कहाणी चांद्र मोहिमेच्या जनकाची!

0
84
संग्रहित छायाचित्र.

१६ जुलै १९६९ रोजी डॉ. व्हर्नर वोन ब्राऊन याने ‘सॅटर्न-व्ही’ प्रक्षेपित केले. तो आजवरचे सर्वात शक्तिशाली रॉकेट होते. यातून नील आर्मस्ट्रॉन, बझ अल्ड्रिन आणि मायकल कॉलिन यांना चंद्रावर नेले गेले. अमेरिकेच्या अंतराळ मोहिमेचा नायक डॉ. ब्राऊन हा हिटलरच्या नाझी सैन्यातील प्रमुख अधिकारी होता. त्याच्या महत्वाकांक्षी रॉकेट तंत्र विकसित करण्याच्या प्रकल्पासाठी त्याने ज्यूंच्या छळछावण्या चालवल्या. त्यांचा अनन्वित छळ केला. परंतु त्याच्या प्रतिभेमुळे अमेरिकेनेही त्याच्या पापांचा हिशेब ठेवला नाही की स्वतः ब्राऊननेही त्याला पश्चाताप झाल्याचे कधी भासू दिले नाही. ब्राऊनने छळछावण्यांत केलेल्या ज्यूंच्या क्रूर छळाकडे दुर्लक्ष करून अमेरिकेने त्याला नायकत्व बहाल करून टाकले! सर्वांनाच आकर्षित करून टाकणाऱ्या चंद्र मोहिमेच्या जनकाची ही थरारक कहाणी…

कल्पना पांडे

सर्वात शक्तिशाली रॉकेट ‘सॅटर्न व्ही’चा अविष्कार महान जर्मन शास्त्रज्ञ ब्राऊन यांनी केला. ब्राऊन हे अंतराळ प्रवास मोहिमेचे जनक होते. १९६९ मध्ये ब्राऊन यांना जगभरात मोठा मान मिळाला, ते तेव्हाचे हिरो होते. सटर्न-५ ने नील आर्मस्ट्राँग व अल्ड्रिन बझ यांना चंद्रावर नेले आणि ते तिथे पोहोचणारे पाहिले व्यक्ती बनले. परंतु मीडियात हे कुठेही नमूद होत नव्हते की ते पूर्वी नाझी होते. त्यांनी दुसऱ्या जागतिक युद्धादरम्यान लंडनवर रॉकेट्सद्वारे स्फोटकांचा पाऊस पाडण्याची योजना आखली होती. तो काही साधा नाझी कार्यकर्ता नव्हता, तर एसएसचा एक उच्चाधिकारी होता. जो हेनरिक हिमलरच्या खूप जवळचा होता. तो त्या सत्तेचा भाग होता. ज्याने वाटेल तसे लोकांना गुलाम बनवून त्यांना वापरले आणि मारले. तरीही अमेरिकेने या राक्षसासाठी आपली दारे उघडी केली. हा युद्ध गुन्हेगार पुढे जाऊन अमेरिकेचा फार मोठा सेलिब्रिटी बनला आणि मॅन ऑन मून प्रकल्पाचा प्रमुख बनला. वोन ब्राऊन अमेरिकेचा हिरो बनला. तो एक प्रतिभाशाली शास्त्रज्ञ होता आणि त्याने आपल्या प्रतिभेचा वापर निर्घृण कामांसाठी केला. त्याच्या पापांचा हिशोब त्याच्या प्रतिभेमुळे कधीच ठेवण्यात आला नाही. त्याने कधीही आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली नाही. त्याला त्याचा पश्चात्ताप झाल्यासारखाही तो कधी वागला नाही!

वॉर्नर वोन ब्राऊनचा जन्म एका सधन जमीनदार घराण्यात १९१२ मध्ये झाला. घराणे मोठ्या जहागीदारांचे होते. या घराण्यातील अनेक लोक सरकारी सेवा किंवा सैन्यात होते. ब्राऊनच्या वडिलांना तो तसेच काहीतरी करण्याची अपेक्षा होती. राईट बंधूंनी पहिले हवाई यान बनवून उडवल्यापासून माणूस या नंतर कोणता टप्पा गाठेल याची चर्चा होत होती. ब्राऊन लहान असताना अंतराळ प्रवास हा अनेक कॉमिक्स बुकच्या लेखक आणि चित्रपट निर्मात्यांचा आवडता विषय होता. तेरा वर्षांचा असताना ब्राऊन यांच्या पालकांनी त्याला टेलिस्कोप आणून दिला.

हर्मन ओबर्थ यांच्या ‘रॉकेट इन इंटर प्लॅनेटरी स्पेस’ हे पुस्तक वाचल्यापासून ब्राऊन या क्षेत्राकडे वेगाने ओढला गेला. १९२० च्या दरम्यान बर्लिन शहरात जनमानसात रॉकेट विज्ञान आणि अंतरीक्ष प्रवास याचे मोठे कुतूहल होते. सर्वांकडे अंतराळ यानाचे चित्र असायचे. अंतराळ प्रवासाच्या रोमांचामुळे इतर मुलांप्रमाणेच तरूण ब्राऊनच्या मनातही या विषयात संशोधन करण्याची आणि अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. त्याला ही फँटसी वास्तविकतेत बदलायची होती.

मॅक्स वालीयर यांनी जेव्हा त्यांच्या क्रांतिकारी रॉकेट-कारचे जाहीर प्रदर्शन बर्लिन मध्ये केले, तेव्हा ब्राऊन १६ वर्षांचा होता. रॉकेट इंधनाचा भडका उडून रॉकेट कार २३० किलोमीटर प्रतितास या वेगाने धावली. १८ वर्षाच्या वयात त्याने बर्लिन इन्स्टिट्यूट ऑफ टेकनोलॉजीमध्ये एअरनॉटिकल इंजिनिअरिंग या शाखेत प्रवेश घेतला. त्या काळात रॉकेट विज्ञान नवा आणि अत्यंत क्लिष्ट असा विषय होता. ब्राऊनला काहीतरी मोठे करून दाखवायचे होते. फावल्या वेळेत तो हौशी जर्मन सोसायटी फॉर स्पेस ट्रॅव्हल या नावाच्या एका छोट्या संघटनेत जाऊ लागला. हा विज्ञान कथालेखक आणि काही हौशी विज्ञानप्रेमींचा गट होता. जे दारू गोळा वापरून छोटे मोठे प्रयोग करायचे. सैन्य आयुधांचा वापर करून ब्राऊन व त्याच्या मित्रांनी अत्यंत कच्चा स्वरूपातील रॉकेट बनवले. त्याने असे अनेक रॉकेट बनवले. पण त्यातील कुठलेच उडले नाही. वेगवेगळे मिश्रण वापरले तरी ते जागच्या जागी उध्वस्त झाले.

पण त्यांना या अपयशामुळे लहानसहान बारकावे शिकता आल्या. वोन ब्राऊन आणि त्यांच्या हौशी मित्रांसाठी सर्वात मोठे आव्हान रॉकेटच्या किंवा त्यांच्या चिंध्या न उडता रॉकेटला जमिनीपासून वर गुरुत्वाकर्षाणाच्या विरुद्ध दिशेत नेणे होते. कधीकधी रॉकेट वर झेप घ्यायचेही पण ते पडून जे नुकसान व्हायचे, त्यामुळे या लोकांना लपावे लागायचे. या गटातील बहुतांश लोक बेरोजगार होते. त्यातील काहींनाच यातील तांत्रिक ज्ञान होते. त्यांच्यात ब्राऊनने त्याचा ठसा उमटवला. ते कोणीतरी आर्थिक पाठबळ द्यावे याची वाट पहात होते. १९३२ च्या वसंत महिन्यात या रॉकेट सोसायटीने आपले नवीन रॉकेट ‘मिराक-२ प्रक्षेपणासाठी तयार केले. जमलेल्या बघ्यांच्या गर्दीत रॉकेट विज्ञानमध्ये रस असलेले जर्मन सैन्य अधिकारी कॅप्टन वॉल्टरही होते. ते अशा हौशी विज्ञान गटामधून नवीन प्रतिभांचा शोध घेत असायचे. बंदुकांचा मारा आणि त्याची मर्यादा लक्षात आल्यावर सैन्याची नजर अधिक मारक क्षमता आणि दूरवर मारा करू शकणाऱ्या मिसाईल आणि रॉकेटवर होती.

पहिल्या जागतिक युध्दात जर्मनीने आपले ७०० टन वजनाचे सुपर गन बनवले होते. ते ट्रेनद्वारे ने-आण करणे आणि १२९ किलोमीटर अंतरापर्यंत हल्ला करण्यात समर्थ होते. पण जर रॉकेट उपयोगात आणले गेले तर समुद्रापलीकडे सुद्धा खोलवर बॉम्ब टाकता येईल, हे सर्वांच्या लक्षात आले होते.

अत्यंत वेगाने मारा करू शकण्याच्या आपल्या अद्वितीय क्षमतेमुळे लष्कराला रॉकेट्स हवे होते. याचा दुसरा फायदा असाही होता की, तोपर्यंत रॉकेट हल्ला ओळखण्याचे कोणतेही तंत्रज्ञान अस्तित्वात नसल्याने ते अजिंक्य होते. जगाभरातल्या सर्व सैन्य शक्तींच्या नजरा रॉकेट विज्ञानाच्या विकासावर होत्या.

काही रॉकेट्सच्या प्रयोगामुळे प्रभावित होऊन त्या जर्मन अधिकाऱ्याची नजर २० वर्षीय व्हर्नर वोन ब्राऊनवर पडली. त्याने सैन्य आयुध संशोधन विभागात त्याला नोकरी देऊ केली. वोन ब्राऊनने ते मान्य केले. त्याला माहीत होते की रॉकेट बनवणे हे अत्यंत महागडे काम आहे आणि त्यात कोणत्याही व्यवसायाला लगेच फायदा नसल्याने कोणी गुंतवणूकही करणार नाही. ब्राऊनकडे आता जर्मन सरकारचे भरपूर पैसे आले होते. तो आता रॉकेट विज्ञानात शोध घेण्याचे कुतूहल असणाऱ्यांमध्ये नाही तर नाझी खाकी वर्दीतल्या कर्मचाऱ्यांमध्ये वावरू लागला. त्याला लोकांचा विनाश करणाऱ्या हत्याराच्या निर्मितीचे काम करायचे होते. सैन्याने त्याला  मदतनीस, पैसा, जागा कार्यालय सर्व काही पुरवले. अंतराळ यानासाठी सुरू झालेले संशोधन आता लांबपर्यंत मारा करू शकणाऱ्या मिसाईल्सपर्यंत आले होते. हिटलर जर्मनीचा चान्सलर बनला होता आणि त्याला जग पदाक्रांत करायचे होते. हिटलरने जर्मन सैन्यावर बेहिशेबी खर्च करायला सुरुवात केली. त्यावेळी जर्मनी ब्रिटनच्या तुलनेत चारपट अधिक शस्त्रनिर्मिती करत होता. शस्त्रनिर्मिती आणि संशोधनात अमाप पैसा खर्च होत होता.

केवळ २२ व्या वर्षी वोन ब्राऊन एक महत्वाचा मिलिटरी शास्त्रज्ञ बनला होता. बर्लिनबाहेर कमर्सडोर्फ रेंज इथे त्याला प्रयोगांसाठी मोठी जागा मिळाली. तिथे हुन्नरी ब्राऊनने अनेक रॉकेट्स बनवले. अनेक रॉकेट्स चाचणी करतानाच उध्वस्त व्हायचे म्हणून ही जागा बर्लिनजवळ असल्याने धोक्याचे होते. तो तंत्र निर्देशक बनल्याने त्याचे महत्व वाढले होते. त्याच्या मागणीवरून बाल्टिक समुद्र किनाऱ्याजवळ पीनेमुंडे इथे २५वर्ग किलोमीटर एवढी प्रशस्त जागा देण्यात आली. हे लहान खेडं आता औद्योगिक वसाहतीत बदलू लागले. इथे विमानतळ आणि शेकडो गणितज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्री आणि अभियंत्यांसाठी सरकारी घरे बांधण्यात आली. काही वर्षांतच पीनेमुंडे गाव जर्मन सैन्याच्या शस्त्र विकासाचे केंद्र बनून गेले. कोट्यवधींची उलाढाल होऊ लागली. हे नाझी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन दालन असल्यासारखे होते. ब्राऊनचे रॉकेट डिजाईन १९२९ मध्ये आलेल्या वुमन ऑन द मून चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेल्या रॉकेटसारखे होते. त्यावर त्या चित्रपटाचा लोगो देखील होता. पण हे रॉकेट जमिनीवरच किंवा थोड्या उंचीवर जाऊन कोसळत असे.

नोव्हेंबर १९३७ मध्ये तो नाझी पार्टीचा पूर्ण सदस्य बनला. ब्राऊनकडे नाझी सरकारने ज्यू लोकांना लुटून जमवलेला पैसा आणि सैन्यातली माणसे होती. १९३९ मध्ये युद्धाची शक्यता बळावत असताना त्याच्यावर महाशस्त्र तयार करण्याचा दबाव वाढत गेला. हिटलरने पीनेमुंडेचा दौरा केला आणि खुश झाला. परंतु हिटलरला प्रात्यक्षिक दाखवताना ब्राऊनचे रॉकेट जागच्या जागी कोसळले. हिटलरने चिडून फंडिंग बंद करून टाकली आणि रणगाडे, बंदुका, दारूगोळ्यावर खर्च वाढण्याचे आदेश दिले. रॉकेटवरचा खर्च त्याला महाग वाटला.

ब्राऊनला त्याचे स्वप्न कोसळल्यासारखे वाटले. त्याने एसएस प्रमुख हेनरिक हिमलरशी संपर्क साधला. हिमलरला युद्ध जिंकू शकण्याच्या रॉकेटच्या ताकदीवर विश्वास होता. ते यशस्वी झाले तर हिमलर अधिक शक्तिशाली बनणार याची त्याला जाणीव होती. ब्राऊनला पाठिंबा देण्याच्या बदल्यात त्याने शुत्झस्टॅफेल म्हणजे एसएसचे अधिकारीपद देऊ केले. तोपर्यंत एसएसने हजारो ज्यू लोकांची कत्तल केल्याने कुख्यात झाली होती. युद्धाच्या सुरुवातीलाच एसएसने पोलंडमध्ये ६५ हजार निर्दोष ज्यू लोकांची हत्या केली होती. जर्मनीमध्ये ते रोजरासपणे ज्यू स्त्री, पुरुष व मुलांना जीवे मारायचे. एसएस दमन, दहशत आणि जनसंहारासाठीचे नाझी पक्षाचे हत्यार होते.

१९४० मध्ये एसएसमध्ये ब्राऊन सेकेंड लेफ्टनंट म्हणून सामील झाला. तेव्हा ती संघटना आणि त्याची महाशक्ती काय चीज आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. एसएस म्हणजे खूप सारा पैसा आणि असीम ताकद याची ब्राऊनला खात्री होती. हिमलरच्या संपर्कामुळे आणि एसएसचा वरिष्ठ अधिकारी बनल्यामुळे ब्राऊनला पाहिजे ते मिळू लागले. ब्राऊनचा पहिले आव्हान रॉकेट साडेतीनशे किमीचा पल्ला गाठू शकेल इतके इंजिन सशक्त करणे होते. शेकडो टन विस्फोटके घेऊन जाण्यासाठी कमी जागेत जास्त वेळेपर्यंत चालेल असे इंधन भरणे गरजेचे होते. त्याने अमेरिकन रॉकेट शास्त्रज्ञ रॉबर्ट गोडर्ड यांची द्रव इंधन भरण्याची शक्कल उपयोगात आणली. त्याने द्रव ऑक्सिजन आणि अल्कोहोलच्या संमिश्रणाने भरपूर ऊर्जा उत्पन्न करणारे इंजिन बनवण्यात यश मिळवले. हे इंजिन पुढे रॉकेट शास्त्राचे ब्लू प्रिंट बनणार होते. ही रचना त्यानंतरच्या अनेक दशकांपर्यंत उपयोगात आणली गेली.

रॉकेटने हवेत उंच झेप घेतली तरी पण त्याची दिशा हवेत नियंत्रित कशी करता येईल हे त्याला समजेना. या नव्या आव्हानाची त्याला तोपर्यन्त कल्पना नव्हती. त्यावेळपर्यंत संगणकाचा विकास झाला नसल्याने ते आज इतके सोपे नव्हते. त्याने पुन्हा त्याच अमेरिकन शास्त्रज्ञाची युक्ती वापरून जायरोस्कोपच्या मदतीने त्याला स्थिर केले. गोडर्डकडे संकल्पना होत्या, पण ब्राऊनकडे अमर्याद पैसा आणि फौजफाटा होता. अनेक प्रयोगाअंती मॉडेल यशस्वी होत गेले.

३ ऑक्टोबर १९४२ रोजी ब्राऊनच्या टीमने त्यांच्या ए-४ रॉकेटची चाचणी घेतली. हे रॉकेट स्फोट न होता उंचच उंच उडाले. रॉकेट आकाशात ८० किलोमीटरच्याही वर झेपावले. इतक्या उंचीपर्यंत पोहोचलेले ते पहिले मानवनिर्मित यंत्र होते. ब्राऊनने रॉकेटद्वारे अंतराळ भेदण्याची घोषणा केली. पण सर्वांना माहीत होते की हे अंतराळ यान पाठवणारे रॉकेट नाही, तर विस्फोटके पठवणारी युद्ध मशीन आहे. ही बातमी हिमलरलाही काळाली. त्याने हिटलरला ही उत्साहवर्धक बातमी सांगितली. जर्मनी एक वर्षापासून रशियाशी करीत असलेल्या युद्धात मोठे नुकसान भोगत होता. हिटलरला अशा चमत्कारिक शस्त्राची गरज होती. त्याने लवकरात लवकर १२००० रॉकेट्स तयार करण्याचा हुकूम सोडला. ब्राऊनच्या रॉकेटचे नामकरण ‘व्ही-२’ असे करण्यात आले. यातला ‘व्ही’ हा शब्द वेंजेस म्हणजे सूड याचे पहिले अक्षर होते.

ब्रिटिशांना याची माहिती पडल्यावर त्यांना घाम फुटला. त्यांनी याचा धोका ओळखून त्वरित जर्मन तळ नष्ट करण्याचा निर्णय घेतला. १७ ऑगस्ट १९४३ रोजी पीनेमुंडेच्या जर्मन शस्त्र केंद्रावर हवाई जहाजाने हल्ला चढविण्यासाठी ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्स ने ‘ऑपरेशन हायड्रा’ सुरू केले. मध्यरात्री पीनेमुंडेंवर १०० टन बॉम्ब-स्फोटके पाडून त्या केंद्राला मोठे नुकसान पोहोचवण्यात आले. वातावरण स्वच्छ नसल्याने केंद्राला जास्त हानी झाली नाही पण शत्रूला जागेचा पत्ता लागल्याने तिथे रहाणे आणि महत्वाची आयुधे ठेवणे जोखमीचे झाल्याने अख्खे केंद्र नव्या ठिकाणी हलवणे गरजेचे झाले. त्यामुळे रॉकेट निर्मितीचे काम सात आठवड्याने मागे पडले. तिथून नजरेत येऊ नये आणि गुप्तता बाळगता यावी म्हणून हार्ज पर्वतांमध्ये जमीनीखाली ब्राऊनचे नवे रॉकेट केंद्र वसवण्यात आले. या कारखान्यांना मिटलवर्क म्हटले जाते. ब्राऊनकडे त्याच्या निर्माण कार्याची जबाबदारी होती.

 हजारो रॉकेट्स, त्याचे सुटे भाग आणि संयंत्र नेण्या-आणण्यासाठी भला मोठा बोगदा तयार करण्यात आला. हे एक विशाल बांधकाम होते आणि या बांधकामाची कहाणी अमानवीय आणि धक्कादायक आहे. या पर्वतरंगांमध्येच मिट्टलबाऊ-डोरा कॉन्स्ट्रेशन कॅम्प बनवण्यात आले होते. ही छळ छावणी ब्राऊनच्या कारखान्याला बेबंदपणे श्रमशक्तीचा पुरवठा करण्यासाठी निर्मित करण्यात आली.

 एसएस अधिकारी ब्राऊनकडे हजारो ज्यू बंदींचे मोफत मानवी श्रम उपलब्ध होते. या नरकात असंख्य ज्यू बंदी लोकांना जेवण, झोप व स्वच्छतेविना मरेपर्यंत कामात जुंपले जायचे. त्यांच्याकडून फक्त काही आठवडे जगून घोर परिश्रम करण्याची अपेक्षा नाझी लोकांना असायची. ते मेल्यानंतर त्याचे शव ते बनवत असलेल्या बोगद्याखालीच पुरले जायचे.

 ब्राऊन व त्याच्या सोबतच्या सर्व रॉकेट वैज्ञानिकांना या गुलामांची आणि परिस्थितीची संपूर्ण माहिती होती. तो त्या ज्यू गुलामांचा वापर आणि हत्या करणाऱ्या सरकारचाचा एक भाग होता. त्याला या गोष्टींची काळजी नव्हती. ब्राऊनच्या महात्वकांक्षा आणि हिटलरचे जगज्जेता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असंख्य ज्यू बंदीचे जीव अत्यंत क्रूरपणे घेण्यात आले.

पण १९४४ मध्ये जेव्हा रशियाच्या लाल सैन्याने जर्मनीच्या दक्षिणेतून निर्णायक हल्ला चढवला, तेव्हा परिस्थिती जर्मनीच्या हाताबाहेर जाऊ लागली. रशियन फौजा पोलंडपर्यंत घुसल्या आणि उत्तरेतून इटलीच्या मार्गाने अमेरिकन ब्रिटिश फौजांनी हल्ले चढवले. रशिया बर्लिनकडे कूच करत होता. दुसरीकडे सप्टेंबर १९४४ पर्यंत ब्राऊनच्या स्वप्नाप्रमाणे महाशस्त्र रॉकेट तयार झाले होते. पहिले रॉकेट नेदरलँडमधून लंडनच्या दिशेने सोडले गेले आणि ते पश्चिम लंडनच्या स्टेवली रोडवर येऊन फुटले. त्यात काही लोकांची हानी आणि बांधकाम उद्ध्वस्त झाले असले तरी ब्रिटनला घाम फोडायला आणि हिटलरला आनंद द्यायला ते पुरेसे होते. आता लंडन नष्ट होण्याच्या छायेत होते. ब्राऊनने जनसंहाराचे नवे शस्त्र बनवून इतिहास घडवला होता. हे अग्निअस्त्र कुपोषित आणि मरणाला टेकलेल्या बंदींनी बनवले होते. ते तंत्रकुशल नव्हते. त्याचे अनेक दोष दूर करण्यासाठी अनेक चाचण्या आणि वेळ गरजेचा होता.

बरीच व्ही-२ क्षेपणास्त्रे लक्ष्य गाठण्यात असमर्थ ठरायची किंवा फार कमी नुकसान करायची. ६००० व्ही-२ क्षेपणास्त्रांनी केवळ ५००० ब्रिटिश नागरिकांची हत्या केली. या तुलनेत पारंपरिक हत्यार अधिक स्वस्त आणि प्रभावशाली होते. या शास्त्राच्या निर्मितीत त्याहून कितीतरी पट जास्त ज्यू लोक मारले गेले. ब्राऊनच्या रॉकेट मिशनमध्ये जर्मनीचे अब्जावधी रुपये खर्च झाले. हे पैसे जर तेव्हा रणगाडे, बॉम्ब आणि इतर शस्त्रास्त्रांवर खर्च झाले असते तर बर्लिनमध्ये घुसणाऱ्या सैन्याला अधिक कडवा संघर्ष करावा लागला असता.

१९४५ च्या वसंत ऋतूत लाल सैन्य पीनेमुंडेपासून फक्त अडीचशे किमीच्या अंतरावर होते. फौजाजवळ आल्या तशा सर्वांना बंदुका घेऊन लढायला सांगण्यात आले. ब्राऊनला हे अपेक्षित नव्हते. त्याने दुसरा निर्णय घेतला. त्याला बायको मुले नसल्याने ते तसेही त्याला तुलनेने सोपे होते.

ब्राऊन व इतर रॉकेट शास्त्रज्ञ कार ने पळ काढत असतांना त्यांनी उद्ध्वस्त झालेली जर्मनी पाहिली आणि आता सर्व काही बदलले आहे या निष्कर्षाप्रत ते ठाम झाले. पहाडांमधून प्रवास करताना त्यांची कार अपघातग्रास्त झाल्याने ब्राऊनच्या हातात फ्रॅक्चर आले. तो ऑस्ट्रियन सीमेजवळच्या आलिशान अल्पाईन रिसॉर्ट नावाच्या हॉटेलमध्ये थांबला. रॉकेटमॅनला त्याचे स्वतःचे महत्व माहीत होते. अमेरिकन्स त्याच्या शोधात आहेत हे त्याला माहीत होते. त्यांच्याकडे संशोधन कार्य ठेवलेल्या अनेक टन वजनाच्या पेट्या होत्या. आत्मसमर्पण करताना जगू देण्याच्या बदल्यात तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याच्या वाटाघाटीची त्यांची योजना होती. व्यावहारिक जगातले ते शहाणे होते.

११ एप्रिल १९४५ रोजी अमेरिकन फौजांनी डोरा कॅम्पवर नियंत्रण मिळवले. या कॅम्पची परिस्थिती मानवतेला लाजवेल अशी भयानक होती. सगळीकडे मृतदेहांचा खच होता. मृतदेहांच्या कुजलेल्या जाळलेल्या ढिगांमध्ये काही हजार मरणाला टेकलेले कुपोषित व रोगग्रस्त ज्यू जिवंत राहिले होते. जवळच ब्राऊनच्या संशोधन केंद्रात रेल्वे गाड्यांवर व्ही-२ आणि विविध टप्प्यांमध्ये असलेले त्याचे विशालकाय सुटे भाग पडले होते. अमेरिकन अधिकाऱ्यांना जर्मनीकडे असलेल्या व अमेरिकेच्याही मैलोनमैल पुढे आणि प्रगत असलेल्या तंत्रज्ञानाचे दर्शन होत होते.

अमेरिकी सैन्याच्या गुप्तचर आणि विशेष युनिटला टी- फोर्स असे नाव होते. त्यांनी जर्मन वैज्ञानिकांचा शोध लावायला सुरुवात केली. त्यांच्या यादीत डॉ. व्हर्नर वोन ब्राऊन हे सर्वात वर होते. व्हर्नर ब्राऊनचे अमेरिकन लोकांना आकर्षण साहजिक होते. ते त्यावेळचे सर्वात प्रसिद्ध रॉकेट शास्त्रज्ञ होते. व्हर्नर ब्राऊन सोवियत युनियनच्या कम्युनिस्ट लाल सैन्याच्या हाती लागण्यापूर्वी त्यांना तो हवा होता. सोवियत सैन्य जर्मनीत ब्रिटिश व अमेरिकन सैन्यापेक्षा अधिक खोलवर घुसले होते. म्हणून अधिक वेगाने जास्तीत जास्त जर्मन वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ लोकांचा शोध घेण्याची गरज होती.

ब्राऊन अमेरिकन फौजांच्या हाती लागला तेव्हा त्याच्या वागण्यात युद्ध गुन्हेगार असल्याचे कोणतेही चिन्ह नव्हते. तो हसत सिगारेट फुंकत होता. अमेरिकन सैन्य अधिकारी देखील खुश होते. दोन्ही एकमेकांशी सौजन्याने वागत होते. वरिष्ठ गुप्तचर अधिकारी वाटाघाटी करत होते. ठरले की व्हर्नर ब्राऊन अमेरिकेला व्ही-२ तंत्रज्ञान पुरवणार आणि त्या बदल्यात अमेरिका त्याला शरण, संरक्षण देऊन त्याचे डोरा कॅम्प येथील दहशतवादी गुन्हे दुर्लक्षित करणार. ते नैतिकतेबद्दल कोणतेही प्रश्न विचारणार नाहीत. त्यांना ब्राऊनचे डोके हवे होते माणूस नव्हे.

मिट्टलवर्क डोरा कॅम्पमध्ये त्याच्या भूमिकेची चौकशी करण्यात आल्याचे कोणतेही दस्तावेज नाहीत. त्याच्याशी संबंधित दस्तावेज दाबण्यात आले. २० सप्टेंबर १९४५ रोजी नाझी सैन्याचे सर्वोच्च रॉकेट शास्त्रज्ञ व्हर्नर वोन ब्राऊन त्यांच्या चमूसह अमेरिकेत नेण्यात आले. न्यू मेक्सिको वाळवंटामध्ये वसलेल्या सैन्य तळावर त्यांना गुप्तपणे ठेवण्यात आले. जर्मनीतून व्ही-२चे भाग आणले गेले आणि त्यावर काम सुरू झाले. जनरल इलेक्ट्रिकचे अभियंते अमेरिकन सैन्यासाठी आग्नेय क्षेपणास्त्र विकसित करत होते. व्हर्नर ब्राऊन अमेरिकेला तंत्रज्ञान पुरवणार असल्याने तो या अभियानात महत्वाचा होता.

पण ब्राऊन व त्याचच्या सहकाऱ्यांच्या रक्तरंजित आणि कुख्यात नाझी पार्श्वभूमीमुळे अनेकांना हे रुचले नाही. एलनर रुजवेल्ट आणि महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी नाझी सहभागाचा तीव्र निषेध केला. अमेरिकेच्या वैज्ञानिक संघाने देखील यावर नापसंती दर्शवत विरोध केला. पण अमेरिकेतील सत्ताधाऱ्यांना आणि अनेक शास्त्रज्ञ व अभियंत्यांना नैतिकता, युद्ध अपराध आणि हत्या आदींच्या वादाशी घेणे देने नव्हते. ते याकडे संधी म्हणून पाहत होते. अमेरिकन मिलिटरीचे मत होते की, त्यांच्याकडे आपले सैन्य मजबूत करण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता. त्यांच्या मते, कम्युनिस्टांकडे देखील असे काही नाझी शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांचा देखील स्वतःचा रॉकेट प्रकल्प कामी आहे. त्यांच्या मते कम्युनिस्ट वरचढ झाले तर ते अमेरिकन स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी धोकादायक ठरेल. शीत युद्धाची ही सुरुवातच होती.

 वोन ब्राऊनला अल्बमाच्या हंट्सविले इथे पाठवण्यात आले. तेथे त्याने रेडस्टोन रॉकेट्सवर काम सुरू ठेवले. हे अणुबॉम्ब वाहण्याची क्षमता असलेला पहिला बॅलिस्टिक मिसाईल होते. ब्राऊन मिसाईल विकास कार्याचा निर्देशक बनला. हिटलरचा मुख्य रॉकेट शास्त्रज्ञ आता अमेरिकेचा मुख्य रॉकेट शास्त्रज्ञ बनला होता.

ब्राऊनचे लग्न झाले आणि तो त्याच्या तीन मुलांसोबत राहू लागला. तो चर्चमध्ये जायचा आणि धार्मिक उद्धरणांचा वापर सार्वजनिक घोषणा आणि बोलण्यात करायचा. १९५५ मध्ये त्याला अमेरिकन नागरिकत्व मिळाले. तो अमेरिकन हिरो होता. अमेरिकेने वर्णीय द्वेषाऐवजी व्हर्नरला वैज्ञानिक संधोधनात गुंतवून घेतले. अमेरिकेत अंतराळ यान बनवण्याचा कार्यक्रम वेगाने चालू होते. ब्राऊनने लहानपणी पाहिलेले अंतराळ यान बनवण्याचे स्वप्न पुन्हा नव्या उमेदीने जिवंत झाले. पण अमेरिकेत जर्मनीप्रमाणे सुरक्षितता, खर्च व मानवी श्रमाची चंगळ नव्हती. त्याला मानवी जीवनाच्या सुरक्षिततेल महत्व द्यावे लागायचे.

अमेरिकेला त्यावेळी रशियाच्या पुढे जायचे होते. १९५७ मध्ये सोव्हित युनियनने जगातला पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक अंतराळात सोडला. अमेरिकन जनमानसात तोपर्यंत आपण जगात सर्वात श्रेष्ठ असल्याची भावना होती. त्या भावनेला स्पुटनिक या कृत्रिम सॅटेलाईटने मोठा तडा दिला. स्पुटनिक अमेरिकेतूनही अवकाशात दिसायचे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांमध्ये ही भावनाही बळावली की रशिया अशाच प्रकारे पृथ्वीच्या कक्षेतून अणुबॉम्ब देखील टाकू शकेल. स्पुटनिकने अमेरिकेत दहशत निर्माण केली. अमेरिकेने त्याचे जोरदार उत्तर दिले पाहिजे, असे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे अमेरिकेचा ब्राऊन आणि त्यांच्या सहकार्यावरचा विश्वास अधिक वाढून गेला. स्पुटनिकच्या चार महिन्यानंतर ब्राऊनने ‘ज्युनो-१’ अंतराळात सोडले. हा पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आलेला पहिला कृत्रिम उपग्रह होता. प्रक्षेपणाच्या वेळी स्वतः ब्राऊन हजर होता. पण अमेरिकेचा अंतराळ कार्यक्रम अत्याधुनिक असूनही सोव्हिएत रशियाच्या मागेच होता.

सोव्हिएत रशिया त्यावेळेस अंतराळ कार्यक्रमाच्या शर्यतीत पुढे असल्याने शीत युद्धात भर पडली होती. १२ एप्रिल १९६१ रोजी सोव्हिएत रशियाने युरी गागरीन यांना जगातला पहिला व्यक्ती म्हणून अंतराळात पाठवले तेव्हा पश्चिमी अहंकारावर मोठा आघात झाला. कम्युनिझमसाठी हा मोठा विजय म्हणून साजरा करण्यात आला. भांडवलशाहीचा सर्वोच्च पुरस्कर्ता असलेल्या अमेरिकेच्या सत्ताधाऱ्यांहवर भयंकर दबाव वाढला होता. अमेरिकेन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी आपली लोकप्रियता टिकवण्यासाठी अत्यंत दबावात येऊन माणसाला चंद्रापर्यंत नेऊन वापस आणण्याचा निर्धार अमेरिकन लोकांसमोर केला.

ब्राऊन आता अमेरिकन अध्यक्षांच्या जवळचे व्यक्ती बनले. त्यांना पुन्हा मोठ्याप्रमाणात अमर्याद फंडिंग आणि स्रोत पुरवण्यास सुरुवात झाली. ब्राऊनसाठी हे स्वप्न पूर्ण करण्याची स्वतः चालून आलेली अभूतपूर्व संधी होती. हा मुद्दा फक्त रॉकेट बनवून अंतराळात पोहोचवण्यापुरता मर्यादित राहिला नव्हता. तो दुसऱ्या जगापर्यंत पोहोचून परत येण्याचा झाला होता. द्वितीय युद्धाचा नाझी युद्ध गुन्हेगार आता अमेरिकेचे आशास्थान आणि सेलिब्रिटी बनला. तो महात्वकांक्षी ‘मॅन ऑन मून’ प्रोजेक्टच्या प्रमुख लोकांपैकी होता.

वोन ब्राऊनच्या नेतृत्वात ‘सॅटर्न- व्ही’ १९६७ ते १९७३ दरम्यान निर्मिती करण्यात आलेल्या अमेरिकन नासाचे सुपरहेवी-लिफ्ट लॉन्च क्षेपणास्त्र होते. त्यात मानवांना वाहण्याची क्षमता होती. यात तीन टप्पे होते. प्रत्येक द्रव प्रोपेलेंटद्वारे इंधनयुक्त होते. हे माणसांना चंद्र मोहिमेत पाठवण्यासाठी आखलेल्या अपोलो कार्यक्रमास पाठबळ देण्यासाठी विकसित केले गेले होते आणि नंतर पहिले अमेरिकन अंतराळ केंद्र ‘स्कायलॅब’ सुरू करण्यासाठी वापरले गेले. कोणत्याही मानवहानीशिवाय केनेडी स्पेस सेंटरवरून ‘सॅटर्न-व्ही’ १३ वेळा लाँच केले गेले. २०२१पर्यंत ‘सॅटर्न- व्ही’ आतापर्यंतचे सर्वात उंच, सर्वात वजनदार आणि सर्वात शक्तिशाली (सर्वाधिक एकूण आवेग) रॉकेट आहे. माल, प्रवासी, फ्लाइट क्रू, शस्त्रे, वैज्ञानिक उपकरणे किंवा प्रयोग, किंवा इतर उपकरणे समाविष्ट असलेले १४०,००० किलो वजनाचे ‘पेलोड’ घेऊन पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (एलईओ) काम करणारे क्षेपणास्त्र आहे. या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात आपोलो यान चंद्रावर पाठवण्यात अमेरिकेला यश आले. १६ जुलै १९६९ रोजी डॉ. व्हर्नर वोन ब्राऊन याने ‘सॅटर्न-व्ही’ प्रक्षेपित केले. तो आजवरचे सर्वात शक्तिशाली रॉकेट होते. यातून नील आर्मस्ट्रॉन, बझ अल्ड्रिन आणि मायकल कॉलिन यांना चंद्रावर नेले गेले. ब्राऊनच्या कारकिर्दीतील ही सर्वोच्च उपलब्धी होती.

मानवाच्या इतिहासात घडलेली ही सर्वात महत्वाच्या घटनांपैकी एक घटना आहे. वोन ब्राऊनला नॅशनल मेडल फॉर सायन्स देण्यात आले. अलबामा विद्यापीठातील एका संशोधन केंद्राला त्याचे नाव देण्यात आले. चंद्रावर असलेल्या एका विवराला देखील ब्राऊनचे नाव देण्यात आले. ६५ वर्षाच्या वयात पित्ताशयाच्या कॅन्सरने त्यांचे निधन झाले आणि ते अमेरिकेत एका नायकाप्रमाणे अमर होऊन गेले. ते वरिष्ठ क्रूर एसएस अधिकारी असल्याची माहिती कुठेही नमूद करण्यात येत नव्हती. त्याच्या कामासाठी जी छळछावणी चालवण्यात यायची त्याचाही उल्लेख अमेरिकन माहितीस्तोत्रांतून गायब करण्यात आला. एसएस प्रमुख अधिकारी म्हणून छळछावणी चालवण्याची आणि ज्यूंच्या हत्येची नैतिक जबाबदारी त्याची होतीच. हात रक्ताने माखले होतेच पण ब्राऊननेही चालखपणा दाखवत त्या गोष्टींचा कधी उल्लेख केला नाही. त्याच्यावर कोणताही खटला चालला नाही. त्याला नाझी कुकृत्यांचे दुःखअ सल्याचे कधीही जाणवले नाही. त्याने कधीही जगाची माफी मागितली नाही. इतिहासात कदाचित फार कमी व्यक्ती असतील की, अनेक कुकृत्ये करूनही ज्यांना नायकत्व लाभले आणि डॉ. ब्राऊनप्रमाणे संधी तसेच माफी मिळाली असेल!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा