पोलिस भरतीची जाहिरात आठ दिवसांत काढणारः गृहमंत्री देशमुखांची घोषणा

0
242
संग्रहित छायाचित्र.

नागपूरः राज्याच्या पोलिस दलात तब्बल १२ हजार ५३८ पदांची जम्बो भरती करण्यात येणार असून या पोलिस भरतीची जाहिरात येत्या आठ दिवसांत काढण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. पोलिस भरती लवकर करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांच्या शिष्टमंडळांशी चर्चा करताना देशमुख यांनी हे आश्वासन दिले आहे.

पोलिस भरतीच्या पहिल्या टप्प्यात ५ हजार २९७ पदांची भरती करण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला की लगेच दुसऱ्या टप्प्यातील पोलिस भरती करण्यात येईल, असेही देशमुख म्हणाले. त्यानंतर देशमुख यांनी माध्यमांशीही संवाद साधला. पोलिस भरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाला देण्यात आले आहेत. १२ हजार ५३८ जागांची भरती पूर्ण झाल्यानंतर गरज पडल्यास आणखी ५ हजार पदेही भरण्याबाबत विचार केला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.

गृह विभागाने २०१९ मध्येच नोकरभरतीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र ९ सप्टेंबर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे पोलिस भरतीची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. २०१९ च्या पोलिस भरतीत एसईबीसी प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात गृहित धरण्याचा शासनादेश ४ जानेवारी २०२१ रोजी गृह विभागाने जारी केला होता. मात्र तो तीनच दिवसांत रद्द करून मराठा समाजाच्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षण देणारा नवा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा