स्वाभाविक  त्याचे परिणाम म्हणून गडकरी संजयवर काही अंशी अन्याय करू लागले किंवा असं म्हणू की गडकरी आपल्यावर अन्याय करतायत असं संजयला वाटलं… असा अन्याय सहन करेल तो संजय राऊत कसला? त्याने बरेच दिवस सहन केलं आणि वाट पाहून एक दिवशी माधव गडकरींना मुतारीत  गाठलं. तिथे त्यांना शिवसेनेच्या पद्धतीने त्या भाषेत हग्यादम दिला. तो दम इतका जालीम होता की गडकरी स्वत:च्याच बुटावर मुतले. 

शरद पवार हे संजयचे अजून एक श्रद्धास्थान होतं. पवारांचं आणि संजयचं नातं नेमकं कधी जुळलं त्याच्याबद्दल मला आता नेमकं आठवत नाही. त्या काळातही संजय नेहमी एक गोष्ट सांगत असे, ‘महाराष्ट्रात कोणताही मोठा बदल घडवायचा असेल तर एक तर बाळासाहेब ठाकरे लागतील किंवा शरद पवार लागतील.’ अनेकांना संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात राजकीय कारणांमुळे संबंध असल्याचं वाटतं, ते तितकसं खरं नाही. कारण कारणं राजकीय नव्हती. तेव्हासुद्धा संजय शरद पवारांना वडिलांसारखा मान देत असे आणि प्रेम करत असे आणि शरद पवारही संजयला मुलाप्रमाणे वागवत असत हे मी डोळ्यांनी बघितलं आहे. नंतर संजय खासदार होऊन दिल्लीला आला तेव्हा संजयने बाळासाहेब आणि शरद पवार यांच्यामध्ये सेतू म्हणून काम केलेलं आहे. पण ते नंतरचं. संजयने पत्रकारितेच्या कारकिर्दीमध्ये पवारांएवढं कोणालाच झोडपलेलं नाही. त्याबाबतीत त्याने कधीच तडजोड केलेली नाही. गंमत म्हणजे  खासदार झाल्यावरही लेखनाच्या शैलीत त्याने अजिबात बदल केलेला नाही.

 संजय राजकारण करण्याचं कारण

 संजयने मूळात राजकारण करायचं ठारवलं होतं असं नव्हे. किंबहुना काहीशा अपघाताने तो राजकारणात आला. मला आठवतं त्याप्रमाणे झालं होतं असं की, त्याच्या पत्रकारितेतल्या कारकिर्दीचा गौरव म्हणून संजयला पद्मश्री मिळणार होती. अर्थात संजय हे डिझर्व्ह पण करत होता. संजयला पद्मश्री मिळणार अशी नव्याण्णव टक्के शक्यता असताना भाजपच्या दिल्लीतल्या एका बड्या नेत्याने पंतप्रधान कार्यालयात आपलं सर्व वजन वापरून ती पद्मश्री एका उद्योगपतीला द्यायला लावली. ती गोष्ट संजयला खूप लागली. आपल्या मेहनतीचं फळ मिळत नाही आणि चीज होत नाही अशी जखम त्याच्या मनात घर करून बसली. अर्थात प्रत्येक विपरित गोष्टीच्याविरूद्ध बंड करून लढणं हा संजयचा स्वभाव असल्यामुळे आपण राजकारणात जायचं आणि दिल्लीतच मोठं व्हायचं हे त्याने तेव्हाच ठरवलं. पारितोषिकांचा नाद त्याने सोडला. या टप्प्यावर त्याला उद्धव ठाकरे यांनी खूप साथ दिली. त्याने स्वच्छपणे उद्धव ठाकरेंजवळ आपलं मनोगत व्यक्त केल्याबरोबर त्यांनी मोकळ्या मनाने बाळासाहेबांच्या सहमतीने संजयला शिवसेनेचं – खासदारपदाचं –  राज्यसभेचं तिकीट पहिल्यांदा दिलं. अर्थात ही राज्यसभा आणि राजकारण संजयच्या वाट्याला सहजासहजी आणि सोपेपणाने आलेलं नव्हतं. हिंदी ‘सामना’मध्ये संजयने स्वतःच्या हाताने मोठ्या केलेल्या संजय निरूपमला तोवर एकदा शिवसेनेतर्फे राज्यसभा मिळून गेलेली होती. अशा परिस्थितीत संजय राऊत राज्यसभेत पोहोचले. मला ती संध्याकाळ अजून आठवते. जेव्हा संजयचं राज्यसभेचं तिकीट पक्क झालं त्या संध्याकाळी त्याने मला फोन केला आणि तो म्हणाला, “आपलं तिकीट झालेलं आहे. पण कोणाला सांगू नको.” कोणाला सांगू नको हे सांगताना त्याच्या मनात पद्मश्रीच्या वेळेस त्याचा झालेला घात आणि त्याचा विषाद त्याचा आवाज सांगत होता- ‘कोणाला सांगू नको जोपर्यंत ते हातात येत नाही.’ पुढे खासदार झाल्यावर संजयची वाटचाल इतकी सोपी नव्हती. मूळात राजकारण सोपं नाही. दिल्ली त्याहून सोपी नाही. पण संजय हा चिवट लढवय्या आहे आणि तो वाट्टेल तसे परिश्रम करू शकतो. या एका गुणाच्या जोरावर त्याने सामनाचं कार्यकारी संपादकपद आणि खासदारपद दोन्हीही पुढे रेटलं. आठवड्यातून दोनदा तो दिल्ली– मुंबई अपडाऊन करत असे. ‘सामना’चं लिखाण शनिवारी, रविवारी तो करत असे. रोखठोक, सच्चाई, अग्रलेख याचं काम तो करत असे.परत दिल्लीला जाऊन तो राज्यसभेसाठी प्रश्नोत्तरांची तयारी, भाषणांचे लेखन, ज्या समित्यांवर होता त्यांचं सगळं काम सांभाळत असे. मी जेव्हापासून संजयला बघितलेलं आहे, तेव्हापासून त्याने अठरा अठरा तास काम केलेलं बघितलेलं आहे आणि त्याला कोणालाही हे सांगताना मात्र पाहिलेलं नाही!

संजय जेव्हा खासदार झाला तो काळ शिवसेनेच्या आयुष्यातला सर्वात खडतर काळ होता. संजय जेव्हा पहिल्यांदा खासदार झाला तेव्हा नारायण राणेंचं बंड, राज ठाकरेंच्या पक्षाची स्थापना हे सगळं त्याकाळात झालं. राज आणि उद्धव  दोघेही संजयचे जवळचे मित्र होते आणि आहेत. राज ठाकरेंनी स्वतंत्र पक्ष तयार केल्यामुळे संजयसारख्याला खूप मोठा पेच पडला असं बऱ्याच जणांना वाटलं. परंतु संजयला त्यावेळेला काहीही पेच पडायचा नाही.किंबहुना संजयने मला एका वाक्यात सांगितलं की, ‘माझे गुरू जे सांगतील ते मी करणार. बाकी राज माझा मित्र आहेच.’ त्यामुळे संजय बाळासाहेबांबरोबर राहिला आणि त्याने उद्धवला आपली संपूर्ण निष्ठा अर्पण केली. उद्धव हा सुद्धा संजयचा अतिशय जवळचा मित्र.

व्यक्तिशः माझी आणि उद्धवची चांगली मैत्री व्हावी म्हणून संजयने त्याच्या परिने होतील ते सगळे प्रयत्न केले… संजय रूढार्थाने हिंदुत्ववादी वगैरे नाही. पण बाळासाहेबांचा तो कट्टर शिष्य आहे. नारायण राणे जेव्हा शिवसेना सोडून गेले तेव्हा संजय न्यूयॉर्कमध्ये होता. तोपर्यंत संजयने माझी आणि उद्धवची चांगली मैत्री करून दिली होती. उद्धव स्वतः स्वभावाने खूप सौम्य आणि शांत आहेत. राणे शिवसेना सोडून गेले तेव्हा राणेंनी बोलून आणि लिहून शिवसेनेवर तुफान हल्ला सुरू केला आणि कोकणामध्ये राणेविरूद्ध शिवसेना असा प्रचंड मोठा निवडणुकीचा संघर्ष उभा राहिला. तेव्हा संजयने अमेरिकेहून फोन करून मला कोणाची बाजू पटते? असं विचारलं. तेव्हा मी संजयला म्हटलं, “मला उद्धवची आणि शिवसेनेची बाजू पटते. पण राणेंना मोठं शिवसेनेनेच केलंय आणि ते जे बोलतायतं ते शिवसेनेचंच तत्वज्ञान आहे.” तेव्हा संजय म्हणाला.  “भूतकाळातलं आठवत बसायचं नाही. आता जे पटतं ते करायचं.” आणि म्हणून त्याने आपल्या अनुपस्थितीत सामनाच्या पहिल्या पानावर नारायण राणेंच्या फुटिरतेविरूद्ध मला लेखमाला चालू करायला सांगितली. रिपोर्ताज शैलीमध्ये मी वीस कॉलम रोज लिहिले. ते खूप गाजले. त्याची लोक आजही आठवण काढतात. मला परवा शिरवळला भाषणाला गेलेलो असताना एकाने त्याची आठवण करून दिली.एवढचं नव्हे तर त्यावेळेला राणेविरूद्ध प्रचारासाठी बाळासाहेब ठाकरे कुडाळला गेले होते तेव्हा राणेविषयी खरं जाणून घ्यायचं असल्यास राजू परूळेकरांचं लेखन वाचा असं जाहीर भाषणात बोलल्याचं आठवतं. ती लेखमाला लिहित असताना एकदा अशी परिस्थिती होती की, मी आणि राज ठाकरे कणकवलीला शर्मिला ह़ॉटेलमध्ये राहत होतो. तेव्हा मी सकाळी उठून कागद घेऊन कुरूकुरू लिहित बसायचो आणि फोनवर संजयला काय लिहिलं ते सांगायचो. एकदा राज मला म्हणाला, “सक्काळी उठून तुम्ही एवढ्या शिस्तबद्धपणे का लिहिता? अगोदर कधी एवढ्या शिस्तबद्धपणे लिहिताना बघितलं नाही.” त्यांना मी तेव्हा उत्तर दिलं नाही, ते उत्तर आज लिहितो. संजयच्या श्रमांचा आणि शिस्तबद्धपणाचा संसर्ग त्याच्याजवळच्या सर्वांना होत असे. त्याचा एक भाग म्हणून तेवढ्या शिस्तबद्धपणे आणि निकराने मी ते लेखन करत होतो. माझं लेखन हे शिस्तबद्ध होत नाही याची संजयला जाणीव होती. परंतु त्याच्या संपादकीय कौशल्याने तो मला सतत्यापूर्ण लिहितं करत असायचा.

मी लिहिलेल्य सदरातल्या एका व्यक्तीचित्रणाविषयी संजय आणि माझ्यात एक विलक्षण प्रसंग घडला. मी नितीन गडकरींवर लिहिलं होतं. सर्वसाधारणपणे मी लिहिलेलं संजय फक्त एक नजर टाकत असे आणि ते छपाईला जात असे. लेखात नितिन गडकरींवर मी तुफान टीका केली होती आणि तेव्हा शिवसेना-भाजपची युती होती. त्या रात्री संजयचा मला प्रचंड ताणतणावात फोन आला. संजय मला म्हणाला की, “हा कॉलम लिहू नकोस असं मी सांगू शकत नाही कारण तू माझा लेखक आहेस. पण हे जर मी छापलं तर त्याच्या परिणामांचा स्वीकार म्हणून मला उद्याच राजीनामा द्यावा लागेल. मी उद्याच्या सदराची जागा रिकामी सोडणार नाही. जर अर्ध्या तासात तू नवीन काही पाठवलं नाहीत तर मी हेच छापेन. तू विचार कर. तू बऱ्याचदा विचार न करता लिहितो. लेखन म्हणून ते छान असलं तरी त्याचे परिणाम भयंकर असतात. तुला अर्धा तास आहे. अर्ध्या तासानंतर हा लेख मी सोडतो छापायला… असं सांगून त्याने फोन ठेवला. मी रिक्षात होतो. रीक्षा थांबवली. उतरलो. स्टेशनरीच्या दुकानात पेन आणि कागद खरेदी केले. त्या दुकानाच्या काऊंटरवर उभा राहून मी गडकरींवरचा लेख पुन्हा नव्याने लिहिला आणि विसाव्या मिनिटाला त्याच दुकानातून संजयला फॅक्स केला. संजयसारखे संपादक स्फोटक लेखकाला नाशपूर्ण लेखनापासून कसे वाचवतात याचं हे उदाहरण. अर्थात असे संपादक कायम मला लाभले नाहीत. आणि बऱ्याचदा मीही कोणाचं ऐकलं नाही, हेही तेवढचं खरं.

संजयने एकदा लोकप्रभामध्ये बाळासाहेबांच्यावर जबरदस्त टिका केली आणि त्यांची बाजू मांडण्याकरिता किंवा त्यामिशाने त्यांची जोरदार, रोखठोक मुलाखतही मिळवली. मला वाटतं संजयने बाळासाहेबांच्या त्यानंतर अनेक मुलाखती ‘सामना’साठी घेतल्या पण ‘लोकप्रभा’ मधली त्याने घेतलेली बाळासाहेबांची ही पहिली मुलाखत. संजयबाबत मतभेद आणि टीका यांच्या पलीकडे पाहण्याचं शहाणपण बाळासाहेब ठाकऱेंमध्ये होतं. पण याचा अर्थ बाळासाहेब ठाकरेंच्या ‘सामना’मध्ये संजयला थेट प्रवेश मिळाला असं नव्हे. राज ठाकरे यांची संजयशी असलेली मैत्री आणि त्याकाळात राज ठाकरेंच शिवसेनेत असलेलं नेते म्हणून वजन या दोन्हींच्या माध्यमातून संजय ‘सामना’त पोहोचला.

राजकारणी संजय हा संपादक आणि लेखक संजयपेक्षा वेगळा आहे, असं अजिबात नाही. संजय नेहमीच असं म्हणतो की, “मी जो काही आहे तो संपादकपदामुळे आहे.” अर्थात पूर्ण संपादक तो आजच झालाय. तोपर्यंत तो कार्यकारी संपादक होता. अगोदर बाळासाहेब ठाकरेंसोबत आणि नंतर उद्धव ठाकरेंसोबत. उद्धव ठाकरेंच्या सौम्य स्वभावाला संजयचा तिखट स्वभाव कसा जमेल असं मला सुरूवातीला वाटत होतं. किंबहुना संजयने ते लिलया पेललं आणि उद्धव यांनीही. उद्धव यांच्यावर संजयचं प्रेम आहे. खरंतर संजयचं मित्रावर प्रेम आहे. मित्र म्हटला की संजय त्याचा गुन्हाही आपल्या अंगावर घेतो. हे शब्दशः खरं आहे. आणि मी पाहिलेलं ही आहे. चिवटपणा, परिश्रम आणि दुनियेला अंगावर घेण्याची वृत्ती ही लेखक संजयची आहे. ती त्याने राजकारणात भाषांतरित केली आहे. संकटाच्या प्रसंगी ठाम निश्चयाने रेटून पुढे जातच राहायचं हा संजयचा स्वभाव आहे. तो त्याच्याबरोबर काम करणाऱ्या सर्वांना चार्ज करतो. त्याच्या बोलण्यातली आणि वागण्यातली नाट्यमयता ही देखील त्याच्या लेखनातून आलेली आहे. हे उपजत आहे. ते नाटक नव्हे. अनेकदा संजय बोलत असताना त्याला न ओळखणाऱ्या लोकांना तो नाटकी बोलतो असं वाटतं. संजयच्या नाट्यमय लिहिण्याची सवय त्याला बोलतानाच संवाद घडवत जाण्याची ताकद देते. त्याचा तो परिपाक असतो. हे त्याला जवळून ओळखणाऱ्यांना माहीत आहे. या सगळ्या गुणांचा आणि उर्जेचा शिवसेनेसाठी संजयने पुरेपूर वापर केला. उद्धवची शक्तिस्थळे आणि उद्धवची कमजोरी, पवारसाहेबांची शक्तिस्थळे आणि पवार साहेबांची युक्ती या सगळ्यांची समीकरणं जुळवली. आणि भाजपच्या विरूद्धच्या या युद्धात ती पणाला लावली. त्याचे परिणाम म्हणून शिवसेनेतर्फे एकाकी लढत देऊन त्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचवून दाखवलं. ज्यादिवशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्याच दिवशी त्यांनी सामनाच्या संपादकपदाचा राजीनामा दिला आणि संजय राऊत सामनाचे पूर्ण संपादक झाले. संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत कार्यकारी संपादक होते. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीत त्यांना सत्तेचा मार्ग सुकर करून दिला. एका पद्धतीने गुरूदक्षिणाच दिली. कार्यकारी संपादकाचा पूर्ण संपादक व्हायला एवढा मोठा प्रवास संजय राऊतांना करावा लागला. संजय राऊतांच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट सहजासहजी आणि सुखासुखी मिळालेली नाही त्याचा हा एक क्लायमॅक्स होता.

व्यक्तिगत आयुष्यात संजय स्वभावाने शांत आहे. आपल्या दोन मुलींचा बाबा म्हणून त्यांच्यासाठी तो काय वाट्टेल ते करेल. मुलींवर ओरडताना मी त्याला कधीही बघीतलेलं नाही. त्याच्या मनात सतत एक ज्वालामुखी धगधगतो असं त्याच्या लिखाणातून आणि राजकीय जीवनात आढळतं. परंतु एक बाप म्हणून तो अतिशय शांत माणूस आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाध्ये खूप विरोधाभास आहेत. त्यामुळे संजयच्याबद्दल गैरसमज खूप आहेत आणि ते चटकन होतात. संजयला शत्रूही खूप आहेत आणि ते वाढवण्यात संजय कुशल आहे! गुजरातमध्ये एक मित्र आहेत. ते ज्योतिष्यही बघतात. ते संजयची पत्रिका बघून मला म्हणाले होते की, ये आदमी दिल्ली में बहोत बडा नेता बनेगा. तेव्हा संजय दिल्लीत खासदार झालेला होता. मी त्यांना म्हटलं, “हा! तो खासदार बनलाय दिल्लीत.” तर त्यावर ते म्हणाले होते, “सांसद नही बहोत बडा नेता.” त्यांना काय म्हणायचं असेल?  भविष्यात संजय काहीतरी अद्भूत भूमिकेत दिसणार का? हे अजून प्रश्नच आहेत. ज्योतिष्य खरं असतं का खोटं असतं, हेही मला माहिती नाही. परंतु गेल्या महिन्याभरात देशभरातल्या लोकांच्या मनात संजयने घर केलं हे निश्चित. माणसं हल्ली त्याचा सकाळचा ट्विट वाचायला आतूर असतात. हजार अग्रलेखांचं बळ त्या एका ट्विट्मध्ये असतं. असं भाग्य किती लोकांना मिळतं? खरं तर असं भाग्य किती पत्रकारांना मिळतं? संजयने मला एक पुस्तक अर्पण केलयं. मीही त्याला एक पुस्तक अर्पण केलंय. त्याने मला अर्पण केलेल्या पुस्तकाचं नाव आहे ‘गरूड नजर’. जे नाव त्याच्या व्यक्तिमत्वाचं निदर्शक आहे. मी त्याला अर्पण केलेल्या पुस्तकाचं नाव आहे ‘माणसं : भेटलेली न भेटलेली’ जे माझ्या स्वभावाशी सुसंगत आहे. परंतु हे खूपच अपूर्ण आहे. खरं तर संजयवर लिहायचं तर एक लेख न लिहिता पुस्तकच लिहावं लागेल. कारण संजयच्या आयुष्यातल्या दहा अशा महत्त्वाच्या लढाया तरी असतील ज्या एखाद्या थ्रिलर चित्रपटापेक्षाही मनाची जबरदस्त पकड घेणाऱ्या आहेत. समस्या अशी आहे, की ठरवून लिहायचं म्हटलं तर लिहू शकेन असा लेखक मी नाही आणि अलीकडे संजयही भेटतो कुठे?

राजू परूळेकर यांच्या ब्लॉगवरून साभार

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा