ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा होणार

0
57
संग्रहित छायाचित्र.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकदिन हा स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. स्वातंत्र्यदिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयामध्ये “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी  सोमवारी दिली.

या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी गुढी उभारुन त्यास अभिवादन करावे. महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीताचे गायन करुन कार्यक्रम संपन्न करण्यात यावा. यापुढे दरवर्षी ६ जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी होणे अनिवार्य आहे, असे परिपत्रक ग्रामविकास विभागामार्फत जारी करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत. राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे ६ जून १६७४ म्हणजेच शिवराज्यभिषेक दिन . या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता आणि शिवाजी महाराज छत्रपती झाले होते. याच दिवशी श्री शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती करून महाराज शक कर्ते ही झाले.

महाराजांनी तत्कालीन प्रस्थापित सत्तांना पालथे करून स्वत:च्या सार्वभौम स्वराजाचा पवित्र मंगलकलश जनतेला अर्पण करुन रयतेची झोळी सुख समृध्दीने भरली होती. त्यामुळे हा दिवस शिवस्वराज्य दिवस म्हणून साजरा करण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने वरील निर्णय घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा