परमबीर सिंगांवरही लेटरबॉम्ब, पोलिस निरीक्षकाने केले कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

0
1375
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून हटवल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप लावत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेटरबॉम्ब पाठवून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे महाराष्ट्र होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंग यांच्यावरच आता भ्रष्टाचाराचा लेटरबॉम्ब धडकला आहे. अकोला पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक बी.आर. घाडगे यांनी हा लेटरबॉम्ब टाकला असून त्यात परमबीर सिंग यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे परमबीर सिंग चांगलेच गोत्यात येण्याची शक्यता आहे.

घाडगे यांनी २० एप्रिल रोजी पोलिस महासंचालकांना १४ पानी लेटरबॉम्ब पाठवला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी परमबीर सिंग यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी घाडगे यांनी केली आहे. या पत्राच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

२०१५ ते २०१८ या काळात परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलिस आयुक्त होते. या काळात परमबीर सिंग यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असून या भ्रष्टाचाराचे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावा घाडगे यांनी या पत्रात केला आहे. परमबीर सिंग यांनी भूखंडांचे गैरव्यवहार, सरकारी निवासस्थान आणि सुरक्षा रक्षकांचा गैरवापर तर केलाच शिवाय अन्य मार्गांनी भ्रष्टाचार केल्याचेही घाडगे यांनी या पत्रात नमूद केले आहे.

भ्रष्टाचार प्रकरणी परमबीर सिंग यांच्याविरोधात एफआयआर नोंदवावा, अशी मागणी करतानाच घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या भ्रष्टाचाराचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. जेव्हा जबाब नोंदवण्यासाठी मला बोलावले जाईल, तेव्हा मी ते पुरावे सादर करीन, असे घाडगे यांनी या पत्रात म्हटले आहे. परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना घाडगे हे कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक होते. परमबीर सिंग यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराची ही दुसरी तक्रार आहे. याआधी मुंबई पोलिस दलातील अधिकारी अनुप डांगे यांनीही परमबीर सिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार केली होती.

भ्रष्टाचारातून कमावलेले पैसे गुंतवले पत्नी-मुलांच्या व्यवसायात?: परमबीर सिंग यांच्या पत्नी सविता या कॉर्पोरेट प्लेअर आहेत. इंडिया बुल्स समूहाच्या दोन कंपन्यांसह त्या अर्ध्या डझनाहून अधिक कंपन्यांच्या संचालक असून त्यांचा मुलगा रोहन सिंगापूरमध्ये व्यवसाय चालवतो. या माध्यमातून सिंग यांनी भ्रष्टाचारातून कमावलेले कोट्यवधी रुपये गुंतवल्याचा आरोप घाडगे यांनी या पत्रात केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा