लखनऊः ६ डिसेंबर १९९२ रोजी आयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी लखनऊतील विशेष सीबीआय न्यायालयाने या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. वादग्रस्त बाबरी मशीद पाडण्याचा कट पूर्वनियोजित नव्हता, असेही विशेष सीबीआय न्यायमूर्ती एस. के. यादव यांनी दिलेल्या निकालात म्हटले आहे.
या खटल्यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह, विनय कटियार, साक्षी महाराज, लल्लू सिंग, बीबी शरण सिंग या आठ भाजप नेत्यांसह ४९ आरोपी होते. त्यातील १७ आरोपींचा मृत्यू झाला आहे. न्यायालयाने आज उर्वरित ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
या खटल्यात सीबीआयने ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्रे न्यायालयात सादर केली होती. प्राचीन राम जन्मभूमीच्या जागेवरच ही मशीद बांधण्यात आल्याचा दावा करत ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी आयोध्यातील ही मशीद पाडली होती. सीबीआयने १९९३ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते.