हापकिडो बॉक्सिंगला ऑलिम्पिकमध्ये नेणे हेच ध्येयः ऍड. राज वागदकर

0
72
  • विशेष मुलाखत/प्रभाकर ढगे, गोवा

२२-२३ जानेवारी २०२२ रोजी पाँडिचेरी येथे होत असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील  हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेला महाराष्ट्रासह एकूण १० राज्यातील संघ उपस्थित राहात आहेत. हापकिडो बॉक्सिंग या खेळाला राज्यात व देशात रूजवून त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्याचे निर्विवाद श्रेय ऍड. राज वागदकर यांच्याकडे जाते. आशियाई हापकिडो बॉक्सिंग फेडरेशनच्या सचिवपदाची जबाबदारी तेवढ्याच समर्थपणे पार पाडत असलेल्या अॅड. राज वागदकर यांची त्यानिमित्त घेतलेली ही विशेष मुलाखत…

  • हापकिडो बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवावे असे का वाटले? या खेळाविषयी सविस्तर माहिती सांगा?

आयुष्य म्हणजे संघर्ष असतो. माझे आयुष्य म्हणजे मी निवडलेला संघर्ष होता. त्याचे मला कधी फार वाटले नाही. कारण मैदान असो वा आयुष्य संघर्ष नसेल तर ते कंटाळवाणे होते. त्याकाळातले जॅकी चॅन, ब्रूस लीसारख्या महान व्यक्तींचे कराटेचे चित्रपट पाहून मला कराटेचे वेड लागले. हापकिडो बॉक्सिंग हा साऊथ कोरियाचा पारंपरिक खेळ असून यामध्ये शरीरयष्टी व उंची किंवा विशिष्ट कौशल्य असल्या कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही. एक मुख्य गोष्ट म्हणजे कोणताही खेळ खेळण्यासाठी शरीर लवचिक राहणे व सातत्याने सराव करणे गरजेचे असते पण हापकिडो बॉक्सिंग या खेळामध्ये सतत सरावाची गरज नसते. जॉईंट लॉक व वाईटल पॉईंट याचा सर्व अभ्यास  झाल्यानंतर याचाच दैनंदिन जीवनामध्ये आपण उपयोग करू शकतो. जसे पोहोण्याची कला शिकल्यानंतर आयुष्यभर आपल्या अंगात असते. त्याचप्रमाणे हापकिडो बॉक्सिंग हे क्षेत्र आहे. दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाला दररोज सराव करण्यासाठी वेळ मिळत नसतो. त्यासाठी हापकिडो बॉक्सिंग हे उत्तम खेळ माध्यम आहे.

  • हापकिडो बॉक्सिंगची राज्य, राष्ट्रीय तथा आशियाई पातळीवर संघटनात्मक बांधणी करण्यामागचा उद्देश काय? आजपर्यंत हा उद्देश कितपत साध्य झाला?

हापकिडो बॉक्सिंग हा आधुनिक खेळ आहे. प्रत्येक खेळाडूंचे कुठलाही खेळ खेळतेवेळेस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे ध्येय असते. कोणताही खेळ ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट होण्यासाठी ऑलिम्पिक कमिटीचे काही नियम व अटी असतात. जसे की, संपूर्ण जगभरामध्ये १९५ देश आहेत. त्यापैकी किमान ५० टक्के देशामध्ये हा खेळ विकसित व संघटनात्मक असणे बंधनकारक आहे. हापकिडो बॉक्सिंग खेळाचे ध्येय हे २०३२ मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ३५ व्या आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समावेश होण्याच्या अनुषंगाने हापकिडो बॉक्सिंग आतंरराष्ट्रीय संघटना सर्वोतपरी प्रयत्नशील आहे. यासाठी प्रत्येक खंडात जसे आशिया, आफ्रिका, अमेरिका, पॅन अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडांचा विकास करण्यासाठी त्या त्या खंडात संघटना स्थापन करण्यात आल्या आणि आशिया खंडाचे नेतृत्व माझ्याकडे आहे. त्या अनुषंगाने आशिया खंडातील ४७ देशांपैकी २३ देशामध्ये राष्ट्रीय संघटनांची स्थापना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण आशियामध्ये हा खेळ वाढवा यासाठी आशियाई संघटना प्रयत्नशील आहे.  भारतामध्ये गेल्या १० वर्षात हापकिडो बॉक्सिंचा प्रसार व प्रचार करण्यात आला आहे. एकूण १७ राज्यांच्या सक्रिय संघटना स्थापन करून १० राष्ट्रीय स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या आहेत. त्या त्या राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त करून घेतल्या आहेत.

हेही वाचाः ‘साहेबां’च्या भाच्यासाठी आकृतीबंध व निकषाचाही ‘भूगोल’ पायदळी; प्रा. सूर्यवंशींना अवैध सेवासातत्य

  • हापकिडो बॉक्सिंगची संघटना उभी करताना काय अडचणी आल्या व त्यावर कशी मात केली?

हापकिडो बॉक्सिंग राष्ट्रीय संघटना उभी करताना अडचणी खूप होत्या. मी जेव्हा दक्षिण कोरियामधून हापकिडो बॉक्सिंग या खेळाची उत्तीर्ण पदविका घेऊन आलो आणि निश्चय केला की, हापकिडो बॉक्सिंग या खेळाचा संपूर्ण भारतभर प्रसार करायचा आणि हापकिडो बॉक्सिंग हा खेळाडूंच्या मनी उतरवायचा. कोणतेही कार्य करण्यासाठी आणि ते कार्य यशस्वी होण्यासाठी संघटनांची नितांत गरज असते. ते लक्षात घेऊन २०१२ मध्ये हापकिडो बॉक्सिंग संघटना राष्ट्रीय पातळीवर निर्माण केली. या संघटनेचे प्रथम अध्यक्ष महेंद्र जगताप हे होते. हापकिडो बॉक्सिंग संस्था निर्माण केल्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे या संस्थेची आर्थिक बाजू असते. तीच कमकुवत होती. त्यावेळी आम्ही सर्व सदस्यांनी एकत्र येऊन यावर तोडगा काढला. या मध्ये मी स्वतः, जगताप सर, खेडेकर सर, आल्हाट सर या सर्वांनी मिळून आर्थिक बाजू मजबूत केली आणि खेळाला सर्व भारतभर ओळख निर्माण करून दिली.

हेही वाचाः कामकाजाचे तास घटवले, मुंबई हायकोर्टाच्या एसओपीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

आजच्या घडीला हापकिडो बॉक्सिंग नॅशनल फेडरेशन या राष्ट्रीय संघटनेशी एकूण १७ राज्य सदस्य म्हणून संलग्न आहेत. संघटना स्थापन करणे व विकसित करणे यासाठी संघटनात्मक कार्य व विश्वास निर्माण करणे हे कठीण आहे. शिवाय संघटना चालवता वेळेस सर्वांना सामावून घेणे आणि प्रत्येक राज्यानुसार, प्रत्येक व्यक्तीनुसार संघटना चालवणे हे देखील कठीण काम असते. संघटना चालवण्यासाठी नियम निर्माण करणे आणि या नियमानुसार कार्य करणे ही तारेवरची कसरत आहे. असे असले तरी या १० वर्षांच्या कालावधीत सर्वांचा विश्वास संपादन करून हापकिडो बॉक्सिंग या खेळाला न्याय व प्रसिद्धी देण्याचे कार्य यथाशक्ति केले आहे.

  • राष्ट्रीय तथा आशियाई पातळीवर हापकिडो बॉक्सिंगची सध्या क्रीडा प्रकार म्हणून काय स्थिती आहे? शैक्षणिक व शासकीय पातळीवर हा खेळ स्वीकारला जातो का?

हापकिडो बॉक्सिंगचा जसा भारतभरात प्रसार झाला आहे, त्याचप्रमाणे आशियामध्ये देखील सदस्य देश वाढत आहेत. भारत, पाकिस्तान, भूतान, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका, थायलंड, जपान, कोरिया अशा अनेक देशामध्ये सदस्य आहेत. त्यांच्या देशात देखील हापकिडो बॉक्सिंग हा खेळ आवडीने खेळला जातो. शैक्षणिक व शासकीय पातळीवर विचार करायचा म्हटले तर भारतामध्ये सर्वात आधी महाराष्ट्र शासनाने हापकिडो बॉक्सिंग या खेळाला शालेय क्रीडांमध्ये समावेश करून हापकिडो बॉक्सिंगला एक नवीन दिशा दिली. लवकरच हापकिडो बॉक्सिंगचा २०२२ या चालू वर्षात भारतीय शालेय क्रीडा प्रकारात समावेश झालेला असेल. भारतीय शालेय खेळ क्रीडा विभागाची (एसजीएफआय) मान्यता प्राप्त करून दिल्यानंतर देशातील हापकिडो बॉक्सिंगच्या खेळाडूंना याचा निश्चित फायदा होईल, याची आम्हाला जाणीव आहे.

हापकिडो बॉक्सिंग हा दक्षिण कोरियाच्या पारंपरिक खेळ प्रकारामधून विकसित झालेला आहे. तसेच जपान, चीन, भारत या देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी या खेळाला लाभलेली आहे. जगातील बऱ्याच देशांनी आज या खेळाला स्वीकारले आहे आणि ही स्वीकारार्हता वेगाने वाढत आहे. या सर्वच देशांमध्ये हापकिडो बॉक्सिंगला शासकीय खेळामध्ये समावेश करून घेण्याचा मानस आहे.

  • आपण तयार केलेल्या खेळाडूंची कामगिरी आणि या खेळाला मिळत असलेली समाज व सरकारची मान्यता याविषयी काय सांगाल?

आम्ही तयार केलेले खेळाडू हे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील प्रो स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि देशाला पदक मिळवून देशाची मन उंचावतात. याचा आम्हाला गर्व आहे. येत्या फेब्रुवारी २०२२ मध्ये हापकिडो बॉक्सिंग प्रो आंतरराष्ट्रीय स्पर्धा थायलंडमध्ये पार पडणार आहेत. या स्पर्धेमध्ये देखील भारताकडून एकूण १५ स्पर्धक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की, यामध्ये देखील आम्ही घडवलेले विद्यार्थी भारताचा तिरंगा ध्वज आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकावतील. या खेळाला समाजामध्ये एक विशेष गुण संपन्न असलेला खेळ अशी ओळख आहे. सरकार विषयी बोलायचं झालं तर महाराष्ट्र शासनाने आमच्या खेळाला मान्यता देऊन सर्व प्रथम गौरव केला आहे. या वर्षी २०२२ मध्ये भारत सरकार चे शालेय विभाग स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया  (एसजीएफआय) हापकिडो बॉक्सिंगला देशपातळीवर मान्यता देईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

  • जगातील सर्वात मोठा क्रीडा उत्सव म्हणजे ऑलिम्पिक होय. हापकिडो बॉक्सिंग या खेळाला ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करायला मिळावे यासाठी आपण काय प्रयत्न करीत आहात?

ऑलिम्पिकबद्दल बोलायला गेले तर जगभरामध्ये १९५ देश आहेत त्यापैकी किमान ५० टक्के देशामध्ये हा खेळ विकसित व संघटनात्मक असणे बंधनकारक आहे. हापकिडो बॉक्सिंग खेळाचे ध्येय हे २०३२ मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ३५ व्या आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समाविष्ट होण्याच्या अनुषंगाने हापकिडो बॉक्सिंग आतंरराष्ट्रीय ऑर्गनायझेशन सर्वोतपरी प्रयत्नशील आहे. आमचे त्या दिशेने सतत प्रयत्न चालू आहेत. हापकिडो बॉक्सिंग हा खेळ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पात्र होण्यासाठी जे निकष आहेत, त्या निकषावर पूर्णतः पात्र  ठरत आहे. स्पर्धा आयोजित करण्यासाठी ऑलिम्पिकच्या ज्या अटी आहेत, त्या अटीनुसार हापकिडो बॉक्सिंग या खेळाची बांधणी करण्यात आली आहे. खेळाडूंसाठी हा खेळ पूर्णतः सुरक्षित खेळ आहे. कारण खेळाडूंना कुठल्याही जखमा होणार नाहीत. खेळाडूंना संरक्षक साधने घालूनच स्पर्धेमध्ये सहभाग दिला जातो. हापकिडो बॉक्सिंग या खेळाला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकची मान्यता मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर हापकिडो बॉक्सिंग इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन (एचबीआयओ) तर देश पातळीवर हापकिडो बॉक्सिंग नॅशनल फेडरेशन (एचबीएनएफ) प्रयत्न करीत आहेत. आम्हाला विश्वास आहे की, ऑलिम्पिकची मान्यता मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

  • भारतासारख्या १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाची ऑलिम्पिकमध्ये  बहुतेक क्रीडा प्रकारात नेहमीच लाजीरवाणी कामगिरी असते. याची काय कारणे असावीत, असे आपल्याला वाटते?

ऑलिम्पिक खेळामध्ये सहभाग घेण्यासाठी निवड चाचणी ही राष्ट्रीय संघटना मार्फत घेतली जाते. या निवडीसाठी बरेचसे खेळाडू पात्र असूनही निवड चाचणीला जात नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे खेळाडूंना खेळवणाऱ्या तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, क्लबस्तरीय स्पर्धा या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न नसतात. त्यामुळे ६० टक्के विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक निवड चाचणीच माहीत नसते. शिवाय बोगस क्लबमध्ये प्रशिक्षण घेत असल्याकारणाने त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. यासाठी प्रत्येक खेळाडूंनी राष्ट्रीय संघटनांशी संलग्नता असलेल्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घ्यावे. ऑलिम्पिक मान्यता प्राप्त खेळ आहेत. अशाच खेळांचे प्रशिक्षण घ्यावे व त्यांच्यातील कौशल्यानुसार खेळ निवडावे व योग्य दिशेने सराव करावा. असे केले तर काही वर्षानंतर भारताचे ऑलिम्पिक पदक गुणवत्तेमध्ये वेगळे चित्र असेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा