एमआयएमच्या औरंगाबाद- मुंबई तिरंगा रॅलीवरून वाद, अहमदनगर सीमेवर पोलिसांशी खडाजंगी

0
347
छायाचित्र सौजन्यः ट्विटर.

औरंगाबाद/ अहमदनगरः मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीचे संरक्षण व्हावे यासह अन्य मागण्यासाठी एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात काढणयात आलेल्या औरंगाबाद- मुंबई तिरंगा रॅलीवरून वाद निर्माण झाला आहे. या रॅलीला परवानगी नसल्याचे सांगत अहमदनगर सीमेवर पोलिसांनी ही रॅली अडवण्यात आली होती. अहमदनगर पोलिसांनी ही रॅली अडवल्यानंतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडत आंदोलन केले. कुणालाही त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही आमचे एक मिशन घेऊन मुंबईच्या दिशेने चाललो आहोत. रॅलीसाठी आम्ही पोलिसांची परवानगी घेतली होती, असे खा. जलील यांनी म्हटले आहे.

खा. जलील यांच्या नेतृत्वात आज ही तिरंगा रॅली औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. मुंबई पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकारल्यामुळे खा. जलील यांच्यासह एमआयएमचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. मुंबईला येताना गाड्यांना तिरंगा झेंडा लावू नका, असे आदेश पोलिसांनी एमआयएमच्या कार्यकर्त्यांना दिला. पोलिसांच्या या आदेशावर खा. जलील चांगलेच भडकले. महाराष्ट्रातील मुसलमान हातात तिरंगा घेऊ शकत नाही का? असा सवालही जलील यांनी ही रॅली रवाना होण्यापूर्वी औरंगाबादेत केला.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

मुस्लीम आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न आणि वक्फ बोर्डाच्या जमिनींचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी एमआयएमचे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वात आज मुंबईत सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी आज सकाळीच औरंगाबादहून खा. जलील यांच्या नेतृत्वात औरंगाबादहून तिरंगा रॅली मुंबईच्या दिशेने रवाना झाली. दुपारपर्यंत ही तिरंगा रॅली मुंबईच्या वेशीवर धडकेल. मात्र मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच मुंबईत कोणताही मोर्चा किंवा सभा घेता येणार नाही, असा आदेश काढला आहे.

ही रॅली औरंगाबाद- अहमदनगरच्या सीमेवर धडकल्यानंतर पोलिसांनी रॅली अडवली. तेव्हा खा. जलील आणि पोलिसांत वाद झाला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रस्त्यावर गोंधळ घातला. त्यामुळे काहीवेळ रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. राज्य सरकारकडून आमची रॅली रोखण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात आहे. रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांना अडचण येणार नाही, अशा पद्धतीने रॅलीला पुढे जाण्याची परवानगी पोलिसांनी दिली आहे, असे जलील यांनी सांगितले. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, अशा पद्धतीने नियमांचे पालन करण्याच्या अटीवर काही गाड्यांना मुंबईच्या दिशेने जाण्याची परवानगी दिली असल्याचे अहमदनगर पोलिसांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

आता गप्प का?: राज्यात ज्यावेळी शिवसेना- भाजपचे सरकार होते, त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुस्लीम आरक्षणासाठी भांडत होते. मात्र आता तेच सत्तेत आहेत. गेली अडीच वर्षे त्यांनी मुस्लीम आरक्षणावर एक चकार शब्दही काढला नाही. आता तुम्ही गप्प का? मुस्लीम समाज आणि आरक्षणाचा एवढा कळवळा होता तर मग आता मुस्लीम समाजाला आरक्षण का देत नाही, हे मला त्यांना विचारायचे आहे, असा सवाल खा. जलील यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा