जो बायडन यांना अमेरिकी काँग्रेसकडून विजयाचे प्रमाणपत्र, ट्रम्प सत्ता हस्तांतरणास तयार

0
52
संग्रहित छायाचित्र.

वॉशिंग्टनः  अमेरिकेच्या लोकशाहीच्या चौकटीला हादरा देणाऱ्या ट्रम्प समर्थकांच्या हिंसाचानंतर अमेरिकी काँग्रेसने अखेर डेमटक्रेटिक उमेदवार जो बायडन यांना विजयाचे प्रमाणपत्र बहाल केले आहे. काँग्रेसने बायडन यांना ३०६ इलेक्टोरल व्होटस्सह विजयाचे प्रमाणपत्र दिले आहे. आता २० जानेवारीला बायडन हे अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. निवडणुकीचे निकाल मान्य करण्यास नकार देणारे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अप्रत्यक्षरित्या का होईना पराभव मान्य केला असून २० जानेवारी शांततापूर्ण मार्गाने सत्तेचे हस्तांतरण होईल, असे म्हटले आहे.

अमेरिकन काँग्रेसने बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर ट्रम्प यांनी एक निवेदन जारी केले आहे. ‘निवडणुकीच्या निकालाशी मी पूर्णतः असहमत आहे आणि वस्तुस्थिती माझ्यासोबत आहे. असे असले तरी २० जानेवारीला सत्तेचे शांततापूर्ण हस्तांतरण होईल,’ असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. ट्रम्प यांनी अप्रत्यक्षरित्या का होईना आपला पराभव स्वीकारला आहे. ट्विटरने ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट काही तासांसाठी निलंबित केलेले असल्यामुळे त्यांना त्यांच्या प्रतिनिधीमार्फत हे निवेदन जारी करावे लागले आहे.

हेही वाचाः डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमधून बाहेर पडताच पत्नी मेलानिया ट्रम्प घेणार घटस्फोट!

 भारतीय प्रमाण वेळेनुसार गुरुवारी दुपारी २ वाजता अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत इलेक्टोरल कॉलेजची मोजणी होऊन उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बिडेन यांना विजयी घोषित करून विजयाचे प्रमाणपत्र दिल्यानंतर काही वेळातच ट्रम्प यांनी हे निवेदन जारी केले आहे.

तत्पूर्वी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकी आधी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेची संसद असलेल्या कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये घुसून धुडगूस घातला. हिंसाचार घडवत तोडफोड, गोळीबार केला. या हिंसाचारात चार जण ठार झाले आहेत. या जमावाला ट्रम्प यांनी हिंसाचारासाठी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. जगभरातील नेत्यांनी निषेध केला आहे.तर ट्रम्प यांनी मात्र हिंसाचार घडवणाऱ्या जमावाला देशभक्त म्हणत कौतुक केले होते.

उपराष्ट्राध्यक्ष पेन्स यांनी या हिंसाचारामुळे चांगलेच फैलावर घेतले. आज आमच्या कॅपिटॉलमध्ये धुडगूस घालणाऱ्यांनो, तुम्ही जिंकले नाही. हिंसाचार कधीच जिंकत नाही. स्वातंत्र्य जिंकते. आणि हे अजून तरी लोकांचे सभागृह आहे, अशा तिखट शब्दांत पेन्स यांनी ट्रम्प यांच्यावर टिकास्त्र सोडले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा