इयत्ता नववी आणि आकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात प्रवेश?

0
154
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात सरसकट बढती दिल्यानंतर आता इयत्ता नववी ते आकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात बढती देण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आज, बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार असून त्यानंतर याबाबतचा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात येतील परंतु त्यांना अनुत्तीर्ण करून आधीच्याच वर्गात बसवता येणार नाही, असा हा प्रस्ताव आहे.

गेल्या वर्षा म्हणजेच मार्च २०२० मध्ये ऐन परीक्षेच्या तोंडावर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव बळावला होता. यंदाही ऐन परीक्षेच्याच तोंडावर राज्यातील कोरोना संसर्गाचा वेग प्रचंड वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर कायम असून मंगळवारी राज्यात ५५ हजार ४६९ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत तर २९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही चिंताजनक आकडेवारी पाहता अशा परिस्थितीत परीक्षा कशा घ्यायच्या? असा पेच शालेय शिक्षण विभागासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळेच इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना सरसकट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने नुकताच जाहीर केला आहे.

आता शालेय शिक्षण विभागासमोर इयत्ता नववी आणि आकरावीच्या परीक्षांचा प्रश्न आहे. राज्यातील कोरोनाचा कहर पाहता सद्यस्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही. शालेय शिक्षण विभागाने परीक्षा घेण्याबाबत विविध घटकांची मते जाणून घेतली असता बहुतांश घटकांनी परीक्षा घेण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे इयत्ता नववी आणि आकरावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीही इयत्ता नववी आणि आकरावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावरच जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी काही शाळांनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अनुत्तीर्ण केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. जे विद्यार्थी अंतर्गत परीक्षा देऊ शकले नव्हते त्यांनाही या निर्णयाचा फटका बसला होता. काही शाळांनी विद्यार्थ्यांनी शालेय शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याच्याही तक्रारी होत्या. त्या पार्श्वभूमीवर यंदा विद्यार्थ्याचे अंतर्गत मूल्यांकन केले तरी विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करून करून त्यांना त्याच वर्गात बसवण्यात येऊ नये, असा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरोनाच्या  संसर्गामुळे यंदा आकरावीची प्रवेश प्रक्रिया जानेवारी महिन्यापर्यंत लांबली. त्यामुळे अवघ्या दोन-तीन महिन्यांतच आकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घ्यायची? ऑनलाइन वर्गात अद्याप ३० ते ४० टक्केही अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. अशा स्थितीत विद्यार्थी परीक्षा कशी देणार आणि परीक्षेत काय लिहिणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षांबाबत विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परीक्षेबाबतच्या विविध पर्यायांवर चर्चा केली. या बैठकीनंतर गायकवाड आज, बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा