प्रत्येक शासकीय कार्यालयाने एसटीला मालवाहतूक सेवा देणे बंधनकारक!

0
104

औरंगाबादः प्रत्येक शासकीय कार्यालयाने त्यांनी करत असलेल्या एकूण मालवाहतूक सेवेपैकी २५ टक्के मालवाहतूकीकरीता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या वाहनाचा वापर करावा असा शासन निर्णय असून विभाग नियंत्रकांनी नियोजन करुन एसटीचे उत्पन्न वाढवण्याकरिता प्रयत्न करावे असे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मराठवाडा विभागातील विभाग नियंत्रकांच्या बैठकीत परब हे बोलत होते. बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, औरंगाबाद विभाग नियंत्रक अरुण सिया, वाहतूक महाव्यवस्थापक संजय सुपेकर, बांधकाम महाव्यवस्थापक भूषण देसाई, भांडार महाव्यवस्थापक बा.ल. कदम, सांख्यकीय महाव्यवस्थापक संध्या भांडारवार तसेच मराठवाडा विभागाचे सर्व विभाग नियंत्रकांची उपस्थिती होती.

कोरोनातून आपण बाहेर पडत असून त्यानंतरची रुपरेषा ही प्रत्येक विभाग नियंत्रकांनी आखून त्या प्रमाणे आराखडा तयार करावा. शासनाच्या प्रत्येक कार्यालयाकडे जसे सामाजिक वनीकरण, बालभारती आदी विभागाकडून २५ टक्के मालवाहतूक सेवा एसटीच्या वाहनामार्फत करण्याकरिता प्रयत्न करावे, जेणेकरुन याद्वारे महामंडळाच्या उत्पन्न वाढिकरीता मदत होईल, असे परब म्हणाले.

 डेपो नियंत्रकांनी आपल्या आखत्यारित असणाऱ्या डेपोला वेळोवेळी भेट देऊन अहवाल सादर करुन आपल्या विभागाचा खर्च त्याच विभागाने भागवावा या करिता प्रयत्न करावे. जेणेकरुन  शासनावर अवलंबून रहावे लागणार नाही याची खबरदारी विभाग नियंत्रकांनी घ्यावी. ज्या विभागाचे उत्पन्न चांगले त्यांनाच पगार अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होणार नाही यांची गांभीर्याने दक्षता घ्यावी, असेही परब म्हणाले.

वाहनांच्या डिझेलचा पुर्ण खर्च कसा निघेल याकरिता वाहन चालकांना प्रशिक्षणे द्यावे, भारमान वाढवण्याकरिता प्रयत्न करावे, त्याकरिता बसचे मार्ग निश्चित करावे जेणेकरुन गाड्या रिकाम्या राहणार नाही. समान वेळेस समान ठिकाणी जाणाऱ्या बसच्या संख्या कमी कराव्या, अशा सूचना चन्ने यांनी यावेळी दिल्या.

औरंगाबाद विभाग नियंत्रकांनी औरंगाबाद विभागातील २ कोटी १६ लाख रुपये उत्पन्न  असून ते लवकरच वाढवून २ कोटी ५० लाखांपर्यत नेण्याचे आश्वासित केले. तसेच विभाग निहाय सर्व नियंत्रकांनी बस फेऱ्याबाबत माहिती दिली.

एसटीचे अधिकारी ओळख लपवून करणार बसमधून प्रवासः प्रत्येक अधिकाऱ्यांनी महिन्यातून किमान १५० किलोमीटर प्रवास हा स्वत:ची ओळख न सांगता एसटीतून करावी जेणेकरुन प्रत्यक्ष अडचणी सोडवण्यास मदत होईल, अशा सूचना परब यांनी केली. मालवाहतूक सेवा, वाहनांची दुरुस्ती, केपीटीएल, इंधन बचत, मुक्कामी गाड्या, एसटीच्या फेऱ्या,भारमान वाढवणे आदीबाबत सविस्तर आढावा घेतला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा