परमबीर सिंगांचे काळे कारनामेः भेट म्हणून घेतली ४० तोळे सोन्याची बिस्किटे, बदल्यांसाठी १ कोटी!

0
2847
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे काळे कारनामे अकोला पोलिस नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक बी.आर. घाडगे यांनी चव्हाट्यावर आणले आहेत. परमबीर सिंग हे पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांसाठी ५० लाख ते १ कोटी रुपये घेतले. दिवाळी भेट म्हणून डीसीपींकडून ते ४० तोळे सोन्याची बिस्किटे स्वीकारचे आणि बिल्डरची सेटलमेंट करण्यासाठी त्यांनी एजंटच नियुक्त केला होता, असे धक्कादायक खुलासे घाडगे यांनी पत्रात केले आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाशेजारी स्फोटकांसह स्कॉर्पिओ कार आढळून आल्यानंतर निष्क्रियतेचा ठपका ठेवून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली होती. बदलीच्या तीन दिवासांनंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुखांवर दहामहा शंभर कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आणि देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे परमबीर सिंग हेही भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असल्याचे घाडगे यांच्या पत्रावरून दिसू लागले आहे. पोलिस महासंचालक, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना लिहिलेल्या १४ पानी पत्रात घाडगे यांनी परमबीर सिंगांच्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचला आहे. या पत्रातील काही ठळक मुद्दे असेः

  • रिव्हॉल्वरचे लायसेन्स देण्यासाठी परमबीर सिंग त्यांच्या एका मित्रामार्फत १० ते १५ लाख रुपये घेत होते.
  • परमबीर सिंग यांनी बदल्यांचे पैसे गोळा करण्यासाठी राजू अय्यर नावाचा एजंट ठेवला होता. पोलिस निरीक्षकांच्या बदल्यासाठी ५० लाख ते १ कोटी रुपये घेतले जायचे.
  • परमबीर सिंग यांनी बेनामी संपत्ती घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी दुसऱ्याच्या नावावर २१ एकर जमीन खरेदी केली आहे.
  • दिवाळी भेट म्हणून परमबीर सिंग यांनी डीसीपींकडून प्रत्येकी ४० तोळे सोन्याची बिस्किटे, सहाय पोलिस निरीक्षकाकडून २० ते ३० तोळे सोन्याची बिस्किटे आणि पोलिस निरीक्षकाकडून ३० ते ४० तोळे सोन्याची बिस्किटे स्वीकारली आहेत.
  • गेल्या वीस वर्षांपासून परमबीर सिंग यांच्यासोबत दोन कॉन्स्टेबल खासगी व्यवहार पाहण्यासाठी आणि भ्रष्टाचाराच्या रकमेची देवाणघेवाण करण्यासाठी आहेत.
  • परमबीर सिंग यांनी भ्रष्टाचारातून मिळवलेले पैसे बिल्डर बोमन इराणी आणि रुतमजी यांच्याकडे गुंतवले आहेत.
  • परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना बिल्डर जितू नवलाणी यांच्याकडे १ हजार कोटींची गुंतवणूक वेगवेगळ्या व्यवसायात केली आहे.
  • परमबीर सिंग यांनी अँटिलिया रोडवर ६३ कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे. परमबीर सिंग यांचा मुलगा रोहन याच्या नावाने सिंगापूर येथे व्यवसाय असून त्यात त्यांनी दोन हजार कोटींची गुंतवणूक केली आहे.
  • परमबीर सिंग यांनी पत्नी सविता यांच्या नावाने खेतान अँड कंपनी उघडली असून या कंपनीत ५ कोटींची गुंतवणूक केली आहे. या कंपनीचे कार्यालय लोअर परेल भागातील इंडिया बुल्स इमारतीत सहाव्या मजल्यावर आहे.

-कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दररोज २५० ते ३०० डंपरवजा ट्रक वाहतू होत होती. त्यात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत होती. अवैध वाळू व्यावसायिकांवर कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्याला अडकवले जात होते. याबाबत मी १७ मार्च २०१६ रोजीच तक्रार दिली आहे.

हेही वाचाः मंत्र्याच्या फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुल्का यांना समन्स, राजकीय नेत्यांच्याही चौकशीची शक्यता

फडणवीस सरकारने ‘गुन्हेगार’ परमबीर सिंगांना वाचवलेः सलील चतुर्वेदी यांना अंमली पदार्थाच्या खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याच्या प्रकरणात परमबीर सिंग आणि केंजळे यांचा थेट सहभाग असल्याचे सिद्ध झाले होते, परंतु परमबीर सिंग हे आयपीएस दर्जाचे अधिकारी असल्याने त्यांना वाचवण्यात आले आणि फक्त पोलिस निरीक्षकाविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले. २०१४ ते २०१९ या काळात भाजपचे सरकार सत्ते होते, तेव्हा परमबीर सिंग यांच्यासारख्या गुन्हेगारास शिक्षा करण्याऐवजी त्यांची ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली, असे घाडगे यांनी पत्रात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा