घाबरू नका, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना गंभीर धोका असल्याचे पुरावे नाहीत!

0
186
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः देशातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. ही तिसरी लाट मुलांसाठी घातक ठरणार असल्याचे अंदाजही वर्तवले जात आहेत. अशातच एक चांगली बातमी आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांवर गंभीर परिणाम होतील, असे कोणतेही संकेत नाहीत, असे केंद्र सरकारच्या वतीने आज सांगण्यात आले.

 देशातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची बैठक झाली. या बैठकीत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत फार कमी प्रमाणात मुलांना संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक संसर्ग होईल, असे वाटत नाही. तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये सर्वाधिक संसर्ग दिसून येईल, असे सांगण्यात येत आहे. परंतु हे तथ्यांवर आधारित नसल्याचे पेडियाट्रिक्स असोसिएशनचे म्हणणे आहे. संसर्गाचा गंभीर परिणाम मुलांवर होणार नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे डॉ. गुलेरिया म्हणाले.

 आम्ही जर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा डेटा बघितला तर हा डेटा खूपच मिळता जुळता आहे आणि मुले सुरक्षित आहेत, त्यांना संसर्ग झाला तरी तो सौम्य राहतो, असेच हा डेटा दर्शवतो. विषाणू तोच आहे. तो बदललेला नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त प्रमाणात संसर्ग होईल, असे कोणतेही संकेत नाहीत, असे गुलेरिया म्हणाले.

 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोणत्या वयाच्या लोकांचे जास्त प्रमाणात मृत्यू होत आहेत, याबाबतही डॉ. गुलेरिया यांनी माहिती दिली. आपण आपल्या रूग्णालयांत नियमितपणे मृत्यूचे ऑडिट करतो. मागील एक-दीड महिन्यांत जे मृत्यू झाले, त्याचे आम्ही ऑडिट केले आणि पहिल्या व दुसऱ्या  लाटेत जे मृत्यू झाले, त्यात काय फरक आहे, याची तुलना केली. वयोगट आणि सहव्याधींच्या दृष्टीने पाहता दोन्ही लाटेत मृत्यू सारखेच आहेत. म्हणजेच या लाटेतही जे मृत्यू झाले आहेत, ते जास्त वयोमानाच्या व्यक्तीचेच झाले आहेत. पहिली लाट आणि दुसरी लाट यात फारसा फरक नाही, असेही डॉ. गुलेरिया म्हणाले.

 पुढची लाटच येऊ नये, अशी तयारी हवीः या पुढची लाटच येऊ नये, याची तयारी करायला हवी, असे माझे मत आहे. मागील दोन लाटांपासून आपण जे शिकलो आहोत, तेच पुढे घेऊन गेलो तर आपण पुढची लाट येऊ देणार नाही आणि आलीच तर ती जास्त फैलावू देणार नाही, असे डॉ. गुलेरिया म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा