लस घेतली म्हणजे कोरोनामुक्त झालो अशी गफलत बाळगू नकाः आरोग्यमंत्री टोपेेंचा इशारा

0
195

जालनाः कोरोनाची लस घेतली म्हणजे आपण कोरोनामुक्त झालो, असा गाफिलपणा बाळगू नका. लसीचे परिणाम जाणवायला दोन ते चार महिने लागू शकतात, असा खबरदारीचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

कोरोनाच्या लसीकरणाचा आज देशभरात ड्राय रन घेतला जात आहे. आरोग्यमंत्री टोपे यांच्या उपस्थितीत आज जालन्यातील आरोग्य केंद्रात हा ड्राय रन घेण्यात आला. यावेळी टोपे यांनी लसीकरणाबाबत नागरिकांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला.

कोरोना लसीकरणानंतर प्रत्येकाला चार सूचना केल्या जातील. लसीकरणाच्या पुढच्या डोजची तारीख त्यांना देण्यात येईल. लसीकरणानंतर कसे वागावे याबाबतच्या सूचनाही त्यांना करण्यात येतील. लस घेतली म्हणजे आपण कोरोनामुक्त झालो, असा गाफिलपणा बाळगू नका. लसीकरणानंतरही सोशल डिस्टन्सिंग, मास्क बंधनकारक असणार आहे. लसीचे परिणाम जाणवायला दोन ते चार महिने लागू शकतात, असे टोपे म्हणाले.

राज्यात चार टप्प्यांत लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. लस घेतल्यानंतर काही जणांना थोडेफार परिणाम जाणवू शकतात. त्यामुळे त्यांना अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. जर कोणाला काही त्रास जाणवला तर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल केले जाईल. एका बुथवर शंभर जणांच्या लसीकरणाचे नियोजन केले जाईल. यासाठी ओळखपत्र आणि कोरोना ऍपची पडताळणी करणारे पोलिस कर्मचारी,, शिक्षक आणि मग लसीकरण केंद्र असे टप्पे लसीकरणासाठी नागरिकांना पार पाडावे लागतील, असेही टोपे म्हणाले.

जानेवारीमध्येच प्रत्यक्ष लसीकरण शक्यः कोरोना लसीकरणाच्या मोहिमेची पूर्वतयारी म्हणून आज देशभरात लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात येत आहे. महाराष्ट्रातील जालना, पुणे, नागपूर आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन आरोग्य केंद्रावर हा ड्राय रन होत आहे. तज्ज्ञ समितीने सीरमच्या कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. औषध महानियंत्रकाकडूनही लवकरच परवानगी मिळेल, अशी अपेक्षा टोपे यांनी व्यक्त केली. जानेवारी महिन्यातच प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल, अशी अपेक्षाही टोपे यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा