काकांनाच अंधारात ठेवून पुतण्याने साधला डाव: उपमुख्यमंत्रिपद धनंजय मुंडेंना मिळणार होते म्हणूनच केली अजित पवारांनी फंदफितुरी

0
1885

कौशल दीपांकर/ मुंबई

पडझड झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत एकहाती महाराष्ट्र पिंजून काढत नवी संजीवनी दिल्यानंतर शरद पवार पक्षाला व्यापक स्वरुप देऊ इच्छित होते. त्याच योजनेचा भाग म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्रिपदाची माळ परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गळ्यात पडणार होती. नव्या सरकारमध्ये आपणाला मानाचे पद मिळत नाही, असे दिसताच अस्वस्थ झालेल्या ‘पुतणे’ अजित पवारांनी ‘काका’ शरद पवारांशीच फितुरी करून भाजपशी हातमिळवणी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

विधानसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास 30 आमदार-नेते भाजपमध्ये गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भवितव्याचाच प्रश्न निर्माण झालेला पाहून शरद पवारांनी एकहाती महाराष्ट्र पिंजून काढला आणि पक्षाला मेगागळती लागूनही निवडणुकीत 54 आमदार निवडून आणले. त्यानंतर पक्षाला व्यापक स्वरूप देत बहुजन तोंडवळा देण्याचा शरद पवारांचा प्रयत्न होता. त्यामुळेच मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेली शिवसेना भाजपपासून वेगळी झाल्यानंतर शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचेही मन वळवण्यात यश मिळवले होते. सगळे काही जुळून आणून नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीचा ‘बहुजन चेहरा’ परळीचे आमदार धनंजय मुंडे यांना उपमुख्यमंत्रिपदी बसवले जाणार होते. हे कळल्यापासूनच अजित पवार प्रचंड अस्वस्थ होते, असे सूत्रांनी सांगितले.

 नवे सरकार स्थापन करण्याच्या मोहिमेत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची संयुक्त बैठक रद्द झाली आणि आपण बारामतीला निघालो, असे अजित पवारांनी एकतर्फीच जाहीर करून खळबळ उडवून दिली होती. 13 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या प्रकारावर शरद पवारांनी यशस्वीपणे पडदा टाकून पुढील सूत्रे हालवली होती. पण उपमुख्यमंत्रिपद मिळत नसल्याची खदखद अजित पवारांना सारखी अस्वस्थ करत होती. शुक्रवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांची पहिली बैठक होत होती, तेव्हा अजित पवार कुठेही दिसले नव्हते. इकडे हे तीन पक्ष सरकार स्थापण्याची तयारी करत असतानाच अजित पवारांनी पडद्याआडून भाजपशी संधान साधले. शिवसेनेला देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे तयार असलेले पत्र विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून अजित पवारांकडेच होते. तेच पत्र अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत राज्यपालांकडे जाऊन भाजपच्या पाठिंब्यासाठी वापरले. पुतण्याच्या या फितुरीची काकांना कानोकान खबरही लागली नाही. त्यामुळेच आज नवी महाविकास आघाडी दुपारनंतर सरकार स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत असतानाच भल्या पहाटे देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन त्यांनी शपथविधीही उरकून घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे 22 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा सध्या अजित पवार करत असले तरी भाजपला आमचा पाठिंबा नसल्याचे राष्ट्रवादीच्या सर्व 54 आमदारांचे पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात शरद पवार यशस्वी होतात का, यावरच देवेंद्र फडणवीस सरकार आणि नव्या महाविकास आघाडीच्या सरकारचे भवितव्य ठरणार आहे.

काँग्रेसचे पाच सवाल

दरम्यान, या सर्वघडामोडींवर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी काही सवाल उभे केले आहेत. भाजपने देशाच्या लोकशाहीची सुपारी घेतली आहे. राज्यपाल पुन्हा एकदा अमित शाह यांचे ‘हिटमॅन’ सिद्ध झाले आहेत, शी टीका करतानाच राष्ट्रपती राजवट कधी उठली? रातोरात दावा कधी सादर केला? आमदारांची यादी कधी दिली? राज्यपालांसमोर आमदारांना कधी सादर करण्यात आले? चोरांसारखी शपथ का घेतली? असे सवाल सुरजेवाला यांनी ट्विट करून केले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा