कृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालये आजपासून सुरू, ‘लसवंत’ विद्यार्थ्यांचीच प्रत्यक्ष उपस्थिती

0
13
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित शासकीय व खासगी विनाअनुदानीत विद्यालये व महाविद्यालयातील नियमित वर्ग २० ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. त्यानुसार आजपासून राज्यातील कृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांचे परिसर पुन्हा गजबजू लागले आहेत.

राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील इयत्ता १२ वी पर्यंतचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आलेले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी हे १८ वर्षावरील असून बहुतेक विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. याचबरोबर राज्यातील कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली असून सद्यस्थितीत ही साथ नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे.

चला उद्योजक बनाः सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १ कोटीपर्यंत प्रोत्साहन योजना, वाचा सविस्तर माहिती

त्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १३ ऑक्टोबर रोजीच्या परिपत्रकान्वये सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यीत विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयामधील नियमित वर्ग दिनांक २० ऑक्टोबर, २०२१ पासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यास अनुसरुन कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न विद्यालये आणि महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

विद्यालये अथवा महाविद्यालय, विद्यापीठात येताना सर्व १८ वर्षावरील विद्यार्थ्यांनी लसीचे दोन डोस घेतलेले असावेत. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही, त्यांचेसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी. ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने वर्ग सुरू करण्याविषयी स्थानिक प्रशासनाशी विचारविनिमय करून कृषी विद्यापीठांनी निर्णय घ्यावा, त्यानुसार महाविद्यालयांना सविस्तर मार्गदर्शक सूचना/ मानक कार्यप्रणाली (एसओपी) द्यावी, वसतिगृहे टप्याटण्याने सुरु करावेत, ज्या विद्यार्थ्यांनी कोविड-१९ ची लस घेतलेली नाही, त्यांच्याकरिता स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी. तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, अशा सूचना कृषीमंत्री भुसे यांनी दिल्या.

कोविड-१९ च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश, कामांच्या ठिकाणाबाबतचे अतिरिक्त निर्देश, राज्य शासनाने वेळोवेळी काढलेली मार्गदर्शक तत्वे किंवा मानक कार्यप्रणाली सर्व कृषी विद्यापीठ, विद्यालये व महाविद्यालयांना लागू असल्यामुळे कृषी विद्यापीठ, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनी कोरोना संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने सर्व शासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही कृषीमंत्री भुसे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा