डॉ. बबासाहेबांचे सहकारी सदानंद फुलझेले यांचे निधन

0
75
संग्रहित छायाचित्र.

नागपूरः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नागपुरातील धम्मदीक्षा सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी पेललेले सदानंद फुलझेले यांचे आज निधन झाले. आंबेडकरी चळवळीत फुलझेले यांचे आंबेडकरी चळवळीत मोठे योगदान होते. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीत त्यांनी झोकून देऊन काम केले. नागपुरात उभे राहिलेल्या दीक्षाभूमीच्या उभारणीतही त्यांनी मोठे योगदान दिले. सदानंद फुलझेले यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळ एका दृष्या कार्यकर्त्याला मुकल्याची भावना व्यक्त होत आहे.

फुलझेले यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दुःख व्यक्त केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांच्या निधनाने दीक्षाभूमीसाठी आपले आयुष्य समर्पित केलेल्या आंबेडकरी  चळवळीतील एका सच्च्या अनुयायास आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

आज दीक्षाभूमी येथे डॉ बाबासाहेबांचे चिरंतन भव्य स्मारक उभे आहे, त्यामागे दादासाहेब गायकवाड, दादासाहेब गवई यांचेसोबत सदानंद फुलझेले यांचे नाव आवर्जून घेतलेच पाहिजे. समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांनी भरपूर शिकावे म्हणून त्यांनी केलेले भरीव कार्य निश्चितच स्मरणात राहील. सदानंद फुलझेले यांच्या रूपाने आंबेडकरी चळवळीतला एक मोठा दुवा आता आपल्यातून गेला आहे, मात्र त्यांच्या कार्याचे विस्मरण होऊ न देणे हीच खरी श्रद्धांजली राहील, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा