बेंगळुरूः गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या आगळीकीनंतर भारताने देशात लोकप्रिय असलेल्या चीनी अॅप्सवर बंदी घालण्याची कुटनिती अवलंबली असून आणखी २५७ चीनी अॅप्सची यादी तयार केली आहे. हे चीनी राष्ट्रीय सुरक्षा आणि यूजर प्रायव्हेसीचे उल्लंघन करतात का याची पडताळणी करण्यात येणार असून भारतात पब्जीसह अनेक चीनी अॅप्सवर भारतात बंदी घातली जाणार आहे.
भारत-चीन सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मागच्या महिन्यात भारताने टिकटॉक या भारतात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या अॅपसह ५७ चीनी अॅप्सवर बंदी घातली होती. त्यात हेलो अॅप्सचाही समावेश आहे. आता भारताने नव्याने तयार केलेल्या २५७ अॅप्सच्या यादीत चीनच्या प्रसिद्ध टेनसेन्ट इंटरनेट कंपनीचे PubG (पब्जी), शाओमी मोबाइल फोननिर्मिती कंपनीचे Zili (झिली), अलिबाबा या ई कॉमर्स कंपनीचे AliExpress (अलिएक्सप्रेस) आणि टिकटॉकची मालक कंपनी बाइटडान्सचे Resso (रेसो), Ulike (यू लाइक) या अॅप्सचा या यादीत समावेश आहे.
भारतामध्ये पब्जी या व्हिडीओ गेमिंग अॅपची सर्वात मोठी बाजारपेठ असून १७५ दशलक्ष लोकांनी पब्जी हे अॅप डाऊनलोड केले आहे. भारतात डाऊनलोड करण्यात आलेल्या एकूण अॅप्सच्या तुलनेत पब्जी डाऊनलोडिंगचे हे प्रमाण तब्बल २४ टक्के आहे. पब्जी हा ऑनलाइन मल्टिप्लेअर बॅटल रोयले गेम असून तो विविध प्लॅटफार्मवर उपलब्ध आहे. आयरिश व्हिडीओ गेम डिझायनर ब्रेन्डन ग्रीने यांनी डिझाइन केलेल्या मॉड्स या अॅपपासून प्रेरणा घेऊन पब्जी तयार करण्यात आले आहे.
भारताने यादीत समाविष्ट केलेल्या २५७ अॅप्सपैकी काही अॅप्स सुरक्षा कारणास्तव रेडफ्लॅग करण्यात आलेले आहेत तर काही अॅप्स डाटा शेअरिंग आणि यूजर प्रायव्हेसीचे उल्लंघन करत असल्याचे भारताचे म्हणणे आहे. हे अॅप्स भारतातून चीनला डाटा पाठवत असल्यामुळे भारताच्या सार्वभौमत्व आणि एकतेलाही धोका निर्माण होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. चीनी इंटनेट कंपन्यांचे भारतात ३०० दशलक्षहून अधिक यूजर आहेत.