कंगना रणौतच्या बॉडीगार्डने मेकअप आर्टिस्टवर केला बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार; गुन्हा दाखल

0
1053
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः सतत कोणत्या ना कोणत्या मुद्यावर टिप्पणी करून वादाच्या भोवऱ्यात अडकणारी अभिनेत्री कंगना रणौतचा पर्सनल बॉडीगार्ड कुमार हेगडे याच्याविरोधात बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एका ३० वर्षीय मेकअप आर्टिस्टने तक्रार केल्यानंतर मुंबई पोलिसांनी याबाबत एफआयआर नोंदवला आहे. कुमार हेगडेने लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळा जबरदस्तीने बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार केला आणि ५० हजार रुपये ओरबाडले, अशी तक्रार या मेकअप आर्टिस्टने केली आहे.

 पीडित महिलेचा जवाब नोंदवून वैद्यकीय चाचणी केल्यानंतर मुंबईच्या डीएन नगर पोलिस ठाण्यात १९ मेच्या रात्री कुमार हेगडेच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, कुमार हेगडेची २०१३ मध्ये तिची भेट झाली. गेल्या वर्षी कुमारने तिला प्रपोज केले. तिने त्याचे प्रपोजल स्वीकारल्यानंतर कुमार हेगडे पीडत महिलेच्या फ्लॅटवर वारंवार आला आणि तिने तिच्यावर बळजबरीने अनेकदा बलात्कार केला आणि अनैसर्गिक अत्याचारही केला. २७ एप्रिल रोजी कुमार हेगडे तिच्या फ्लॅटमधून ५० हजार रुपये घेऊन पसार झाला, असेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

 कुमार हेगडे कर्नाटकला गेल्यानंतर त्याने पीडित महिलेचे फोन कॉल्स घेणेही बंद केले. त्यानंतर काही दिवसांनी कुमारच्या आईचा पीडितेला फोन आला. माझ्या मुलाला लग्नासाठी जबरदस्ती करू नको, म्हणून कुमार हेगडेच्या आईने नंतर पीडितेला धमकावण्यास सुरूवात केली. कुमार हेगडे ५ जून रोजी कर्नाटकातीलच एका मुलीशी लग्न करणार असल्याचेही पीडितेला कळले. मुंबई पोलिसांनी कुमार हेगडेविरोधात भादंविच्या ३७६ (बलात्कार), ३७७ (अनैसर्गिक लैंगिक संबंध) आणि ४२० (फसवणूक) या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

कंगना रणौतने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र कुमार हेगडे हा आपल्यासाठी कुटुंबातील सदस्यच आहे, असे कंगनाने म्हटले होते आणि काही दिवसांपूर्वीच कंगनाने कुमार हेगडेच्या वाढदिवसानिमित्त पार्टी देऊन तो साजराही केला होता.

 यापूर्वी कंगना रणौतचा हेअर स्टायलिस्ट ब्रेडन एलिस्टर डी गी याच्या विरोधात २०२० मध्ये एका अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा