अभिनेत्रीने ‘फ्रंटलाइन वर्कर’चे खोटे ओळखपत्र बनवून घेतली कोरोना प्रतिबंधक लस!

0
585
छायाचित्रः ट्विटर

मुंबईः लसीचा तुटवडा असल्यामुळे अनेक पात्र नागरिकांना लसीपासून वंचित रहावे लागत असतानाच तामिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री मीरा चोप्रा हिने नोंदणी न करताच नियम डावलून लसीचा डोस घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या अभिनेत्रीचे कोविड केअर सेंटरमध्ये फ्रंटलाइन वर्कर असल्याचे खोटे ओळखपत्र बनवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे. या अभिनेत्रीचे फ्रंटलाइन वर्करचे ओळखपत्र कोणी बनवले? तिला लस कोणी आणि कशी दिली? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

ठाणे येथील पार्किंग प्लाझा के ठाणे महानगरपालिकेचे कोविड रुग्णालय आहे. या कोविड रुग्णालयात कर्मचारी पुरवठा करण्याचे कंत्राट ओमसाई आरोग्य केअर प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले आहे. अभिनेत्री मीरा चोप्राला याच ओम साईने ती या रुग्णालयात सुपरवायझर असल्याचे ओळखपत्र दिले. याच ओळखपत्राच्या आधारे अभिनेत्री मीरा चोप्राने पार्किंग प्लाझा येथील लसीकरण केंद्रावर लसीचा पहिला डोस घेतल्याचे उघड झाले आहे.

मीरा चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लसीचा पहिला डोस घेतल्याचा फोटो टाकला आहे. मीरा चोप्राने लसीचा पहिला डोस घेतल्याचे फोटो टाकल्यानंतर तिला ही लस कशी आणि कोणी दिली? यावर चर्चा सुरू झाली आणि मीरा चोप्राचा कारनामा उघडकीस आला. २८ मे रोजी तिला डोस देण्यात आला. विशेष म्हणजे मीरा चोप्राने लस घेतानाच्या फोटोबरोबरच तिने बनवलेले सुपरवायझरचे खोटे ओळखपत्रही पोस्ट केले. वाद वाढू लागल्याचे दिसताच तिने इंस्टाग्राम आणि ट्विटरवरील फोटो डिलिट करून टाकले आहेत.

लस घेण्यापुरतेच ओळखपत्र?: भाजपचे ठाणे- कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे मीरा चोप्राचे फ्रंटलाइन वर्करचे खोटे ओळखपत्र पोहोचले. तिच्या इंस्टाग्रामवरील फोटोचा स्क्रीनशॉट आणि ओळखपत्राचा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला. ठाणे महापालिकेने कोविड हॉस्पिटलमध्ये कर्मचारी पुरवण्याचे कंत्राट दिलेल्या ओम साई आरोग्य केअर कंपनीने चक्क तामिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटातील अभिनेत्री मीरा चोप्राला कामावर ठेवलंय. मीराला सुपरवायझर म्हणून काम करण्याचे कंत्राटदार किती पैसे देतोय? की लस घेण्यापुरते आयकार्ड दिले गेले? असा सवाल डावखरे यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा