भाजप नेत्या चित्रा वाघ अडचणीत, उत्पन्नापेक्षा जास्त बेहिशेबी संपत्ती प्रकरणी पतीविरोधात गुन्हा

0
65

मुंबईः उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

चित्रा वाघ यांचे पती परळच्या महात्मा गांधी रुग्णालयात मेडिकल रेकॉर्डर म्हणून कार्यरत होते. १९९७ मध्ये तक्रारदार व्यक्तीच्या भावाचा स्पायनल कॉड शस्त्रक्रियेदरम्यान महात्मा गांधी रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यामुळे तक्रारदाराने पोलिस आणि राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण कक्षाकडेही तक्रार केली होती. वैद्यकीय नोंदी ठेवणारे किशोर वाघ यांनी १५ लाखांची नुकसान भरपाई मिळावी आणि तक्रारदाराच्या भावाच्या मुलास नोकरी मिळावी, असा अर्ज करण्याची सूचना तक्रारदारास केली होती. त्यासाठी वाघ यांनी चार लाखांची लाच मागितली होती, अशी तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली होती.

या तक्रारीवरून एसीबीने किशोर वाघ यांना जुलै २०१६  रोजी सापळा रचून अटक केली होती. ते १२ दिवस पोलिस कोठडीतही होते. एसीबीने १ डिसेंबर २००६ ते जुलै २०१६ या कालावधीत किशोर वाघ यांच्याकडे असलेल्या संपत्तीची तपासणी केली होती. त्यात त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली होती. किशोर वाघ यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा ही संपत्ती ९० टक्क्याने अधिक आहे, असे एसीबीचे म्हणणे आहे. त्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे पतीचे हे प्रकरण उजेडात आले तेव्हा चित्रा वाघ या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  जुलै २०१९ मध्ये त्या भाजपमध्ये दाखल झाल्या होत्या. लाचखोरीच्या या प्रकरणातून पतीची सुटका करून घेण्यासाठीच चित्रा वाघ या भाजपमध्ये गेल्याची चर्चा तेव्हा होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली नाही. त्यामुळे हे प्रकरण तसेच प्रलंबित राहिले. आता पूजा चव्हाण प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात चित्रा वाघ मैदानात उतरल्या असतानाच या प्रकरणाने पुन्हा उचल खाल्ली आहे आणि चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा