औरंगाबादः लॉकडाऊनमुळे बंद केलेली मंदिरे- मशीद उघडण्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची हाक दिलेल्या एमआयएमविरोधात शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेतल्यामुळे औरंगाबादेत निर्माण झालेली तणावाची परिस्थिती एमआयएमने या आंदोलनातून माघार घेतल्यामुळे निवळली आहे. मात्र उद्या आम्ही मशीद उघडण्यासाठी आंदोलन करणार आहोत, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
सरकारने मंदिर- मशीद उघडावीत अन्यथा आम्ही १ सप्टेंबर रोजी आंदोलन करून प्रार्थनास्थळे उघडू, असा इशारा खा. जलील यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. त्यानुसार आज खा. जलील मंदिर उघडण्याच्या मागणीचे निवेदन खडकेश्वर मंदिराच्या पुजाऱ्याला देण्यासाठी जाणार होते. मात्र शिवसेनेनेही या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत एमआयएमच्या मागणीला विरोध केला.
मंदिर आणि मशीद कुणाचीही खासगी प्रॉपर्टी नाही, राज्य सरकार निर्देश देईल तेव्हाच आम्ही मंदिरे उघडू अशी भूमिका घेत शिवसेना आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी खडकेश्वर मंदिराकडे कुच केली. ऐन गणपती विसर्जनाच्या दिवशी शिवसेना आणि एमआयएम आमने-सामने उभे ठाकल्यामुळे काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
खडकेश्वर मंदिर परिसरात शिवसैनिक गोळा झाल्यामुळे राडा होऊ नये म्हणून पोलिसांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी जाऊन त्यांना आजचे आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण येऊ नये म्हणून आम्ही आजचे आंदोलन स्थगित केले. मात्र उद्या मशिदीत जाऊन आंदोलन करणार आहोत. ते आंदोलन आम्ही स्थगित केलेले नाही, असे खा. जलील यांनी सांगितले.