लग्नाचे वय झालेले नसले तरीही सज्ञान जोडप्याला एकत्र राहण्याचा अधिकारः हाय कोर्टाचा निर्णय

0
504
प्रातिनिधिक छायाचित्र.

चंदीगडः एखाद्या तरूणाचे लग्नाचे वय झालेले नसेल, परंतु तो कायद्याने सज्ञान असेल तर त्याला सज्ञान जोदीडारासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा अधिकार आहे, असा महत्वाचा निकाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. प्रौढ जोडप्याला एकत्र राहण्याचा अधिकार आहे. फक्त लग्नायोग्य वय झाले नाही म्हणून तो अधिकार नाकारता येणार नाही, असे न्या. अल्का सरीन यांनी दिलेल्या निकालात म्हटले आहे.

भारतात मुलाचे लग्नाचे वय २१ वर्षे आणि मुलीचे लग्नाचे वय १८ वर्षे आहे. मात्र कायदेशीर तरतुदींनुसार मुलगा आणि मुलगी वयाच्या १८ वर्षी सज्ञान ठरतात. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे १८ वर्षांवरील म्हणजेच सज्ञान व्यक्तींना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा अधिकार मिळाला आहे.

कायद्याच्या चौकटीत राहून सज्ञान जोडप्याला मनाप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. एखादी व्यक्ती त्याने किंवा तिने कसे जगावे हे ठरवू शकत नाही. भारतीय संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य हा जगण्याच्या मूलभूत अधिकाराचा महत्वाचा भाग आहे, असे न्या. अल्का सरीन यांनी निकालपत्रात म्हटले आहे.

१९ वर्षीय तरूणी आणि २० वर्षीयचे प्रेम संबंध आहेत. त्या दोघांनाही एकत्र रहायचे आणि लग्न करायचे आहे. परंतु या नात्याला तरूणीच्या घरच्यांचा विरोध होता. यावरून तरूणीच्या घरच्यांनी तिला अनेकदा मारहाणही केली. दोघांचे नाते समजल्यावर तरूणीच्या घरच्यांनी तिला कोंडून ठेवले होते. परंतु २० डिसेंबर रोजी या तरूणाने घरातून धूम ठोकली आणि ती या तरूणासोबत रहायला गेली. या जोडप्याने सुरक्षा पुरवण्याची मागणी करणारी याचिका पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

या प्रकरणातील तरूणी सज्ञान आहे. त्यामुळे तिने कोणासोबत जीवन घालवावे हे ठरवण्याचा अधिकार तिच्या पालकांना  नाही. पालकांना आपल्या मुलांवर अटी लादण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने फतेहगड साहिबच्या पोलिस अधीक्षकांना या जोडप्याला सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. तरूणीला तिचा निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार असून स्वतःच्या जीवनासाठी काय चांगले आणि काय नाही, हे ठरवण्यास तरूणी सक्षम आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा