सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना एसीबीची पूर्ण क्लीन चीट, भाजपच्या आरोपांतील हवाच गुल !

0
105
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी जलसंपदामंत्री अजित पवार यांना सुमारे 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पूर्णपणे क्लीन चीट दिली आहे. एसीबीचे महासंचालक डॉ. परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याबाबतचे शपथपत्रच दाखल केले आहे.

1999 ते 2009 या काळात राज्यात आघाडीचे सरकार असताना राज्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये अनियमितता झाल्याचे आरोप करण्यात आले होते. या सिंचन प्रकल्पांमध्ये 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत जनमंच या स्वयंसेवी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. भाजपने याच कथित घोटाळ्याचे भांडवल करून 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता हस्तगत केली होती. सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवारांना तुरूंगात टाकू अशा वल्गनाही 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या. आता या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या एसीबीने उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करून कोणत्याही गुन्ह्यात अजित पवारांचा संबंध असल्याचे दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही, असे म्हटले आहे. कथित सिंचन घोटाळ्यात 2654 निविदांची चौकशी सुरू आहे. त्यापैकी पुरावेच नसल्यामुळे 45 निविदांची चौकशी एसीबीने बंद केली आहे. सिंचन घोटाळ्याशी संबंधित आणखी काही माहिती समोर आल्यास किंवा न्यायालयाने तसे आदेश दिल्यास या प्रकरणाची आणखी चौकशी केली जाऊ शकते, असे एसीबीने दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालय एसीबीच्या या शपथपत्रावर कोणता निर्णय घेते, हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा