अभिनेत्री कंगना रनौत, बहीण रंगोलीला मुंबई पोलिसांचे समन्स

0
69
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे सरकार आणि बॉलीवूडवर पातळी सोडून टीका करणारी अभिनेत्री कंगना रनौत आणि बहीण रंगोली चंडेलला मुंबई पोलिसांनी समन्स बजावले असून २६ आणि २७ ऑक्टोबरला पोलिसांसमोर हजर राहून तपासाला सहकार्य करण्यास सांगितले आहे.

मुंबईतील वांद्रे दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मागील आठवड्यात पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोलीविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. कंगना रनौत ट्विट करून केवळ बॉलीवूडची बदनामीच करत नाही तर जातीय द्वेष पसरवत असल्याची तक्रार कास्टिंग दिग्दर्शक साहील अशरफ अली सय्यद यांनी केली होती. कंगना आणि तिची बहीण रंगोलीविरुद्ध जातीय व्देष पसरवणे आणि राजद्रोहाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी वांद्र्याच्या दंडाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावरून कंगना व तिच्या बहिणीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

कंगना रनौतने ट्विट करून मुंबईला पाकव्याप्त काश्मीर आणि महाराष्ट्राला पाकिस्तान संबोधले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावरून अनेकांनी भाजपला धारेवर धरले होते. भारतातील एखाद्या राज्याला पाकिस्तान संबोधूनही भाजपवाल्यांना वाईट का वाटत नाही? त्यांचा राष्ट्रवाद आता कुठे गेला? असे सवाल भाजपला विचारण्यात आले होते.

विशेष म्हणजे कंगना रनौतने केलेल्या ट्विटवरून वाद निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारने तिला वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. कंगनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेखही केला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा